सर्व्हर डाउनमुळे नागरिक वैतागले
जत,(प्रतिनिधी)-
जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने खरेदी विक्री व्यवहाराचा बोजवारा उडाला आहे. यामुळे जमीन खरेदी विक्री करणारे व अन्य प्रकारचे व्यवहार करणा-या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिक पुरते वैतागून गेले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, जत दुय्यम निबंधक कार्यालयात सर्व्हर डाऊनमुळे सगळेच हैराण झाले आहेत. सातबारा वरील दस्त नोंदनीची कामे सुरु ठेवण्यासाठी आता जिल्हाधिकारी यानी लक्ष घालून निर्णय घेणे अपेक्षित आहे. ऑनलाईन सातबाराच्या अडचणीमुळे जत दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री दस्त, बक्षिस पत्र, हक्क सोडपत्र, गहाणखत, हे दस्त नोंदणी होण्यामध्ये अडचण निर्माण होत आहे. दिवसभर दुय्यम निबंधक कार्यालयात बसूनही दस्त नोंदणी न झाल्यामुळे हताश होऊन पक्षकारांना परत आपआपल्या गावी जावे लागत आहे. यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका तर बसतच आहे शिवाय त्यांचा वेळही वाया जात आहे.
गेल्या अनेक महिण्यापासून सर्व्हर डाऊन होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतच राहिल्याने पक्षकारांची कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या उमदी व संख येथील पक्षकारांना खरेदी विक्री व्यवहारासाठी दिवसदिवसभर थांबून कामे न झाल्याने निराश होऊन गावी परतावे लागत आहे.त्यातच विजेचा पुरवठाही अचानकच खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम ही दस्त नोंदणीवर होताना दिसून येत आहे. सर्व्हर डाऊन होत असल्याने दस्त नोंदणी कामकाजात अडथळे निर्माण होऊन बरेच वेळा पक्षकारांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवले आहेत. दुय्यम निबंधक कार्यालय कामकाज वारंवार होणारे खंडीत वीजपुरवठ्यामुळे ठप्प होत असल्याने प्रशासनाने या कार्यालयासाठी जनरेटरची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.
जत दुय्यम निबंधक कार्यालयात सातबारा, प्रॉपरटी कार्ड, जमीनसंदर्भातील खरेदी विक्री, बक्षिस पत्र, गहाणखत,
हक्क सोडपत्र, मुखत्यारपत्र आदी दस्त केले जातात. राज्यात दोन नंबरचा महसूल देणारे खाते म्हणून नोंदणी विभागाकडे पाहीले जाते. पण याच विभागाकडे सातबारा बाबतचे दस्त ऑनलाईन सातबारा झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहू लागले आहेत. त्यामुळे खरेदी विक्री व्यवहारासाठी आलेल्या पक्षकारांना सर्व्हर डाऊन मुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी महसूल विभागाने मुद्रांक व नोंदणी विभागाने आपला कारभार चांगल्या प्रकारे सुधारावा. व जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

No comments:
Post a Comment