Wednesday, December 26, 2018

डॉ. रवींद्र आरळी यांनी साधी पाणपोई सुरू करून दाखवावी


नीलेश बामणे यांचा प्रतिटोला
जत,(प्रतिनिधी)-
 कर्नाटकातून पाणी आणण्याची नौटंकी करण्याऐवजी भाजपचे नेते डॉ. रवींद्र आरळी यांनी स्वतः प्रथम आत्मपरीक्षण करावे. जतसाठी आपले योगदान काय आहे, हे तपासावे व जतकरांसाठी एखादी स्वखर्चातून पाणपोई तरी सुरू करून दाखवावी; मगच काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांच्यावर टीका करावी, असा प्रतिटोला नगरसेवक नीलेश बामणे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

 बामणे म्हणाले, डॉ. आरळी यांनी स्वतःचा व्यवसाय वाढविण्याशिवाय जत तालुक्यात दुसरा कोणताच उद्योग केलेला नाही. मागील 20 वर्षांपासून राजकारणात असल्याचे सांगणारे डॉ. आरळी यांनी जतसाठी काय योगदान दिले, हे सर्व जतकरांना माहिती आहे. व्यवसायातूनमायाकमविल्याने त्यांना आता आमदारकीचे वेध लागले आहेत. त्या वेधातून जतकरांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेण्यासाठी डॉ. आरळी यांचा ही धडपड सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या त्यांच्याच भाजपच्या बैठकीत डॉ. आरळी यांची त्यांच्याच लोकांनी खिल्ली उडविली, हे सर्वांना माहीत आहे. खासदार व आमदारांना डावलून कर्नाटकातून पाणी आणण्याची डॉ. आरळी यांची ही धडपड जतला पाणी आणण्यासाठी नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरू आहे. आरळी कुटुंबीयांना मागील वर्षी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत मतदारांनी नाकारले; तर काँग्रेसचे नेते सावंत यांना साथ दिली. त्यामुळे राजकारणात फेल कोण झाले, हे डॉ. आरळी यांनी स्वतः तपासून पाहावे. ज्यांना स्वतःच्या पक्षात किंमत नाही, अशा मंडळींना काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकारच नाही. यापुढे सावंत यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा इशारा नगरसेवक बामणे यांनी दिला.

No comments:

Post a Comment