Sunday, December 23, 2018

अस्मिता योजना : काळजी मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेची


जत,(प्रतिनिधी)-
कि शोरवयीन मुलींच्या, ग्रामीण महिलांच्या आरोग्य, स्वच्छतेच्या संवेदनशील विषयाबाबत प्रबोधन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अस्मिता योजना राबविण्यात येत आहे. महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, सर्वांगीण विकास या त्रिसूत्रीचा अवलंब करीत अस्मिता योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या किशोरवयीन मुलींना फक्त पाच रुपये दरामध्ये 8 सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होणार आहेत.

या नॅपकिन्सचा पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना देण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी ही योजना प्राथमिक शिक्षण विभागाच्या मदतीने राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात ही योजना उमेद पुरस्कृत स्वयंसहायता समुहामार्फत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील महिलांना 240 मिमी पॅडचे पॅकेट 24 रुपयाला व 280 मिमी पॅडचे पॅकेट 29 रुपयाला देण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत बचतगटाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी सर्वप्रथम गटाला नोंदणीसाठी अस्मिता मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागते. या अॅपद्वारे नॅपकिन्सची विक्री करणार्या गटाची नोंद केली जाते. जिपच्या शाळेतील मुलींची नोंदणी प्रक्रियेसाठी प्रत्येक मुलीची पाच रुपये नोंदणी फी आकारून आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने अस्मिता योजनेत नोंदणी केली जाते. महिला व अस्मिता कार्डधारक मुलींमार्फत अॅपवर मागणी नोंदविण्यात येते.

नुकतेच पॅडमॅन चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमारने स्त्रियांची कोंडी करणार्या या विषयाला हात घातला. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली व ग्रामीण महिलांच्या आरोग्य व स्वच्छतेविषयीच्या सवयी समज, गैरसमज याबाबीवर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिपच्या  मुलींना पॅडमॅन चित्रपट दाखविण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनी म्हणतात, अस्मिता म्हणजे आम्हा मुलींना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. आत्मविश्वास वाढविण्यास व आरोग्य सुधरविण्यास या योजनेची मदत होत आहे.

No comments:

Post a Comment