Sunday, December 25, 2022

द्राक्षबागांसाठी राबताहेत बिहारचे 30 हजारांवर मजूर

सांगली, (मच्छिंद्र ऐनापुरे)-

बागायती पिकांसाठी मजुरांची उपलब्धता सध्या चिंतेचा विषय ठरतो आहे. जिल्ह्यात द्राक्षक्षेत्रातील वाढीमुळे स्थानिक मजुरांकडून कामे करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मागील दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिहारी मजूर कामांसाठी आले. यंदा द्राक्ष फळछाटणीसाठी जिल्ह्यात ३० हजारांवर मजूर काम करीत आहेत. त्यांना द्राक्षबाग कामाचे प्रशिक्षणही दिले जाते. कमी मजुरी, दिवसभर काम करण्याच्या क्षमतेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत द्राक्षबागा बिहारी मजुरांच्या जोरावर जोपासल्या आहेत. 

१५० ते ५०० मजुरांसाठी एक मुकादम काम करतो. जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र सव्वा लाख एकरावर आहे. सर्वसाधारणपणे फळछाटणीच्या हंगामात एकराला एक मजूर लागतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक मजूर मिळणे अवघड होत असल्यामुळे बिहारमधून प्रतिवर्षी येणाऱ्या मजुरांची नव्याने भरच पडत आहे. गेल्या सात आठ वर्षांपासून तर मजुरांचा आलेख वाढतोच आहे. यंदा मोजक्याच क्षेत्रावर द्राक्षबागांची नव्याने लागण झाली आहे. पाला काढणी, छाटणी, पिस्ट, खोड - ओलांडा बांधणे, काडी बांधणी , विरळणी,डिपिंग, खते टाकणे, थिनिंग आदी कामे मजुरांकडून ठरवून घेऊन केली जातात.

द्राक्षबागांमध्ये मजुरिचा कालावधी  हा एप्रिल, मे, जून,  सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आहे. द्राक्षपट्ट्यातील तासगाव, मिरज, पलूस तालुक्यांत द्राक्षाचे क्षेत्र मोठे असल्याने येथे मजुरांची संख्या अधिक आहे. हे मजूर शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये राहतात. या तालुक्‍यानंतर सध्या कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्‍यांतही मजुरांना कामानिमित्त मागणी वाढली आहे. बिहारचे शेतमजूर शेतावरच शेतकऱ्यांच्या तयार केलेल्या शेडमध्ये राहतात. शेतमालकांकडून त्यांना शेडबरोबर वीज, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस द्यावा लागतो. हे मजूर ४-५ पासून २०-२५ मजुरांच्या संख्येने एका शेतकऱ्याकडे राहतात.

सर्वसाधारण चार-पाच  एकरांपासून २५ ते ३० एकरांसाठी २५ बिहारी काम करतात. तसेच स्वतः स्वयंपाक करून खातात. हंगामात स्थानिक पुरुष मजूर सकाळी आठ ते दुपारी तीन अशा सात तासांसाठी ४००, तर महिला ३०० रुपये घेतात. बिहारी मजूर स्थानिक मजुरांच्या तुलनेत थोडी कमी मजुरी म्हणजे ४०० रुपये घेऊन सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत काम करतात, अनेक शेतकऱ्यांनी बिहारी 

मजुरांच्या टोळ्याच आणल्या आहेत, स्थानिक मजुरांपेक्षा एकरी १५ हजार रुपयांची बचत होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडते. 


Monday, December 19, 2022

सांगलीकरांना ड्रायपोर्ट व द्राक्ष संशोधन केंद्राची प्रतीक्षा

सांगलीला मोठ्या उद्योगांची गरज: बेरोजगारांच्या संख्येत वाढ

सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

औद्योगिक, कृषी पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग, प्रकल्प आलेला नाही. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील ड्रायपोर्टचे घोंगडे गेल्या पाच- सहा वर्षांपासून भिजत पडले आहे. ड्रायपोर्ट सुरू झाल्यास द्राक्ष, डाळींब, बेदाणा, हळदीसह अन्य शेतीमालाची वाहतूक करणे सोपे जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र अजूनही त्याची प्रतिक्षाच आहे. हीच अवस्था द्राक्ष संशोधन केंद्राची आहे.  त्याचीही अजून सुरुवात झालेली नाही. यासाठी यशस्वी राजकीय पाठपुराव्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या रांजणी  गावाच्या हद्दीत ड्रायपोर्टची घोषणा करण्यात आली. आता त्याला पाच- सहा वर्षे झाली.  सुरुवातीला रांजणी येथील शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव होता. जागेच्या भू- संपादनास महामंडळाने परवानगी दिली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. यानंतर रांजणी येथील गट क्रमांक 1815 ते 1827, 1830 अ व ब आणि 1831 मधील एकूण 107 एकर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारणीचा  निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याबाबतही प्रत्यक्षात प्रशासनाकडून कार्यवाही होताना दिसत नाही. ड्रायपोर्ट झाल्यास द्राक्ष, डाळींब, बेदाणा, हळदीसह अन्य शेतमालाची वाहतूक करणे सोपे जाणार आहे. शिवाय हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होईल अशी अपेक्षा आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणांचा ढिसाळपणा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे ड्रायपोर्टचे काम रखडले आहे. या मागणीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी ड्रायपोर्टला मुहूर्त मिळत नसल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. प्रकल्प  होणार की नाही, अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.  

हीच अवस्था द्राक्ष संशोधन केंद्राची आहे. सांगली जिल्हा द्राक्ष व बेदाण्यांसाठी प्रसिद्ध  आहे. देशातील एकूण बेदाणा उत्पादनात 80 टक्के वाटा हा सांगली जिल्ह्याचा आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव, 'आटपाडी, कवठेमहांकाळ ही बेदाणा उत्पादक केंद्रे आहेत. सांगलीत बेदाण्याचे अंदाजे वार्षिक उत्पादन 1.25 लाख टन असून त्यातील 30-40 टक्के निर्यात होते. सुमारे  900 पेक्षा जास्त व्यापारी केंद्रे आणि 70 शीतगृहे असलेल्या तासगावमध्ये  1994 मध्ये जिल्हा लिलाव बाजार सुरू  झाला.  बेदाणा  उत्पादनासाठी थॉमसन, सीडलेस, माणिकचमन,  सोनाका आणि तास-ए- गणेश या बिया नसलेल्या   द्राक्षांचा जातींना प्राधान्य दिले जाते. नवीन क्षेत्रामध्ये द्राक्षांचा आर्क विस्तार आणि संवर्धनासाठी जिल्ह्याला वाव आहे. ज्याकरिता नियमित संशोधन आणि विकास समर्थन आवश्यक आहे. द्राक्ष हे उच्च मूल्याचे पीक आहे. परंतु अलिकडे जास्त उत्पादनांची मागणी आहे. हवामानाच्या घटकांमधील स्केसोनल फरकामुळे, प्रदेश नियमित पूर, जैविक आणि अजैविक तणावाच्या उच्च घटनांनी ग्रस्त आहे. यामुळे उत्पादन. खर्चात वाढ होते आणि जिल्ह्यातील बेदाणा उत्पादनात अडथळे येतात आणि जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन भविष्यातील उत्पादन टिकून राहिले पाहिजे.यासाठी संशोधनाची गरज आहे.  या भागातील द्राक्ष उद्योगाची गरज पूर्ण करण्यासाठी व या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होणेसाठी सांगली  जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्राची  स्थापना करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केंद्रिय कृषीमंत्र्यांच्याकडे केली आहे. मात्र याबाबतही अद्यापपर्यंत  कोणतीही हालचाल दिसून येत नाही.


Sunday, December 18, 2022

पारंपरिक शाहिरी गीतप्रकारांमधून इतिहासाचे पाठ


शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी म्हणून डॉ. गंगाधर बापू रासगे यांनी अभ्यासक्रमातील पाठांवर आधारित गाण्यांचा वापर सुरू केला. शाहिरी गीत प्रकारांमधील पोवाडा, फटका, सवालजबाब याचबरोबर लोकसंगीताच्या धर्तीवर भारुड, लावणी आदी व जानपद गीतांतील ओव्या, पाळणा यांची रचना केली आहे. ऐतिहासिक घटना गद्यात शिकवण्याबरोबरच ती पारंपारिक गीतांच्या चालींतून सादर केल्यास मुले - मुली अध्यापनात रस घेतात. इतिहास विषय त्यांना आवडू लागतो. रासगे म्हणाले, “इतिहास हा विषय विद्यार्थीदशेत अनेकांना रुक्ष, कंटाळवाणा वाटू शकतो. मी अनेक वर्षे दिवसाच्या व रात्रीच्या शाळेतही इतिहास शिकवतो. एकतीस वर्षांपासून पुस्तकातील घटना, मजकूर यांवर आधारित गाणी रचून इतिहासाचा पाठ अधिक रंजक करण्याची युक्‍ती मी वापरत आहे. लहानपणी आईकडून जात्यावरील ओव्या ऐकल्या. इयत्ता ६ वीत असताना घोगरेगुरुजींनी मला पोवाडा गायला शिकवले होते. त्या चालींमध्ये पाठातील शब्द भरले." 

रासगे यांनी स्पष्ट केलं की, इतिहास हा विषय पाठांतराचा असू नये. तो किचकट व कंटाळवाणा वाटू नये. लक्ष देऊन ऐकल्यास लक्षात रहावा, यासाठी मी गीतरचनांचा केलेला हा प्रयोग उपयुक्त ठरला. अनेक शाळा व शिक्षकांच्या प्रशिक्षणवर्गात प्रात्यक्षिकाची संधी मिळाली. गीतांचे प्रकार वाढले. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाचा 'पाळणा', फ्रेंच राज्यक्रांतीसाठी 'सवाल जबाब', रशियन राज्यक्रांतीसाठी कव्वाली, औद्योगिक क्रांतीवरील 'भारुड, भारतातील १८५७ च्या बंडावर 'पोवाडा' हे प्रयोग सफल झाले. शिवाय सामाजिक वाहतूक नियंत्रणासारख्या प्रबोधनपर विषयावर ''फटका"' लिहिला. यामुळे मला अनेक संधी, पुरस्कार व सन्मान मिळत गेले. डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या प्रोत्साहनामुळेच मी 'पोवाडा या काव्यप्रकाराचा समग्र अभ्यास' या विषयात पोएच.डी. साठी संशोधन केले आहे. - नीला शर्मा 


Friday, December 16, 2022

राज्यात वर्षभरात ८५८ तरुणींचे घरातून पलायन

 देशात सर्वाधिक प्रमाण; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाची आकडेवारी

सांगली, (न्यूज नेटवर्क)-

 प्रेमसंबंध, अनैतिक नातेसंबंध किंवा विविध आमिषांना बळी पडून घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून गेल्या वर्षभरात ८५८ तरुणी घरातून पळून गेल्या आहेत. त्याचबरोबर पळून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यात देशात महाराष्ट्र पोलीसच अव्वल आहेत. घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील आकडेवारीतून उजेडात आली आहे. या अहवालानुसार घरातून पळून जाणाऱ्या तरुणींच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रापाठोपाठ ओदिशाचा क्रमांक लागतो. ओदिशात गेल्या वर्षभरात ७३५ तरुणी घर सोडून गेल्या आहेत.

अल्पवयीन मुलींसह तरुणी-महिला घरातून पळून जाण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष किंवा अनैतिक संबंध, लिव्ह इन रिलेशन या कारणांमुळे सर्वाधिक तरुणी-महिला घरातून पळून जात आहेत. प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंधाला कुटुंबीयांकडून होणारा विरोध बघता अनेक तरुणी, महिला घरातून प्रियकराबरोबर पळून जातात. तसेच शाळकरी मुलीसुद्धा प्रेम या शब्दाचा अर्थ कळण्यापूर्वीच प्रियकरासोबत संसार थाटण्याचे स्वप्न बघत घरातून निघून जातात. काही तरुणी नोकरी करण्यासाठी, चित्रपटात काम करण्यासाठी किंवा कामाच्या शोधात घर सोडतात. काही तरुणी घरातल्यांकडून होणाऱ्या त्रासामुळेही घरातून पळून जातात. शरीरविक्री, आलिशान जीवन जगण्याची ओढ आदी कारणांमुळेही तरुणी घर सोडतात, असे सांगितले जाते.

शोध घेण्यात महाराष्ट्र पोलीस अग्रेसर

महाराष्ट्र सरकारने मानवी तस्करी विरोधी पथकाची स्थापना (एएचटीयू) केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलीस आयुक्तालयात एएचटीयूचे पथक कार्यरत आहे. अपहरण झालेल्या, पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्याचे काम हे पथक करते. गेल्या वर्षभरात एएचटीयूने सर्वाधिक मुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

महाराष्ट्रातून 858 तरुणी हरवल्याची नोंद आहे. त्यातील 819 तरुणी सापडल्या. ओडीसामधून 735 तरुणी बेपत्ता झाल्या, त्यातील 389 सापडल्या. तेलंगणा राज्यातून 659 तरुणी बेपत्ता झाल्या, त्यापैकी 574 सापडल्या. आंध्रप्रदेश मधून 308 बेपत्ता झाल्या त्यापैकी 267 सापडल्या. आसाममधून 298 मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी 141 सापडल्या. 

Monday, December 12, 2022

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जत शहर अध्यक्षपदी शफीक इनामदार

निवडीबद्दल विविध संघटनांकडून श्री. इनामदार यांचा सत्कार 


सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जत शहर अध्यक्षपदी  शफीक इनामदार यांची निवड करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण, सुरेश शिंदे यांच्या हस्ते नुकतेच त्यांना  निवडीचे पत्र देण्यात आले आहे. या त्यांच्या निवडीबद्दल विविध संघटनांच्यावतीने जत येथील मंगळवार पेठ येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. शाल, फेटा आणि पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेस सेवादल अध्यक्ष मोहन माने-पाटील, शरणाप्पा अक्की, जतचे पोलीसपाटील मदन पाटील, नंदकुमार लोणी, सुमंत गायकवाड, मनोज मोगली, मच्छिंद्र ऐनापुरे, नंदकुमार कनशेट्टी, शिवकुमार दुगणी, बसवराज निसुरे, अरविंद जाधव, शरद सोलापुरे , गणेश सावंत आदी उपस्थित होते.

समाजसेवेची आवड असलेल्या शफीक इनामदार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जत शहरात वाढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. 


Sunday, December 11, 2022

सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर


सांगली,( न्यूज नेटवर्क)-

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यात 79 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. माडग्याळ, डफळापूर, उमदीसह परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या निवडणुकीत पारंपरिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियावरील प्रचाराने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याने सोशल मीडियावर प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडत आहे. 

फोटो, व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश मोठय़ा प्रमाणात शेअर केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी मार्ग म्हणून सोशल मीडियाचा वापर ग्रामपंचायत निवडणुकीत होत आहे. निवडणुका म्हटल्या की प्रचार आणि प्रभागात मोठमोठे होर्डिंग लावून जाहिरात करणे आलेच; परंतु यंदाच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावर पोस्टचा अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस पडत आहे. त्यावर उमेदवाराकडून मतदानाचे आवाहन व एकमेकांच्या उमेदवारांना करण्यात आलेले ट्रोल यामुळे निवडणुकीत सोशल मीडिया असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या पॅनलचे व प्रभागातील काही उत्साही कार्यकर्त्यांनी आपापल्या पॅनलचे व प्रभागातील उमेदवारांचे फोटो स्टेटसवर ठेवून वेगवेगळ्या गाण्यांचे, प्रसिद्ध व वक्त्याच्या तोंडची वाक्ये व संगीताची जोड देऊन दिवस रात्र सोशल मीडियावर अपडेट राहात आहेत. 

प्रत्येक आघाडीने गावातील दैवतांना श्रीफळ वाढवून, गावातून पदयात्रा काढून प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. व्हाटसअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा तरुणाईकडून मोठय़ा प्रमाणात वापर होताना दिसत आहे. यातून ग्रामपंचायतीची सत्ता मिळवण्यासाठी गावागावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची कानोकान खबर सोशल मीडियावर मिळत आहे. काही प्रभागातील उमेदवाराकडून सकाळी उठल्यापासून मतदारांना सातत्याने भविष्यात आपण किती उत्कृष्ट काम करणारा उमेदवार आहे, अशी माहिती पाठवली जात आहे. या निवडणुकीत सर्वच आघाडय़ाने सोशल मीडियाचा प्रचारात वापर सुरू करुन आघाडी घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करत ग्रामपंचायत निवडणुकीचे सत्ता जिंकण्यासाठी सर्वच पॅनलचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यामुळे या माध्यमाचा फायदा कोणत्या गटाला होणार? यात कोण बाजी मारणार? हे 20 डिसेंबरनंतरच कळणार आहे, हे मात्र नक्की.


दिशाभूल करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ १४ डिसेंबर रोजी जत बंदची हाक

संजय कांबळे: विद्यमान व पूर्वीच्या सरकारकडून दिशाभूल

सांगली, (मच्छिंद्र ऐनापुरे) :

महाविकास आघाडीचे  तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वर्षभरात पाणी देऊ, असे सांगितले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विस्तारित म्हैसाळ योजनेला  दोन हजार कोटी रुपये देऊ म्हणतात. मुळात या योजनेला प्रशासकीय मान्यता नाही. मग दोन हजार कोटी कसे देणार, याचा पत्ता नाही. यानिमित्ताने केवळ जत तालुक्याच्या जनतेची दिशाभूल चालवली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या १४ डिसेंबरला जत तालुंका बंद ठेवून निषेध करू, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

जत बंद इशाऱ्याची शासनाने दखल घेतली नाही  तर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. जत तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्‍यातील १० गावांत आणि ९१ वाड्या-वस्त्यांवर मराठी प्राथमिक शाळा नाहीत. तालुक्याला रस्त्याचा अनुशेष पूर्ण क्षमतेने दिला जात नाही. जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालयापर्यंतचा रस्ता कित्येक वर्षे झाली दुरुस्त होत नाही. तालुका विभाजन होत नाही.  तातडीने उमदी व माडग्याळ तालुका करून या ठिकाणी पंचतारांकित एमआयडीसी व्हावी. जत शहरासाठी ६४ कोटींची पाणी योजना मंजुर करावी, अशा अनेक मागण्या श्री. कांबळे यांनी मांडल्या. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने जनतेच्या अनेक प्रश्‍नांसाठी आंदोलन केले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही हे दुर्दैव आहे. जिल्हा नियोजन समितीवर प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य नियुक्त व्हावेत. मुचंडी, कोटटलगीसह अन्य रस्त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केली. यावेळी संजय कांबळे-पाटील, सुभाष कांबळे, हेमंत चौगुले, विकास साबळे, शंकर वाघमारे, विलास बाबर आदी उपस्थित होते. 


Saturday, December 10, 2022

सांगली जिल्ह्यात ३८ गावचे सरपंच बिनविरोध

सरपंचपदासाठी ११२०, सदस्यांसाठी ८६०४ निवडणूकीच्या रिंगणात

सांगली,(न्यूज नेटवर्क):

 सांगली जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. अनेक  ग्रामपंचायतीमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत. सांगली  जिल्‍ह्यातील सरपंच पदाच्या ४०९ जागांसाठी १ हजार १२० तर ४ हजार १४६ सदस्य पदांसाठी तब्बल ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या  मैदानात आहेत. दरम्यान सरपंच पदाचे १ हजार ३०२ व सदस्य पदासाठीच्या ५ हजार ५६६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. उर्वरित ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम आणि दंड या भेदाचाही काही ठिकाणी वापर करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक पहायला मिळाली. बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील ४४७  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुक उतरल्याने विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे बंडखोर इच्छुकांची समजूत काढून त्यांचे अर्ज माघार घेता-घेता नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. निवडणुकीसाठी सरपंच आणि सरदस्यपदांच्या एकूण ४७१६ जागा आहेत. त्यासाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सरपंचपदाच्या ४४७ जागांसाठी दोन हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३८ सरपंचांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ४०९ जागांसाठी एक हजार १२० उमेदवार रिंगणात आहेत, सदस्यपदाच्या चार हजार ६९ जागांसाठी १४ हजार ३३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच हजार ५६६ जणांनी माघार घेतली, सदस्यांच्या ५७० जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ३ हजार ६९९ जागांसाठी आठ हजार ६०४ उमेदवार मैदानात उतरले आहेत. म्हणजेच सरपंच आणि सदस्य पदांच्या एकूण ४५५५ जागांसाठी ९७२४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. येलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडीच्या सरपंचासह सदस्य बिनविरोध झाले. याशिवाय तांदूळवाडी आणि बनेवाडीचे सरपंचही बिनविरोध निवडून गेले. शिराळा तालुक्यातील कोकरुड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि आरेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कडेगाव तालुक्यातील विहापूर, येवलेवाडी, खानापूर तालुक्यातील गार्डी, ढवलेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी, मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील रेवनाळ, शिंगणापूर तर पलूस तालुक्यातील पुणदीवाडी आणि हजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले. 

शासनाने ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी थेटदेण्यास  सुरवात केली आहे. त्यामुळे आता थेट  शासनाकडूनच निधी आपल्याकडे येणार असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  इच्छुकांची संख्या वाढली आहे. अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायत सदस्य चांगला, असे कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे स्थानिक नेत्यांसमोर डोकेदुखी वाढली आहे. 


Sunday, December 4, 2022

नूलमध्ये अभ्यासासाठी टीव्ही, मोबाईलला 'ब्रेक'


सांगली ,(जत न्यूज नेटवर्क)-

मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकामुळे होणारे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नूलमधील (ता. गडहिंग्लज) पालकांनी रोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत गावातील सर्व टीव्ही ब मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच प्रियांका यादव यांच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या महिला पालक मेळाव्यात हा निर्धार केला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी या गावांनीदेखील असा उपक्रम सुरू केला आहे. 

सरपंच यादव यांच्या पुढाकाराने प्राचार्य जे. डी. वडर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित केला होता. सरपंच यादव म्हणाल्या, “मुलांना जबाबदार नागरिक घडविण्यासाठी काही गोष्टींचे स्वातंत्र देण्याबरोबरच काही गोष्टींवर निर्बंधही घालावे लागतील. त्यासाठी रोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत सर्व पालकांनी आपल्या घरातील टीव्ही व मोबाईल बंद ठेवून मुलांचा अभ्यास घ्यावा. सरपंच यादव यांच्या या आवाहनाला सर्व महिलांनी हात उंचावून संमती देत ठराव केला. 

मुले तास-तास मोबाइलला चिकटून असतात. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिकांत गुंतून जातात. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो.  दररोज नित्यनियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीवर लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.  ठराविक वेळेत मोबाईल बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचा  स्क्रीन टाइम कमी होईल. सुरवातीला या प्रयोगाच्या  अंमलबजावणीत अडचणी येतील. पण त्यातून एक चांगला संस्कारही मुलांवर होईल, पुढे ही मुले स्वतःहून मोबाईल वापरणार नाहीत. 

Sunday, November 27, 2022

शेडयाळ गावात भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार


जत,( जत न्यूज नेटवर्क)-

 एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव शेडयाळ (ता. जत) येथील मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला. त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. यावेळी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, फळे आदींचा बाजार गावातल्या ग्रामपंचायतीच्या आवारात थाटला होता. यामुळे गावाला आठवडी बाजाराचे स्वरूप आले होते.

बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व गिऱ्हाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार गावातच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बाजारात कांदे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, मुळा, मूग, चवळी, अंडी, ऊस, नारळ, कडीपत्ता, आले, पालक, मिरची, लिंबू, दही, शेंगदाणे, हरभरा भाजी, कारले विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध होता. दोन अडीच तासांच्या बाजारात 10 ते 12 हजार रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनी कौतुक केले. 

 बाजार भरविण्यासाठी मुख्याध्यापक  बाबासाहेब पांढरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिलदेव पारसे, गोपाळ बिराजदार, मनोहर जाधव, सुभाष मासाळ, विजय लिगाडे, अंकुश फाळके, श्री. मड्डी , श्रीमती गुगवाड , भरत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. यासाठी पालक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.



Thursday, November 24, 2022

जतचा मुद्दा कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक उखरून काढला

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जतमधील काही गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, या भागातील लोकांनी अपवाद वगळता कधीही कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही; परंतु १९५६ मध्ये सीमाप्रश्न निर्माण झाल्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जाण्याची लोकेच्छा वेगवेगळ्या मार्गाने दाखवून दिली आहे. 

१ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्य पुनर्रचना करण्यात आली. यावेळी बेळगाव,बिदर ब गुलबर्गा जिल्ह्यातील मराठी भाषिक गावे तत्कालीन म्हैसूर राज्यात घालण्यात आली. या विरोधात ६६ वर्षांपासून मराठी जनता विविध मार्गाने या प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. २५ जून १९५७ रोजी महाराष्ट्राचे  यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषिक निवड करून महाराष्ट्रात  विलीन करावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती भाषावार प्रांतरचना करताना दक्षिण सोलापूर, जत, अक्कलकोट, मंगळवेढा, गडहिंग्लज व शिरोळ तालुक्‍यातील 260  कन्नड गावे महाराष्ट्रात गेली आहेत, असे सांगत म्हैसूर सरकारनेही केंद्राकडे अर्ज दिला होता. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा त्यावेळच्या झोनल कौन्सिलिंगने लक्ष दिले नाही.

कर्नाटकात मराठी भाषिकांचा मोठा प्रदेश 

 कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांनी मराठी भाषिकांच्या मोठा प्रदेश म्हैसूर राज्यात आला आहे, तो परत दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांची ही घोषणा कर्नाटकातील इतर राजकर्त्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे सीमाप्रश्‍न सुटावा, यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांनी आपला लढा  सुरूच ठेवला आहे. मात्र, कर्नाटकाने अनेकदा मागणी वरून देखील  महाराष्ट्रात असलेल्या कन्नड गावातील नागरिकांनी कधीही आंदोलन  किंवा  लोकेच्छा दाखवून  दिलेली  नाही.  त्यामुळे  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला तरी त्या भागातील नागरिकांचा याला विरोध आहे. 

महाजन आयोगाची स्थापना

 लोकशाही मार्गाने प्रश्‍न सुटत नसल्याचे दिसून आल्यानंतर सेनापती बापट यांनी २५ मे १९६६ पासून उपोषणाला सुरुवात केली. यामध्ये सीमाभागातील आमदार बा. र. सुंठणकर, समितीचे सचिव बळवंतराव सायनाक व पुंडलिकजी कातगडे सहभागी झाले होते. त्यानंतर याबाबत बॅरिस्टर नाथ पै यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली. त्यानंतर सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली.

आयोगाचा विसंगत अहवाल

महाजन आयोगाला महाराष्ट्र सरकारने लोकेच्छा , भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्य आणि खेडे हाच घटक याचा विचार करून गावांची देवाणघेवाण करावी, अशी मागणी केली होती. मात्र महाजन आयोगाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत विसंगत अहवाल दिला. महाराष्ट्र सरकारने 865 गावांची मागणी केलेली असताना फक्त 264  गावे महाराष्ट्राला तर कर्नाटक सरकारला 247 गावे कर्नाटकला देण्यात आली. मात्र महाराष्ट्र सरकारने हा अहवाल फेटाळला. तसेच हा अहवाल संसदेत ठेवून देखील त्यावर चर्चा होऊ शकली नाही. 

2016 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील गावांसाठी चार टीएमसी अतिरिक्त पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने चार टीएमसी पाण्याच्या बदल्यात महाराष्ट्रातील गावांसाठी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी केलेली होती. त्यांनतर मानवतेच्या दृष्टिकोनातून आजही महाराष्ट्राकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही कर्नाटक सरकारने दोन टीएमसी पाणी देण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली असून पाणी समस्या असलेल्या गावांवरच दावा केला आहे. कर्नाटक सरकारने पाणी दिले असते तर येथील समस्या कधीच दूर झाली असती, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

जाणीवपूर्वक मुद्दा उकरून काढला 

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्‍नी उच्चाधिकार कमिटीची बैठक घेऊन सीमाप्रश्‍नाला चालना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बोम्मई सरकारने जाणीवपूर्वक जतचा मुद्दा उकरून काढला आहे. तसेच सीमाभागात सातत्याने कन्नडची सक्ती करणाऱ्या आणि मराठी भाषिकांना  डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकने प्रश्‍न सोडवण्यात खो घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे मत व्यक्‍त होत आहे. 

पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी योजना हाती 

जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असल्याने मागणी करूनही पाण्याची पूर्तता होत नसल्याने २०१२ मध्ये जत तालुक्‍यातील ४० गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता. या व्यतिरिक जत भागातून कधीही कर्नाटकात जाण्याबाबत आवाज उठविण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. जतमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना देखील हाती घेतल्या जात आहेत. 

माहिती जाणून घ्या - 'इट राईट इंडिया’ म्हणजे काय?

भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक ठिकाणे श्रद्धेची आहे. अशा ठिकाणचे अन्न शुद्ध अन्‌ पवित्र मानले जाते. धार्मिक संस्थांच्या प्रसादालय, लंगर, भंडाऱ्यातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत भोग प्रमाणिकरण केले जाते. हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे मानांकन केले जाते. कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ असल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्याधर्तीवर उत्तरेत प्रसादालय ‘भोग'' म्हणून संबोधले जाणाऱ्या धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्न सुरक्षा व स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया‘ हा उपक्रम राबवला जातो. प्रसाद, अन्न पदार्थ तयार करताना हाताळणी आणि अन्नपदार्थांच्या वाटपासह विक्रेत्यांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्याचा त्यात समावेश आहे. उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून धार्मिक स्थळांची निवड केली जाते. अशा ठिकाणी अन्न सुरक्षा व मानांकन कायदा २००६ अंतर्गत परवाना देण्यात येतो. आहे.अन्न सुरक्षा व मानांकन विभागाच्या माध्यमातून प्रमाणिकरण केले जाते. देशातील ७५ जिल्ह्यांतील ३०० धार्मिक स्थळावर या उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची हमी देण्यात आली आहे. राज्यातील दादरचे सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचे गुरुद्वारा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर इथे मोठ्या प्रमाणात भाविक प्रसाद घेतात. तिथे या उपक्रमाची अंमलबजावणी यापूर्वी सुरु करण्यात आली. श्री सप्तशृंग देवी गड आणि त्र्यंबकेश्‍वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथील प्रसादाचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ रामदास काय म्हणतात?

पोट भरणे हे यज्ञकर्मवदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥|| जय जय रघुवीर समर्थ ||समर्थ रामदास स्वामी यांचा हा श्‍लोक आहे. अर्थात, तोंडात घास घेताना श्री हरीचे फुकटचे नाव घेतल्याने हवन होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न साक्षात परब्रह्म आहे. पोटभरणे म्हणजे जेवण असे नाही, तर तो एक प्रकारचा यज्ञकर्म आहे, असे समर्थांनी या श्लोकात म्हटले आहे."

सांगली जिल्ह्यात 699 ग्रामपंचायती; 71 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाहीत

माहिती जाणून घ्या

सर्वाधिक जत तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नाहीत 

सांगली जिल्ह्याची स्थापना 1961 साली झाली. जिल्ह्यात दहा तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये मिळून एकूण 699 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या आता तीस लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची लोकसंख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नाहीत. यांपैकी सर्वाधिक 26  ग्रामपंचायती जत तालुक्यातील आहेत. जत तालुका सांगली जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका आहे. 120 गावांचा तालुका आहे. यामध्ये ऐतिहासिक उमराणी गावासह कोंतेव बोबलाद, बालगाव, अंकलगी या मोठ्या गावांचाही समावेश आहे. प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यातील घनघोर युद्ध उमराणी येथे झाले होते. अशा या शिवकालीन , प्रसिद्ध गावची लोकसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. मात्र तरीही या गावाला अद्याप ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत नाही. जिल्ह्यात स्वतःचे कार्यालय नसलेल्या 71 ग्रामपंचायतींची लोकसंख्या आता सरासरी दोन हजारांच्या घरात आहे. यातील 16 गावांची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार हजारांच्या आतच आहे. मात्र उर्वरित गावची लोकसंख्या अधिक असूनही त्यांना स्वतःची इमारत नाही. इमारती नसलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे: तासगाव 6, कवठेमहांकाळ2, आटपाडी4, कडेगाव 4, पलूस 2, मिरज 4, शिराळा 8, खानापूर7, वाळवा 8 

Wednesday, November 23, 2022

आरोग्यादायी रानभाज्यांचा आहारात समावेश करा: डॉ. विनोद शिंपले


जत,(जत न्यूज नेटवर्क) -

 आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार केल्याने चुकीच्या आहाराचे सेवन केले जात आहे. त्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. निरोगी प्रकृती राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. विनोद शिंपले यांनी केले. डॉ. शिंपले जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित "औषधी रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा" यांच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील  होते.

डॉ. शिंपले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, जगातील सतरा देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. त्यात भारताचा समावेश आहे. आपल्या देशातील उत्तर-पूर्व हिमालय भूप्रदेश (ईशान्य भारत), पश्चिम घाट परिसर, उत्तर-पश्चिम हिमालय भूप्रदेश व अंदमान-निकोबार बेटांचा परिसर येथे सुमारे 48 हजार वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली असून, यापैकी 17500 प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. भारतात आठ हजार औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत, तर गवतांच्या 1200 प्रजाती आहेत. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेपैकी 7.1 टक्के वनस्पती, तर एकूण प्राणी प्रजातींपैकी 6.7 टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात. तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने भूतलावरील 35 भूप्रदेश 'अती संवेदनशील' प्रदेशांपैकी आपल्या देशातील उत्तरपूर्व हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसर 'जागतिक हॉट स्पॉट रिजीनस' म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात म्हणजेच सह्याद्री  परिसरात महाराष्ट्रातील 12 जिल्हे व 62 तालुके समाविष्ट आहेत व येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे.  निसर्गातील वनस्पती विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मानवी जीवनक्रमात माणसाचा प्रत्येकक्षणी वनस्पतींशी संबंध येतो. शेतीप्रधान भारतात विविध पिकांच्या सुमारे 166 प्रमुख प्रजाती आहेत आणि सुमारे 320 प्रजाती या पिकांच्या जाती आहेत.

मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाज्यांच्या सुमारे 55 प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाजींच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशांतून या प्रजाती अनेक वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाच्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.

अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. यामुळे भाज्यांवर  जीवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी भाजींच्या पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात विषारी रासायनिक जीवाणू-विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसांमध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, पशांचे, पोटाचे विकार इ. रोग होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना एक पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे. आपल्या सभोवताली शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. आपल्या सभोवताली असणान्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबतची प्राथमिक स्वरूपाची माहिती खेड्यात, वनात राहणाऱयांना ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे व पाककला स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.

मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, भाज्यांमध्ये अनेक घटक असतात. पालेभाज्यांतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे तंतूमय पदार्थ जे पालेभाज्यांची पाने, शिरा, देठे, फळांची साल, तसेच खोडांत मोठ्या प्रमाणात असतात. भाज्यांमध्ये जीवनसत्वे व खनिजे (मिनरल्स) प्रमाणात असतात ती यांद्वारे शोषली जातात. त्यामुळे शरीरातील सप्तधातूंची कार्ये चांगल्या पद्धतीने चालतात. तंतूमय पदार्थ लहान आतडयांत शोषले जात नाहीत, त्यामुळे ते जसेच्या तसे मोठ्या आतड्यात येतात. त्यामुळे मलाचे प्रमाण वाढते, त्यास मऊपणा येतो आणि मलविर्सजनास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपेंडिसायटीस, कोलायटीस किंवा इतर आतड्याचे विकार होत नाहीत. मोठ्या आतड्यात जंतूपासून निर्माण होणारे हानिकारक द्रव्य तसेच इतर सेंद्रीय पदार्थ तंतू शोषून घेतात आणि शरीराबाहेर टाकण्यास महत्त्वाची मदत करतात. प्रकृती निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व इतर भाज्या अत्यंत आवश्यक आहेत. पालेभाज्या "सारक' असतात, म्हणूनच स्थूल शरीर असणाऱ्यांनी तसेच मधुमेह, बद्धकोष्ठ, अपचनांचे विकार असणान्यांनी अधिक प्रमाणात पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्यांत तंतूप्रमाणेच पाणीही जास्त प्रमाणात असते. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ प्रत्येक पालेभाजीत व इतर भाज्यांत कमी अधिक प्रमाणात असतात.

आधुनिक जीवनशैलीमुळे बैठे काम, व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे, यामुळे शौचास साफ न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध अल्सर, पित्ताचा त्रास आदि विकारांचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे खानावळीतील जेवण न खाता घरी बनविलेल्या रानभाज्यांचा आरोग्य टिकविण्यासाठी आहारात वापर करावा असे शेवटी डॉ. शिंपले यांनी आवाहन केले. सदर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन करून माहिती दिली. तसेच रानभाज्यांची पाककला सादर केली. 

स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर सौदागर यांनी  तर आभार प्रा. मल्लाप्पा सज्जन यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन पाटील, प्रा. महादेव करेन्नवार, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. शिवाजी कुलाळ, प्रा. निर्मला मोरे, प्रा. संगीता देशमुख, प्रा. ललीता सपताळ व विद्यार्थी उपस्थित होते.



मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' कादंबरीला पुरस्कार


सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील लेखिका मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या मराठी कादंबरीला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा लक्षवेधी कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीरामपूर येथे 4 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.

लोककलावंत मजनुभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी मेघा रमेश पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या कादंबरीस 'लक्षवेधी कादंबरी लेखन' पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

मेघा पाटील यांनी आतापर्यंत  'पुढचं पाऊल'  (काव्यसंग्रह) , 'आलकीचं लगीन' (कथासंग्रह) तसेच 'उंबरठ्यावरचा नाल', 'विस्कटलेली चौकट', 'शेतकरी नवरा', 'सुलवान' या चार कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना साहित्य कलायात्री प्रकाशनकडून कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, युगंधर काव्यभूषण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. तसेच गारगोटी, अमरावती, पंढरपूर, नागपूर, जामखेड, अहमदनगर, पुणे, सटाणा, औरंगाबाद येथील विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विविध काव्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे मिळवली आहेत. शेटफळे (आटपाडी) येथील कविसंमेलनात अध्यक्षस्थान भूषवले आहे. विविध कविसंमेलनात काव्य वाचन केले आहे.

Tuesday, October 18, 2022

'डॉल्फिन नेचर'तर्फे 19 लाखांवर बियांचे संकलन आणि वाटप


(मच्छिंद्र ऐनापुरे)

सांगली : पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील विविध संस्था-व्यक्ती आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये सांगलीतील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप संस्थेने अविरत प्रयत्न कायम ठेवले आहेत. या संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी बिया संकलन आणि या बियाणांचे पश्‍चिम घाटात  रोपण हा उपक्रम वैशिष्टयपूर्ण असा आहे. तब्बल 20 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आत्तापर्यंत 19 लाखांवर बियाण्यांचे संकलन आणि वाटप झाले आहे. 

 देशी उपयुक्त झाडांच्या बियांचा रोपनिर्मितीसाठी, वनाच्छादनासाठी, तसेच भेट देऊन पर्यावरण संवर्धनात त्या-त्या वर्षी उपयोग केला गेला. पर्यावण अभ्यासक व 'डॉल्फिन'चे संस्थापक प्रा. शशिकांत ऐनापुरे यांनी 2003 मध्ये ही संकल्पना मांडली. 20 वर्षे स्पर्धेतून देशी उपयुक्‍त झाडांच्या बियांचे संकलन केले गेले. या दोन दशकात तब्बळ 19 लाखांवर बियांचे संकलन झाले. झाडावरून पडणाऱ्या बिया व फळे खाल्ल्यानंतर सहजपणे फेकून दिल्या जाणाऱ्या बिया पडून वाया जातात. त्यापासून फारशी रोप निर्मिती होत नाही.मात्र बिया व्यवस्थितपणे जमिनीत रुजवल्या तर रोपनिर्मिती, वृक्षानिर्मिती होऊ शकते. हे विद्यार्थी आणि सामान्य लोकांमध्ये रुजविण्याचे काम डॉल्फिन नेचर संस्थेने केले. 

2003 ते 2015 या कालावधीत 13 वर्षे सागरेश्वर या मानवनिर्मित सांगली जिल्ह्यातील अभयारण्यात बालोद्यान मनोऱ्याच्या पूर्वेस घळीत हजारो बिया दरवर्षी 'डॉल्फिन'तर्फे टोकण्यात आल्या. हरणांसाठी, तृणभक्षी प्राण्यांसाठी अन्न, वनाच्छादन वाढावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला गेला. अनेक उपयुक्त झाडेही लावण्यात आली. 2016 पासून मिरजजवळीलदंडोबा डोंगर परिसरात तर 2018 पासून आटपाडी तालुक्यातील जकाई दरा खोऱ्यात बीजरोपणाचे कार्य 'डॉल्फिन' प्रतिवर्षी करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या मजले येथेही गावालगतच्या डोंगराळ भागात लावलेली चिंच, बेल, शमीची झाडे आनंदाने बहरत आहेत. आळते वन उद्यान क्षेत्रातदेखील बिया टोकल्या आहेत. पेरणी करण्यापूर्वी काही बियाण्यांवर नैसर्गिक प्रक्रिया केली जाते. संकलित बिया राखेत मिसळून ठेवल्या जातात. स्थानिक बिया ज्या- त्या भागात टोकल्या जातात.

 शाळा- कॉलेज, सामाजिक संस्थांना बियांपासून बनवण्यात आलेले 'सिडबॉल' पुरवले जातात. वैयक्तिक भेटीसाठीही काही लोक बिया नेतात. संस्थेने 'सिडबँक' सुरू केली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना 'सिडबॉल' निर्मिती आणि रोपनिर्मितीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांमध्ये निसर्ग रक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य घडावे यासाठी बिया संकलन स्पर्धा आयोजित करण्यात येते. शाळकरी मुलांपर्यंत वृक्षलागवडीची ही मोहीम पोहोचवण्याचा भाग म्हणूनही ही स्पर्धा होत असते. विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते. चाळीस प्रकारच्या उपयुक्त अशा बियांचे संकलन होते. बेहडा, रिठा, चिंच, आवळा , बाभूळ, शमी, खैर, अंजन, बेल, आपटा, कडुलिंब, करंज, बहावा, काटेसावर आदी उपयुक्त बियांचे संकलन होते. डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपचे संस्थापक डॉ. शशिकांत ऐनापुरे आणि सचिव पद्मजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालते.

Saturday, October 15, 2022

एकुंडी शाळेत वाचन प्रेरणा व हात धुवा दिवस साजरा


जत,(प्रतिनिधी)-

जत तालुक्यातील एकुंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वाचन प्रेरणा आणि हात धुवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून बालकथा, बालकविता, प्रेरक माहिती वाचून घेण्यात आली. मुलांनी वृत्तपत्रांच्या पुरवणी आणि मासिकात आलेली शब्दकोडी मोठ्या आनंदाने आणि उत्फुर्तपणे सोडवली. दैनिक केसरीची छावा पुरवणी आणि दैनिक तरुण भारतची चॅम्पियन पुरवणी यांचे वाचन केले. यावेळी केंद्रप्रमुख रतन जगताप उपस्थित होते. यावेळी वाचनाचे आणि हात धुण्याचे महत्व विशद केले. ते म्हणाले,'वाचन केल्याने माणूस घडतो. अफाट वाचन केलेल्या डॉ. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहास निर्माण केला. वाचन केल्याने माणूस ज्ञान समृद्ध होतो. तो  पुढे आयुष्यात कुठेच  मागे राहत नाही. त्यामुळे मुलांनी वाचन अविरत चालू ठेवले पाहिजे.' 

 शाळेतील पदवीधर शिक्षक आणि पाठ्यपुस्तक लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आझाद यांच्या बालपणातील किस्से सांगितले. जिल्हा परिषदेच्यावतीने प्राथमिक शाळांमध्ये 'आनंददायी शिक्षण' उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमधील गोष्टींचे यावेळी वाचन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजी सावंत उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सचिन शेळके यांनी केले तर आभार निलेश वानखेडे यांनी मानले.




Friday, February 11, 2022

रणबीरचं 'शुभमंगलम' आणि कंगना, माधुरीचा गेम शो


विकी कौशल-कतरिना कैफ आणि राजकुमार राव-पत्रलेखा यांचे शुभवर्तमान कोरोनाच्या काळात पार पडलं आहे आणि ते आता त्यांच्या कामात चांगले व्यस्त आहेत.  आता नंबर रणबीर कपूर-आलिया भट्टचा आहे.  आपल्या देशात प्रेम लपवून आणि  लग्न  बँड वाजवत उघडपणे लग्न केलं जातं.  जर कलाकार बॉलीवूडमधला अव्वल कलाकार असेल, तर करिअरच्या अनुषंगाने लग्न उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने होऊ शकतं.  रणबीर-आलियाबद्दल असेही बोलले जात आहे की, दोघांचा जानेवारीत साखरपुडा झाला आहे  आणि लवकरच बँडबाजा वाजवत लग्नाची तारीख जाहीर करतील. आणि आता असंही बोललं जात आहे की, जर कोरोना महामारी आली नसती तर आतापर्यंत दोघांचे लग्न कधीच झालं असतं.  ते काहीही असले तरी ते एक अनोखे नाते असेल.  जर हे लग्न झालं तर बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे सक्रिय असलेली दोन कुटुंबे (नानाभाई भट्ट यांचे नऊ मुलांचे कुटुंब आणि पृथ्वीराज कपूर यांचे सहा मुलांचे कुटुंब) एकत्र येतील.  कपूर कुटुंबाकडून अधिकृत तारीख कधी जाहीर केली जाते याकडे रणबीर-आलियाच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
'बिग बॉस' कंगना
एकता कपूरचा स्वतःचा 'बिग बास' म्हणजेच  ‘लाक अप : भड़ास जेल, अत्याचारी खेल’ हाताळण्याची जबाबदारी कंगना रणौतवर आहे.  27 फेब्रुवारीला अल्ट बालाजी आणि मॅक्स प्लेअरवर प्रीमियर होईल.  असे मानले जाते की या शोच्या माध्यमातून कंगना बॉलीवूडच्या मुलांची किंवा लोकप्रिय कलाकारांच्या मुला-मुलींची जीवनशैली उलगडण्याचं काम करेल, जी ते वेळोवेळी उघड करत आहेत.  बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर सातत्याने करण जोहरची भूमिका घेणारी कंगना हा शो कोणत्या उंचीवर नेईल हे पाहणे मनोरंजक असेल.खुद्द बॉलीवूडचेही डोळे या कार्यक्रमाकडे लागले आहेत.  केवळ डोळेच नाही तर धाकधूकही वाढली आहे. या शोमध्ये कंगनाने हंटरने कोणावर फटकारायला सुरुवात केली हे माहीत नाही.  यात अडचण अशी आहे की हा शो सात दिवस चोवीस तास चालेल आणि प्रेक्षक थेट या शोशी कनेक्ट होऊ शकतील.  म्हणजे कंगनाचा हा शो चित्रपट जगतात नवीन वाद निर्माण करू शकतो.  पण एकता कपूर वादांना घाबरणार नाही, हे ओघाने आलेच
माधुरीचा 'गेम'
 माधुरी दीक्षितने बॉलीवूड चित्रपटांपेक्षा टीव्ही शोला जास्त महत्त्व द्यायला सुरुवात केली, तेव्हा टीव्ही चॅनेल्सनेही तिला चांगल्या संधी द्यायला सुरुवात केली आहे. झलक दिखला जा’, ‘डांस दीवाने’ पासून फूड चॅनलवर 'झलक दिखला जा', 'डान्स दीवाने'पासून 'फूड फूड महाचॅलेंज'पर्यंत माधुरीने झलक दाखवली आहे.  कलर्स टीव्हीच्या 'डान्स दिवाने'मध्ये ती जज म्हणून दिसली होती.  आता नेटफ्लिक्सवर ती  एका नवीन शोमध्ये कास्ट करणार आहे.  नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.यामध्ये बॉलिवूडच्या ग्लॅमरमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  म्हणजेच तोही कंगनाच्या 'लॉक अप'सारखा असेल आणि त्याचे नाव 'द फेम गेम' आहे, जो आधी 'फाइंडिंग अनामिका' होता.  याचे 18 किंवा 25 फेब्रुवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जाणार आहे.  या मालिकेबद्दल माधुरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून खुलासा केला आहे. तिचे चाहते त्याची वाट पाहत आहेत.  माधुरीचा या अगोदर रिलीज झालेला चित्रपट म्हणजे करण जोहरचा कलंक (2019) , ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्ट देखील होते. 
संकलन- मच्छिंद्र ऐनापुरे

Thursday, February 10, 2022

आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण


जत,(प्रतिनिधी)-

आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रांगोळी स्पर्धेचे वितरण जत येथील रामराव विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये समारंभपूर्वक घेण्यात आले. यावेळी रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, जत तालुका काँगेस सेवादलचे अध्यक्ष मोहन मानेपाटील, लेखक मच्छिंद्र ऐनापुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

जत विधानसभेचे आमदार आमदार विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत शहरात भव्य प्रमाणात विविध गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. जत हायस्कूल, बालविद्यामंदिर, आणि रामराव विद्यामंदिरसह अनेक शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण विजेत्या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये करण्यात आले. 

रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील कु. श्रेया रवींद्र साळे (6 वी), कु.राखी गोरखनाथ साळे (7वी), कु.सृष्टी उत्तम बिरुगणे (5वी), कु. अक्षता अशोक दुधाळ (5वी), कु.सोनाली रामलिंग कोटी (6वी), कु.समृद्धी शंकर घोडके (8वी), कु.श्रेया बाळू शिंदे (8वी) या विद्यार्थीनींनी विविध गटात यश मिळवले.त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना मोहन मानेपाटील म्हणाले, विक्रम प्रतिष्ठान आणि काँग्रेसच्यावतीने विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कलागुण बहरत न्यावेत. लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांनी मुलांनी विद्यार्थी दशेतच आपला छंद आणि हिरो निवडावा असे आवाहन केले.  यावेळी पर्यवेक्षक संजीव नलावडे, जितेंद्र शिंदे, सुभाष शिंदे, वसंत जाधव, शरद जाधव, सचिन चव्हाण उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बबन संकपाळ यांनी केले . आभार जितेंद्र शिंदे यांनी मानले.





Wednesday, February 9, 2022

विट्याचे सुपुत्र विसुभाऊ बापटांचा 'कुटुंब रंगलय काव्यात'च्या माध्यमातून चारी दिशा डंका


विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा हटके कार्यक्रम. सादरीकरणाच्या वेगळेपणामुळं रसिकांनी डोक्यावर घेतल्याचं त्याच्या तीन हजारांवर पार प्रयोगामुळं दिसून येतं. विसुभाऊ बापट मूळचे सांगली जिल्ह्यातील विट्याचे! इथल्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शिकले. लहानपणापासून कविता आणि गाण्यांची आवड असलेल्या विसुभाऊ बापटांचा पुढे छंदच झाला. त्यांच्या तोंडातून ओघवत्या शैलीत एक से बढकर एक कविता बाहेर पडू लागल्या आणि जन्माला आला 'कुटुंब रंगलय काव्यात' हा कार्यक्रम.

विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा प्रेक्षक रसिकांनी नावाजलेला हटके कार्यक्रम आहे. एकादी साधीशी गोष्टही काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची हातोटी लाभलेल्या विसुभाऊंनी 'वाक्यं रसात्मक काव्यं' या उक्तीप्रमाणे वाक्यांत रसपूर्ण काव्य करून टाकलं आहे. ओंकारसाधना, मुंबईनिर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचं बीज नव्यानं रोवलं आहे. प्रस्थापित तसेच नवोदित कवींच्या कवितांचा संच घेऊन ते गेली चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देत आहेत. रसिक त्यांच्या या काव्यात्मक कार्यक्रमात अक्षरशः न्हाऊन निघत आहेत.

दोन -तीन वर्षांपूर्वी 'कुटुंब रंगलय काव्यात' या सलग 15 तास चाललेल्या काव्य सादरीकरणाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली. या अगोदर वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्समध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे. 1981 पासून याचे प्रयोग सादर केले जात आहेत. आता 'कुटुंब रंगलय काव्यात'ला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. बापट त्यांच्या शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवून आणत आहेत. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हटले जाते, त्यामुळे निरनिराळ्या कवींच्या दृष्टिकोनातून हे जग जाणण्यासाठी तसेच कवितेच्या या जगाची एक झलक 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमातून अनुभवता येते. 

महाराष्ट्रातील असा एकही ख्यातनाम कवी नसेल की ज्याची कविता विसुभाऊंना पाठ नसेल. अफाट पाठांतर आणि हार्मोनियम वाजवत अफलातून सादरीकरण हे वैशिष्ट्य. त्यांच्या भात्यातून एक ना अनेक कविता जेव्हा बाहेर पडतात तेव्हा परिसर मंत्रमुग्ध होतो. बोबड्या बाळाच्या तोंडच्या शब्दापासून म्हाताऱ्या -कोताऱ्याची बोली ,एकादी हळुवार प्रेमकविता असो किंवा शौर्य रसातील ओळी, विसुभाऊ डोळ्यांतून कधी आसू तर चेहऱ्यावर कधी हसू निर्माण करतात, हे कळतच नाही. वऱ्हाडी, कोकणी, आगरी अशा विविध कवितांचा त्यात समावेश असतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षक रसिकांनीच फक्त डोक्यावर घेतले नाही तर महाराष्ट्राबाहेर आणि जगभरातही त्यांच्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.