Saturday, December 22, 2018
वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे मन शांत आनंदमय होते
प्रा. बाबासाहेब बेंडेपाटील
जत,(प्रतिनिधी)-
वैज्ञानिक दृष्टिकोन बिघडला कि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वैचारिक असे सर्वच दृष्टिकोन बिघडतात म्हणून माणसाकडे कोणत्याही गोष्टीकडे पाहताना वैज्ञानिक दृष्टिकोन महत्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे सकारात्मक भावना निर्माण होऊन मन स्थिर, शांत व आनंदमय होते असे प्रतिपादन प्रा. बाबासाहेब बेंडेपाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र विवेक वाहिनी ' उदघाटन प्रसंगी संताचा वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे हे होते.
संत वाङ्मयापासून आपल्याला संतांनी विवेक व वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या अभंग व ओवीतून दिला आहे.पण आपण अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारत नाही . अंधश्रद्धा पाळत बसतो. संतांनी कधीही श्रद्धेला विरोध केला नाही तर त्यांनी अंधश्रद्धेला विरोध करून विवेकनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन दिला असे सांगून प्रा. बेंडे पाटील पुढे म्हणाले कि, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञानाची सृष्टी स्वीकारली पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला नाही. आपण कार्यकारणभाव समजावून घेणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय. पूर्वजांनी सांगितलेल्या कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे मानव आळशी व अंधश्रद्धाळू बनला असेहि ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य .डॉ.व्ही.एस.ढेकळे म्हणाले कि, मानवी जीवनामध्ये तर्कशास्त्र महत्वाचे आहे. आपणाला प्रत्येक गोष्टीत तर्क लावता आला पाहिजे. आजही भारतीय जनतेमध्ये देव आणि धर्माचा पगडा जन्मजातच आहे. पण केवळ धार्मिक भावनेने कर्मकांड न करता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून श्रद्धा ठेवली पाहिजे. कर्मकांडामुळे मानसिक गुलामगिरी नष्ट करावयाची असेल तर प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पहिली पाहिजे असे सांगून प्र.प्राचार्य .डॉ.व्ही.एस.ढेकळे शेवटी म्हणाले कि, वैज्ञानिक बुद्धी आणि आनंद म्हणजे परमात्माच आहे. संतानी सुद्धा आपल्या अभंगातून विवेकनिष्ठ वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला तो आपण स्वीकारला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यशास्त्र विभागाच्या वतीने अंधश्रद्धेवर बनविणेत आलेल्या भित्तीपत्रिकेचे उद् घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाराष्ट्र विवेक वाहिनीचे जत चे प्रमुख प्रा. सी. वाय. मानेपाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर सन्नके व शेवटी आभार प्रा. पुंडलिक चौधरी यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment