Monday, December 31, 2018

कर्नाळ येथे 3 रोजी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन


अध्यक्षपासून सूत्रसंचालनपर्यंत सबकुछ विद्यार्थी
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन गुरूवारी तीन जानेवारी रोजी कर्नाळ हायस्कूल कर्नाळ येथे होणार आहे. हे साहित्य संमेलन म्हणजे सबकुछ विद्यार्थी असणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कु. तेजश्री जोतीराम पाटील इयत्ता नववी (तानंग) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. विकास सलगर, मुश्ताक पटेल यांनी दिली.

जिल्हयाला विद्यार्थी साहित्य संमेलनाची परंपरा असून यापूर्वी मिरज, बेडग, कर्नाळ, व सांगलीमध्ये ही संमेलन झाली. ही संमेलने सब कुछ विद्यार्थी अशीच झाली आहेत. यातून 11 विद्यार्थ्यांचे काव्य-गोष्ट संग्रह प्रकाशित झाले. गौतम पाटील समडोळी यांस बालकवी राज्य पुरस्कार जाहीर झाला. विठ्ठल वाघ, अशोक कोळी, बाबा भांड, विमल मोरे, शशिकांत शिंदे, प्रदीप पाटील, शेखर गायकवाड या साहित्यिकांशी संवाद साधता आला. या पाचव्या साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक महावीर जेंधळे, पुणे, पाठयपुस्तकातील लेखक नीलम माणगावे, जयसिंगपूर, शंकर कसबे, (तुळजापूर), फारूक काझी (सांगोला), व मच्छिंद्र ऐनापुरे (जत) हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. बालसाहित्यिकांचा सत्कार, लेखन स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत. या संमेलनात वाचन-पुस्तकातील व पुस्तकाबाहेरचे हा परिसंवाद असून अध्यक्षा प्रतीक्षा पाटील देशिंग ही असणार आहे.
यामध्ये विनया पाटील, शिराळा, श्वेता औताडे कर्नाळ, प्रतिक कासर सावळज, शुभम वळकुंजे सांगली, हे सहभागी होणार आहेत. यामध्ये भूमिका नाटय, काव्यगायन असे कार्यक्रम होणार आहेत. अनुभव कथन सत्राच्या अध्यक्षस्थानी गिर्यारोहक उर्वी अनिल पाटील असून हर्षद सटाले भाट शिरगाव, ऋषाली पाटील गव्हाण, रिया कदम तानंग, सूरज इंगळे आरग, प्रतीक पाटील साखराळे हे सहभागी होणार आहेत. राज्य पुरस्कार विजेते गौतम पाटील याच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील 62 विद्यार्थ्यांचे कविसंमेलन दुपार सत्रात होणार आहे.
गेली पाच वर्ष पंचायत समिती मिरज व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्यावतीने विविध कार्यशाळा व साहित्य संमेलने घेवून विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला वाव देण्यात आला. यावर्षी हे संमेलन जिल्हास्तरीय होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांच्या प्रेरणेतून व दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, वनिता पाटील, विजयकुमार पाटील, सुषमा डांगे, गौतम कांबळे, संतोष पाटील, विठ्ठल मोहिते व सर्व शिक्षक संघटनांच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वी होत आहे. या संमेलनाचे निमंत्रक म्हणून मुश्ताक पटेल व संयोजन प्रमुख डॉ. विकास सलगर हे विशेष प्रयत्न करत आहेत. तर या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मयूर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment