Sunday, December 30, 2018

भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग


सांगली,(प्रतिनिधी)-
तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा कुठलाही परिणाम पडू न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयार सुरू केली आहे. यासाठी त्यांनी 17 राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करताना, अतिशय विश्वासातील आणि अनुभवी सहकार्यांना प्रभारी पदावर नियुक्त केले आहे.

 2014 च्या तुलनेत यावेळी जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपाने निर्धारित केले आहे. कोणत्या राज्यात भाजपाची शक्ती जास्त आहे आणि कुठे कमी आहे, याचा सारासार विचार करून, मोदी आणि शाह यांनी व्यापक रणनीतीसह या नियुक्त्या केल्या आहेत. या प्रक्रियेत सर्वांत मोठी जबाबदारी एकेकाळी मोदी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे गोवर्धन झडापिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्याकडे लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तरप्रदेशची जबाबदारी देण्यात आली असून, झापडिया यांनी सर्व 80 जागा जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अमित शाह यांच्या अतिशय विश्वासातील असलेले पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपविण्यात आली असून, बिहारमधील रालोआच्या घटक पक्षांमध्ये कुठलेही मतभेद निर्माण होणार नाही, याची काळजीही ते घेणार आहेत.
उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री असलेले महेंद्रसिंह यांना आसामचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, 2016 मध्ये त्यांच्याच रणनीतीमुळे आसामात भाजपाची सत्ता आली आहे. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्याकडे ओडिशाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर बिहार भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांच्यावर झारखंडमधील पक्षाच्या प्रचाराची सूत्रे आहेत. उत्तराखंड भाजपाचे माजी अध्यक्ष असलेले तीर्थसिंह रावत यांना हिमाचल प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने या राज्यातील लोकसभेच्या सर्व चारही जागांवर विजय मिळविला होता, त्याच पुनरावृत्तीची अपेक्षा भाजपाने रावत यांच्याकडून केली आहे. पेशाने वकील असलेले नलिन कोहली यांना नागालॅण्ड आणि मणिपूरची जबाबदारी देण्यात आली आहे, तर बिहारचे आमदार असलेले 38 वर्षीय नितीन नबिन यांना सिक्कीम देण्यात आले आहे. प्रकाश जावडेकर यांच्याकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशची जबाबदारी देण्यात आली असून, राजस्थानही अतिरिक्त जबाबदारी म्हणून त्यांना पाहावे लागणार आहे.
सुधांशू त्रिवेदी यांच्याकडेही राजस्थानची जबाबदारी आहे. हरयाणातील भाजपा सरकारमध्ये मंत्री असलेले कॅप्टन अभिमन्यू यांच्याकडे पंजाब आणि चंदीगडची जबाबदारी आहे. अमित शाह यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयात प्रख्यात सर्जन असलेले डॉ. अनिल जैन यांना छत्तीसगड पाहायचे आहे, तर पक्षाचे उपाध्यक्ष ओ. पी. माथूर हे गुजरातमध्ये भाजपाच्या 2014 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी मोहीम राबविणार आहेत. भाजपाचा दलित चेहरा असलेले थावरचंद गहलोत यांच्याकडे पुन्हा एकदा उत्तराखंड सोपविण्यात आले असून, त्रिपुरातील भाजपाच्या विजयाचे शिल्पकार असलेले सुनील देवधर यांना आंध्रप्रदेशातील पक्षापुढे असलेल्या आव्हानांचा सामना करायचा आहे. तेलंगणातील जबाबदारी अरविंद लिंबावली यांच्याकडे, तर स्वतंत्रदेव सिंह हे मध्यप्रदेशची जबाबदारी सांभाळणार आहेत.

No comments:

Post a Comment