Sunday, December 30, 2018

(संपादकीय) मुलाच्या हव्यासाचा हकनाक बळी


सात मुलींनंतर आठव्या बाळंतपणावेळी महिलेचा मृत्यू
वंशाच्या दिव्याचा हव्यास अजून सुटलेला नाही. जग अंतराळात घर करायला निघाले असताना आणि यात मुली आघाडीवर असताना अद्यापही मुलींच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेले लोक वंशाला दिवा हवाच, असा अट्टाहास ठेवतात,तेव्हा आपण गेल्या सत्तर वर्षात काही मिळवलंच नाही, असा अर्थ होतो. बीडमधल्या एका महिलेला सात मुली झाल्या तरी तिच्या घरच्यांना मुलगा हवाच होता. या लोकांनी या सात मुली कशा जगवायच्या याचा विचारसुद्धा केला नाही. त्यांना फक्त वंशाचा दिवा हवा होता. अलिकडच्या काही वर्षात अन्नभेसळ, हायब्रीडपणा यामुळे अन्नात सकसपणा राहिलेला नाही. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे राहिलेली नाहीत.
साहजिकच अलिकडच्या पिढीमध्ये काटकपणा कमी झाला आहे. अशा परिस्थितीतही एक महिला सात मुलींना जन्माला घालते आणि आठव्या बाळंतपणासाठी तयार होते,हेच मुळी धक्कादायक आहे. समाजसेवेचा आव आणणारी मंडळी अशा लोकांना का भेटत नाहीत, असा प्रश्न पडतो. ही महिला आठव्यावेळी मुलाला जन्माला घालणार होती. पण दुर्दैवाने अतिरक्त स्त्रावाने तिचा आणि बाळाचा अंत झाला.
डॉक्टरांनी तिला आणि बाळाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले,पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले.तिचा बायकोला आणि घरचे सुनेला मुकले. वंशाचा दिव्याचाही करुण अंत झाला. या दुदैवी महिलेच्या अंतानंतर नवरा म्हणणारा दुसरे लग्न करेल, कुणी तरी अभागी त्याच्या पदरात जाईल आणि पुन्हा वंशाच्या दिव्यासाठी धडपड सुरू राहील,पण यामुळे मुलगाच हवा हा सामाजिक प्रश्न मिटणार आहे का? शासनाने मुले जन्माला घालण्याला प्रतिबंध घातला आहे,पण सरकारी नोकर, राजकीय मंडळी वगळता या कायद्याचा धाक कुणालाच राहिला नाही. त्यामुळे अजूनही अनेक कुटुंबात दोन पेक्षा अधिक मुलांना जन्माला घालण्याचा अट्टाहास सुरूच आहे. याला अटकाव करण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येच्या भस्मासुरामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच मुलींची गर्भातच हत्या केली जात असल्याने आजच्या घडीला मुलाला मुलगी मिळेना अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशात मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्याचा विचार करता छोटे कुटुंब,सुखी कुटुंब या निर्णयाची कडक अंमलबजावणी करायला हवी. तिसरे अपत्य जन्माला घालणार्यावर कायद्याचा बडगा उगारायला हवे.
अशा लोकांसाठी शासकीय लाभाच्या योजना बंद करून टाकायला हव्यात. गरिबी कमी होण्याऐवजी वाढत आहे, बेरोजगारी आ वासून उभी आहे. गुन्हेगारी वाढत आहे.फसवणुकीचा स्तर आता हायफाय झाला आहे. अशा सगळ्या भितीदायक वातावरणात लोक अजूनही वंशाच्या दिव्यासाठी मुली जन्माला घालण्याचे प्रकार हा त्याच मुलींसाठी धोकादायक आहे. गरिबीच्या परिस्थितीमुळे या मुलींना कुणाच्याही गळ्यात मारण्याचा प्रकार होत राहील. समाजातले काही लोक त्याचा फायदा घेत राहतील.
वंशाचा दिवा पाहिजे म्हणणार्यांनी जरा आजूबाजूच्या घरांमध्ये डोकावून पाहायला हवे. किती मुलं आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करतात, याची त्यांना कल्पना येईल. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे,हे कशाचे द्योतक आहे. आज आपलेच आयुष्य धोक्यात असताना या भरमसाठ मुला-मुलींना जन्माला घालून त्यांचे भविष्य आपण धोक्यात घालत नाही का? सामाजिक संस्थांनी यासाठी जनजागृती करण्यासाठी पुढे आले पाहिजे आणि शासनाने यावर कडक निर्बंध आणले पाहिजेत.




No comments:

Post a Comment