Wednesday, July 26, 2023

चारा निर्मितीसाठी सांगली जिल्ह्यात अभियान

प्रति शेतकरी पाच किलो मका बियाणे देणार: जिल्ह्यातील पशुधनासाठी शासनाचा उपक्रम

सांगली,(प्रतिनिधी):

जिल्ह्यातील पशुधनासाठी शासनाने चारा निर्मिती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात एक ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाच किलो मका बियाणे पन्नास टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनकडून निधीची उपलब्धता केली जाणार आहे. सुमारे एक कोटी निधीतून पन्नास हजार शेतकऱयांना याचा लाभ देण्यात येणार आहे. अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय झाला असून राज्यासह जिल्ह्यात ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्याच्या सुचना जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. 

राज्यात जिल्ह्यासह यंदाचा मान्सून वेळेवर दाखल झाला नाही. परिणामी जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून लोकांची धावाधाव सुरू झाली आहे. जुलै मध्यानंतर पावसाने सुरुवात केली आहे. मात्र सद्यस्थितीत चाऱ्याचा प्रश्न गंभीरच आहे. चाऱ्यासाठी उसाची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एका बाजूला पावसाअभावी उसाची वाढ खुंटली आहे. तर दुसऱ्या बाजूला चाऱ्या साठी तोड सुरू झाल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत. चाऱ्या साठी उसाची अशीच तोड सुरू राहिल्यास हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीवर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली. चारा छावण्या सुरू करण्यावरही चर्चा झाली. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून चारा टंचाईबाबतची माहिती मागवण्यात आली आहे. असे असले तरी तात्काळ मार्ग चारा निर्मिती अभियानाच्या माध्यमातून उपासमार सुरू असलेल्या पशुधन वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियान अंतर्गत कमी कालावधीत चारा निर्मिती होणारे मका बियाणे शेतकऱ्यांना देऊन चारा निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

या अभियानातून जिल्ह्यातील प्रति शेतकरी किमान पाच ते दहा किलो मका बियाणांचे वाटप केले जाणार आहे. सुमारे एक कोटी निधीतून ही योजना राबविण्यात येणार आहे. किमान पन्नास हजार शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. दोन ते तीन लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. 

तालुका निहाय जनावरांची संख्या (अनुक्रमे तालुका, गाय, म्हैस) शिराळा- 13 हजार 316, 2309 वाळवा- 27 हजार 134, 4 हजार 990 पलूस- 10 हजार 199, 15 हजार 339 कडेगाव- 7 हजार 400, 16 हजार 288 खानापूर- 7 हजार 667, 15 हजार 499, आटपाडी- 11 हजार 12, 11 हजार 589 तासगाव- 15 हजार 750, 19 हजार 272 मिरज- 19 हजार 659, 33 हजार 858 कवठेमहांकाळ- 14 हजार 675, 16 हजार 855 जत- 31 हजार 266, 29 हजार 029 एकूण- 1 लाख 58 हजार 78, 1 लाख 65 हजार 90 

जतच्या पाण्यासाठी कर्नाटक शी चर्चा करणार

विधीमंडळाच्या  पायऱयांवर आमदारांचे आंदोलन: उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन 

जत न्यूज

जत,(प्रतिनिधी): जतच्या दुष्काळग्रस्तांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देत आंदोलनही सुरू केले आहे. जत तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधकांनी बुधवारी विधिमंडळात केली. कॉंग्रेसचे आमदार विक्रम सावंत, विश्वजीत कदम यांनी आंदोलन केले तर विधानसभेत विश्वजीत कदम यांनी जतेतील दुष्काळ भागाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर ताशेरे ओढले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी जतला पाणी देण्याबाबत चर्चा करण्याची घोषणा जलसंपदामंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

जत तालुका पर्जन्य छायेचा दुष्काळी तालुका आहे. अनेक वर्षांपासून या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. कर्नाटक मध्ये आमचा समावेश करून घ्यावा, असा निर्णय तालुक्यातील काही लोकांनी केला होता. म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी देण्याकरिता मनापासून विक्रम सावंत प्रयत्न करत आहेत. कर्नाटक मध्ये जाणारे महाराष्ट्रातील हक्काचे पाणी ते सुद्धा जत तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न विक्रम सावंत यांनी केला.परंतु आजही तेथील भाग हा दुष्काळ प्रभावीत आहे. पाऊस राज्यात सुरु असला तरी जत तालुक्‍यात नाही. त्यामुळे ११ गावांना पाण्याच्या टँकरने पाणी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. आज संख याठिकाणी ५०० हून अधिक लोक उपोषणाला बसलेत, असे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.  जानेवारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ  शिंदेंनी बैठक घेत म्हैसाळच्या विस्तारीकरणाला १८०० कोटीचा निधी देऊ, असे जाहीर केले होते. परंतु आज सहा महिने पूर्ण झाले तरी अंमलबजावणी होत नाही. दुर्दैवाने जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आज आंदोलन करावे लागत आहे. विक्रम सावंत सभागृहाचे सदस्य आहेत. उपोषणाला तिकडे लोक बसले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून तातडीने बैठक घ्यावी आणि त्वरीत मार्ग काढावा, असे विश्वजीत कदम म्हणाले. 

आराखडे तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो,पण काही व्यवस्था होइपर्यंत कर्नाटक कडून आपण पाणी मागावं, असा प्रस्ताव दिला होता. या संदर्भात कर्नाटकला पत्र पाठवत आहोत. कर्नाटक अडचणीत आलं होतं तेव्हा मला पृथ्वीराज चव्हाण यांचा फोन आला होता. ती सगळी मंडळी माझ्याकडे आली होती. त्यावेळी आपण त्यांना पाणी दिलं होतं. कर्नाटकला देखील आपण पाणी मागू शकतो. पण हे आराखडेही लवकर आपण तयार करून जे मुख्यमंत्री यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे त्याची पूर्तता करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.


Tuesday, July 25, 2023

जत सीमावर्ती भाग बनतोय गांजाचे आगार

जत,(प्रतिनिधी) : जत तालुक्‍यातील सीमावर्ती भागात ऊस,भेंडी, झेंडू फुले, डाळिंब बागा, केळी बागा यासह अन्य अडगळीच्या ठिकाणी गांजाचे पीक लागवड जोमात सुरू आहे. गांजा विक्रीसाठी आंतरराज्य कनेक्शन असून ट्रॅव्हल्स व खासगी वाहनाने वाहतूक केली जात आहे. परिणामी तरुणवर्ग गांजाच्या सेवनाच्या आहारी गेला असून अनेकजण तस्करीत गुरफटले आहेत. 

जत तालुक्‍यात शेकडो एकरावर गांजाची लागवड केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पूर्व व दक्षिण कर्नाटक सीमावर्ती भाग गांजाचे आगार बनले आहे. गांजाचा वापर नशायुक्त असून चिलीम ओढणे, अंमली पदार्थांमध्ये वापर करणे, आयुर्वेदमध्ये जडीबुटी म्हणून वापर केला जातो. भांगेत गांजेचे फुले व गांजा टाकतात. चारा खावा म्हणून जनावरांना देखील गांजा चारण्याची ग्रामीण भागात पद्धत आहे. अलीकडच्या काही काळात पानपट्टीच्या पानामध्ये गांजाचा चुरा टाकण्याची पद्धत सुरू झाली आहे. आंतरराज्य साखळीमार्फत गांजा विक्री केली जाते. गोपनीय लागवड व विक्री सुरू आहे. 

जत पूर्व भागात पूर्वी ठराविक भागात गांजा लागवड केली जात होती, परंतु आता मात्र इतरत्र गांजाची सर्रास लागवड होत आहे. पूर्व व दक्षिण कर्नाटक सीमावर्ती चेक पोस्टवर पोलिसांचे नियंत्रण असल्याने रातोरात या ठिकाणाहून कर्नाटकमध्ये नेला जात आहे. चेक पोस्ट वगळता इतर चोरट्या मार्गाने गांजा विक्रीस नेला जात आहे. केवळ शेतकऱ्यावर कारवाई न करता गांजा विक्रीस नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिस यंत्रणेने करणे गरजेचे आहे. 

गांजा तस्कर कर्नाटकातील जमखंडी, विजयपूर, हुबळी, धारवाड तर मिरज, मुंबई या भागातून आंतरराज्य कनेक्शन कार्यरत आहे. ही मोठी साखळी आहे. मुंबई येथे विविध माध्यम आणि मार्गांनी व एजंटामार्फत गांजा पोहोच केला जातो. वाळल्या गांजाची किंमत एका किलोस 15 ते 20 हजार पर्यंत आहे. मागणीदेखील जास्त आहे. 

गेल्या चार वर्षांत पोलिसांनी केलेल्या कारवाई : (गाव, जप्त गांजा किलो, रक्‍कम, दिनांक) 

करजगी ८: 1350 किलो. 67 लाख 75 हजार .6.3.18., , खलाटी : 25 किलो. 1 लाख 51 हजार, 6.9.18., संख : 125 किलो. 5 लाख 72 ह. 31.8.20., उमराणी : 147 किलो. 17 लाख 76 ह. 6 .8.20., जा.बुद्रक : 8 किलो. 71 हजार.1.11.20., सिंदूर : 520 किलो. 51 लाख 93 हजार.2.11.20., सिंगनहळ्ळी : 1 किलो. 13 हजार. सन 2021., डोगाव : 21.किलो.1 लाख 29 हजार 31.3.21., माणिकनाळ : 133 किलो.13 लाख 40 ह. 3.8.21