Friday, December 21, 2018

आमदारकीची स्वप्ने पाहणार्‍यांचा प्रसिद्धीसाठी स्ट्ंट


विक्रम सावंत; तुबची-बबलेश्वरचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये
जत,(प्रतिनिधी)-
आमदारकीचे वेध लागलेले भाजपचे चार-पाच पदाधिकारी उतावीळ बनले आहेत. तुबची-बबलेश्वरचे श्रेय लाटण्यासाठी मंत्र्यांना भेटण्याचा उद्योग करीत आहेत. हा फक्त प्रसिद्धीसाठी स्टंट चालला आहे.भाजपमध्ये कुणाचा पायपोस कुणाला राहिला नाही, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला.

तुबची-बबलेश्वर पाणी योजनेसाठी आपण गेल्या वर्षांपासून आग्रही आहोत. काँग्रेसची सत्ता असती तर ती आतापर्यंत पदरात पडली असती. अजूनही आपण यासाठी विरोधकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे. पाण्यासाठी विरोधकांनी आम्हाला हाक द्यावी अथवा आमच्यासोबत काम करावे, असेही श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
श्री. सावंत म्हणाले, तुबची-बबलेश्वरच्या श्रेयवादावरून भाजपातच दोन गटात जुंपली आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या बैठकीत ही बाब चव्हाट्यावर आली आहे. एक गट खासदार, आमदारांना वगळून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटतो तर दुसरा गट आमदार जगतापांना डावलत असल्याचा आरोप करत आहे. यावरून भाजपचे नेते कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी किती गंभीर आहेत,याची कल्पना येते. निव्वळ आमदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी काही लोकांची धडपड चालली आहे. पण या विषयावर आज उठून धडपड करणे हास्यास्पद आहे.लोकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे.
राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. या मंडळींना कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री भेटतात,पण राज्याचे मुख्यमंत्री भेटत नाहीत. यावरून या शिष्टमंडळाची ताकद किती आहे,हे स्पष्ट झाले आहे. दीड वर्षापूर्वी आपण मंत्री गिरीश महाजन यांना भेटून कर्नाटकातून कशा पद्धतीने आणि फारसा मोबदला न देता पाणी आणता येते,याची माहिती अगदी नकाशा आणि आराखड्यासह सांगितली होती. यावेळी मंत्री महाजन यांनी कर्नाटकातील जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून बैठक घेण्याचेही ठरवले होते. मात्र ही बैठक आजतागायत झाली नाही.
आता निवडणूक तोंडावर आली असल्याने तुबची-बबलेश्वर योजनेच्या पाण्याचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटकातील पाण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे आमदार विलासराव जगताप सांगत असले तरी त्यांची भूमिकादेखील संशयास्पद आहे. त्यांनी रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचे सांगत असले तरी आता जी रस्त्यांची कामे सुरू आहेत,त्यांची गुणवत्ता शून्य आहे. त्यांना कामाशी मतलब नाही,त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे, असाही श्री. सावंत यांनी आरोप केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, जत नगरपालिकेचे बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, संतोष पाटील, गणी मुल्ला आदी उपस्थित होते. 



No comments:

Post a Comment