भाविकांना भासली पाण्याची टंचाई
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील एकुंडी येथील श्री यल्लम्मा देवीची यात्रा 'उदं ग आई उदंऽऽ...'च्या जयघोषात पारंपरिकरित्या मोठ्या उत्साहात पार पडली. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकारीसह अनेक स्वयंसेवक आणि यात्रा कमेटीच्या सदस्यांच्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडली.
हजारो भाविकांनी श्रद्धेने देवीला पुरण पोळी आणि दही भाताचा नैवेद्य अर्पण केला. अनेक भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी एकुंडीचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांचा मानवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्तविक स्वागत ईराप्पा चौगुले यांनी केले.
किच कार्यक्रमाच्या दिवशी गावातील लंगुटे वस्तीवरील रेणुका (यल्लम्मा) मंदिरात यात्रेला पहाटेपासूनच सुरवात झाली. पुजारी लक्ष्मण माळी यांनी पहाटे तीन वाजता देवीला अभिषेक घालून फुला-पानांची आकर्षक पूजा बांधली. 'उदं गं आई उदंऽऽ..' च्या जयघोषात यात्रेला सुरवात झाली. महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सायंकाळी नैवैद्य घेऊन मंदिर परिसरात गर्दी केली होती. शिस्तीसाठी सरपंचांनी आदल्या दिवशीच दर्शन रांगांची चोख व्यवस्था केली होती. महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा असे नियोजन असल्यामुळे मोठी गर्दी असूनही यात्रा सुरळीत पार पडली.
लंगुटेवस्ती, पंचशीलनगरचा रस्ता, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फेरीवाले आणि मनोरंजनाच्या खेळांनी जागा व्यापली होती. खाद्यपदार्थांच्या गाड्यांचीही रेलचेल होती. मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी शुभेच्छांचे फलक आणि महाप्रसाद वाटप होत होते. मानाचे देवीची जग नाईक, पोलिस-पाटील यांच्या घरी पोहचल्यानंतर सरपंच बसवराज पाटील यांच्या हस्ते देवीच्या पालखीचा मार्गक्रम करून मंदिर परिसरात पुजारी व अन्य भक्तांच्या साक्षीने किच कार्यक्रम पार पडला.
यात्रेची सांगता दुपारी चारनंतर करण्यात आली. अजिंक्य राक्षे, दुर्योधन गुड्डोडगी, सुरेश शेगणे, संतोष लंगुटे, मलाप्पा शेगावे, हणमंत लंगुटे, अनिल गुड्डोडगी, सदाशिव शेगावे, सुरेश लंगुटे, रवि कोरे यांच्या सह यात्रा कमेटीने सरपंच बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन केले. सध्या भयंकर दुष्काळ असूनही यात्रेला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सरपंच बसवराज पाटील, पोलिस-पाटील कलगोंडा पाटील, मलगोंडा हेळकर, सुरेश चौगुले, मलगोंडा नाईक, आप्पासो करूली, शशिकांत नाईक, डॉ रवि शेगावे, हणमंत कांबळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment