Thursday, December 27, 2018

सांगलीत आमच्याकडे बलाढ्य उमेदवार


सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे राष्ट्रवादीला विचारूनच ठरेल. देशात आघाडी करताना ते धोरण ठरलेले आहे. येथे बलाढ्य उमेदवार आघाडीकडे असून तो कोण, हे योग्यवेळी जाहीर केले जाईल, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.

तासगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना पाटील यांनी आघाडीकडे बलाढ्य उमेदवार आहे, जो भाजपची पळता भूई थोडी करेल, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने जिल्हाभर चर्चा सुरु झाली. आता काँग्रेसकडे असा बलाढ्य उमेदवार कोण, यावर रान उठले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्यामनी काय दडलंय, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, इतक्यात नाव जाहीर करणे घाईचे होईल. आताच हवा कशाला काढायची. ते नाव समोर आले की काय अवस्था होईल, हे तेव्हाच कळेल. ही निवडणूक आम्ही अतिशय गांभीर्याने घेतली आहे. राज्यात एकमेकांना विचारूनच आघाडीचे उमेदवार ठरवले जातील. सांगलीत तर राष्ट्रवादी काँग्रेसला विचारूनच उमेदवार ठरवावा लागेल.
आघाडी पूर्णपणे नवा चेहरा देणार आहे का, या प्रश्नावर त्यांनी जरा दम धरा, असे सांगत सस्पेन्स कायम ठेवला. त्यांच्या भूमिकेतून सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी राष्ट्रवादीचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.

No comments:

Post a Comment