Thursday, December 27, 2018

विविध धर्माचे नव वर्ष


डिसेंबर महिना आला की-प्रत्येकाला नवीन वर्ष साजरे करण्याची हुरहुर लागते आणि मग ते साजरे करण्याचे नियोजन सुरू होते. मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर हॉटेलमध्ये जायचे की, कुटुंबीयांसमवेत घरीच कार्यक्रम आयोजित करून साजरे करायचे, याबाबत विचारविनिमय सुरू होतो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्ष साजरे केले जात असले, तरी 1 जानेवारीचेही आपल्या दैनंदिन व्यवहारात अतिशय महत्त्व आहे. आपले सण हे मराठी महिन्यांप्रमाणे साजरे होत असले, तरी बाकीचे व्यवहार मात्र इंग्रजी महिन्यांप्रमाणेच चालतात. त्यामुळे या इंग्रजी नववर्षालाही तेवढेच महत्त्व आहे. विविधतेने नटलेल्या भारतवासीयांचे नववर्ष वेगवेगळ्या दिवशी साजरे केले जाते.

जसे हिंदूंचे नववर्ष चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते. पंजाबी लोकांचे एप्रिल महिन्यात बैसाखीला सुरू होते. पारशींचे नववर्ष मार्च महिन्यात होळीच्या दुसर्या म्हणजे नवरोजला सुरू होते, तर जैन लोकांचे नववर्ष दिवाळीच्या दुसर्या दिवशी सुरू होते. असे असले तरी 1 जानेवारीला सुरू होणार्या नववर्षाचे सर्वच उत्साहात स्वागत करतात. नाताळापासूनच शहरात नववर्षाचे वातावरण तयार होते. मोठमोठ्या मॉलमध्ये ख्रिसमस ट्री दिसतात. चौकाचौकात सांताक्लॉजच्या टोप्या, ड्रेस विक्रीकरिता येतात. शहरात हॉटेल्स, मॉल्स सगळीकडे रोषणाई केलेली असते. दुकानांमध्ये केक, पेस्ट्रीज दिसतात. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. नववर्षाच्या स्वागताकरिता युवा वर्गाची विशेष धडपड सुरू असते.
पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेली ही मुले नववर्ष साजरे करण्याच्या बहाण्याने कुठल्याशा हॉटेल, पबमध्ये जमतात. नको त्या पदार्थांचे सेवन करतात आणि नववर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांची दिनचर्या गडबडते. संपूर्ण जगाचे व्यवहार इंग्रजी महिन्यांप्रमाणे चालत असल्याने नववर्षाचे स्वागत जरूर व्हावे. परंतु आपल्या संस्कृतीची जाण ठेवून एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी केल्यास त्याचे सार्थक होईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाजवळ कुटुंबीयांकरिता फार थोडा वेळ असतो. या दिवशी कुटुंबासह फिरायला जाऊ शकता किंवा घरीच त्यांच्यासोबत नववर्ष साजरे करता येऊ शकते. एखादा सामाजिक उपक्रमही हाती घेऊन नववर्षाचे स्वागत करता येईल. ज्याप्रमाणे गुढीपाडव्याला आपण नववर्षाचे स्वागत उत्साहाने, आनंदाने करतो. तसेच 1 जानेवारीलाही घडायला हवे. तेव्हा या गोष्टींचा सर्वांनी विचार करायला हवा आणि नवे वर्ष नव्या संकल्प आणि स्वप्नांसह सुरू करा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment