Friday, December 28, 2018

जिल्हा परिषदेकडे 72 वैद्यकीय अधिकार्‍यांची भरती करणार: तम्मनगौडा रवी


जत,(प्रतिनिधी)-
 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषदेने कंत्राटी पद्धतीने 72 पदे भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्य सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांनी सांगितले. या पदांमुळे उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरसोय टळणार आहे.

 आरोग्य समितीची मासिक बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती सभापती रवी-पाटील यांनी दिली. मागील काही वर्षांपासून वैद्यकीय अधिकार्यांच्या पदांचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा देण्यात अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 72 कंत्राटी डॉक्टरांची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात एम. बी. बी. एस आणि बी. .. एम. एस कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल. डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जानेवारी महिन्यात सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 12 ते 24 नोव्हेंबरदरम्यान सक्रिय क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 79 रुग्ण सापडले असून त्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सभापती रवी-पाटील यांनी सांगितले. यावेळी निजाम मुलाणी, रेश्मा साळुंखे, वैशाली कदम, संगीता पाटील, मनीषा बागल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जत तालुक्यातील माडग्याळ आणि वाळेखिंडी या भागात चिकनगुनिया आणि डेंग्यूची साथ आली आहे. याठिकाणी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तेथील साथ वाढणार नाही, याबाबतची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सांगितले.

No comments:

Post a Comment