Sunday, December 30, 2018

दहावीच्या मुलांचा लागणार कस

जत,(प्रतिनिधी)-
पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदाच होणार्‍या दहावीच्या परीक्षेत बहुसंची प्रश्‍नपत्रिकांऐवजी इंग्रजी (द्वितीय, तृतीय भाषा) व गणित (भाग-1 व 2) या विषयांसाठी एकच प्रश्‍नपत्रिका पुरविण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांतील आशयावर आधारित; पण पाठ्यपुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्‍नही परीक्षेत असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थांचा कस लागणार आहे.

दहावी इंग्रजी व गणित आणि बारावी परीक्षा इंग्रजी बहुसंची (ए.बी.सी.डी.) प्रश्‍नपत्रिका योजना ऑक्टोबर 2004 च्या परीक्षेपासून सुरू होती. यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. कोल्हापूर विभागात सुमारे दीड लाख परीक्षार्थी आहेत. पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 2018-19 पासून करण्यात आली आहे. नववी व दहावीसाठी अभ्यासक्रम पुनर्रचना आणि त्याआधारे पाठ्यपुस्तके निर्मिती करताना विषय समित्या व अभ्यास गटांनी रचनात्मक बदल सुचविले. त्यानुसार पुनर्रचित अभ्यासक्रमात समाविष्ट विषयांचे स्वरूप कृती केंद्रित ठेवण्यात आले आहेत. ज्ञानरचनावादावर आधारित आशयाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
कृतिपत्रिका/प्रश्‍नपत्रिकांची अंमलबजावणी व मूल्यमापन करण्याच्या प्रक्रियेत सुलभता येण्याच्या द‍ृष्टीने परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. गणित व  इंग्रजी विषय तज्ज्ञांनी दहावीसाठी बहुसंची प्रश्‍नपत्रिका देण्याची आवश्यकता नाही, असा अभिप्राय बालभारतीस दिला आहे. त्यानंतर बहुसंची प्रश्‍नपत्रिका योजनेत बदल करण्यात आला आहे. मार्च-2019 च्या दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थांसाठी इंग्रजी, गणित विषयासाठी प्रचलित पद्धतीप्रमाणे चार संचात प्रश्‍नपत्रिका राहणार आहे.
पाठांतरास वाव राहणार नाही
दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मुक्‍तोत्तरी प्रश्‍नांच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्‍त करता येणार आहे. त्यामुळे पाठांतरांचा अवलंब करून उत्तरे देण्यास वाव राहणार नाही.

No comments:

Post a Comment