Sunday, November 27, 2022

शेडयाळ गावात भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार


जत,( जत न्यूज नेटवर्क)-

 एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव शेडयाळ (ता. जत) येथील मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला. त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. यावेळी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, फळे आदींचा बाजार गावातल्या ग्रामपंचायतीच्या आवारात थाटला होता. यामुळे गावाला आठवडी बाजाराचे स्वरूप आले होते.

बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व गिऱ्हाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार गावातच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बाजारात कांदे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, मुळा, मूग, चवळी, अंडी, ऊस, नारळ, कडीपत्ता, आले, पालक, मिरची, लिंबू, दही, शेंगदाणे, हरभरा भाजी, कारले विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध होता. दोन अडीच तासांच्या बाजारात 10 ते 12 हजार रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनी कौतुक केले. 

 बाजार भरविण्यासाठी मुख्याध्यापक  बाबासाहेब पांढरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिलदेव पारसे, गोपाळ बिराजदार, मनोहर जाधव, सुभाष मासाळ, विजय लिगाडे, अंकुश फाळके, श्री. मड्डी , श्रीमती गुगवाड , भरत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. यासाठी पालक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.Thursday, November 24, 2022

जतचा मुद्दा कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक उखरून काढला

 महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जतमधील काही गावांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. मात्र, या भागातील लोकांनी अपवाद वगळता कधीही कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही; परंतु १९५६ मध्ये सीमाप्रश्न निर्माण झाल्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जाण्याची लोकेच्छा वेगवेगळ्या मार्गाने दाखवून दिली आहे. 

१ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्य पुनर्रचना करण्यात आली. यावेळी बेळगाव,बिदर ब गुलबर्गा जिल्ह्यातील मराठी भाषिक गावे तत्कालीन म्हैसूर राज्यात घालण्यात आली. या विरोधात ६६ वर्षांपासून मराठी जनता विविध मार्गाने या प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. २५ जून १९५७ रोजी महाराष्ट्राचे  यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषिक निवड करून महाराष्ट्रात  विलीन करावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती भाषावार प्रांतरचना करताना दक्षिण सोलापूर, जत, अक्कलकोट, मंगळवेढा, गडहिंग्लज व शिरोळ तालुक्‍यातील 260  कन्नड गावे महाराष्ट्रात गेली आहेत, असे सांगत म्हैसूर सरकारनेही केंद्राकडे अर्ज दिला होता. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा त्यावेळच्या झोनल कौन्सिलिंगने लक्ष दिले नाही.

कर्नाटकात मराठी भाषिकांचा मोठा प्रदेश 

 कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांनी मराठी भाषिकांच्या मोठा प्रदेश म्हैसूर राज्यात आला आहे, तो परत दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांची ही घोषणा कर्नाटकातील इतर राजकर्त्यांनी स्वीकारली नाही. त्यामुळे सीमाप्रश्‍न सुटावा, यासाठी महाराष्ट्र सरकार आणि मराठी भाषिकांनी आपला लढा  सुरूच ठेवला आहे. मात्र, कर्नाटकाने अनेकदा मागणी वरून देखील  महाराष्ट्रात असलेल्या कन्नड गावातील नागरिकांनी कधीही आंदोलन  किंवा  लोकेच्छा दाखवून  दिलेली  नाही.  त्यामुळे  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला तरी त्या भागातील नागरिकांचा याला विरोध आहे. 

महाजन आयोगाची स्थापना

 लोकशाही मार्गाने प्रश्‍न सुटत नसल्याचे दिसून आल्यानंतर सेनापती बापट यांनी २५ मे १९६६ पासून उपोषणाला सुरुवात केली. यामध्ये सीमाभागातील आमदार बा. र. सुंठणकर, समितीचे सचिव बळवंतराव सायनाक व पुंडलिकजी कातगडे सहभागी झाले होते. त्यानंतर याबाबत बॅरिस्टर नाथ पै यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे मध्यस्थीची मागणी केली. त्यानंतर सरकारने महाजन आयोगाची स्थापना केली.

आयोगाचा विसंगत अहवाल

महाजन आयोगाला महाराष्ट्र सरकारने लोकेच्छा , भौगोलिक सलगता, भाषिक बहुसंख्य आणि खेडे हाच घटक याचा विचार करून गावांची देवाणघेवाण करावी, अशी मागणी केली होती. मात्र महाजन आयोगाने या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत विसंगत अहवाल दिला. महाराष्ट्र सरकारने 865 गावांची मागणी केलेली असताना फक्त 264  गावे महाराष्ट्राला तर कर्नाटक सरकारला 247 गावे कर्नाटकला देण्यात आली. मात्र महाराष्ट्र सरकारने हा अहवाल फेटाळला. तसेच हा अहवाल संसदेत ठेवून देखील त्यावर चर्चा होऊ शकली नाही. 

2016 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील गावांसाठी चार टीएमसी अतिरिक्त पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने चार टीएमसी पाण्याच्या बदल्यात महाराष्ट्रातील गावांसाठी आलमट्टी धरणातून दोन टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी केलेली होती. त्यांनतर मानवतेच्या दृष्टिकोनातून आजही महाराष्ट्राकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र अजूनही कर्नाटक सरकारने दोन टीएमसी पाणी देण्यास टाळाटाळ सुरूच ठेवली असून पाणी समस्या असलेल्या गावांवरच दावा केला आहे. कर्नाटक सरकारने पाणी दिले असते तर येथील समस्या कधीच दूर झाली असती, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

जाणीवपूर्वक मुद्दा उकरून काढला 

महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्‍नी उच्चाधिकार कमिटीची बैठक घेऊन सीमाप्रश्‍नाला चालना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बोम्मई सरकारने जाणीवपूर्वक जतचा मुद्दा उकरून काढला आहे. तसेच सीमाभागात सातत्याने कन्नडची सक्ती करणाऱ्या आणि मराठी भाषिकांना  डिवचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकने प्रश्‍न सोडवण्यात खो घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असे मत व्यक्‍त होत आहे. 

पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी योजना हाती 

जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावत असल्याने मागणी करूनही पाण्याची पूर्तता होत नसल्याने २०१२ मध्ये जत तालुक्‍यातील ४० गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता. या व्यतिरिक जत भागातून कधीही कर्नाटकात जाण्याबाबत आवाज उठविण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. जतमधील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना देखील हाती घेतल्या जात आहेत. 

माहिती जाणून घ्या - 'इट राईट इंडिया’ म्हणजे काय?

भारतीयांच्या दृष्टीने धार्मिक ठिकाणे श्रद्धेची आहे. अशा ठिकाणचे अन्न शुद्ध अन्‌ पवित्र मानले जाते. धार्मिक संस्थांच्या प्रसादालय, लंगर, भंडाऱ्यातील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया’ उपक्रमांतर्गत भोग प्रमाणिकरण केले जाते. हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे मानांकन केले जाते. कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ असल्याने हॉटेल-रेस्टॉरंटमधील अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाते. त्याधर्तीवर उत्तरेत प्रसादालय ‘भोग'' म्हणून संबोधले जाणाऱ्या धार्मिक संस्थांच्या प्रसादालयात अन्न सुरक्षा व स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी ‘इट राईट इंडिया‘ हा उपक्रम राबवला जातो. प्रसाद, अन्न पदार्थ तयार करताना हाताळणी आणि अन्नपदार्थांच्या वाटपासह विक्रेत्यांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्याचा त्यात समावेश आहे. उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून धार्मिक स्थळांची निवड केली जाते. अशा ठिकाणी अन्न सुरक्षा व मानांकन कायदा २००६ अंतर्गत परवाना देण्यात येतो. आहे.अन्न सुरक्षा व मानांकन विभागाच्या माध्यमातून प्रमाणिकरण केले जाते. देशातील ७५ जिल्ह्यांतील ३०० धार्मिक स्थळावर या उपक्रमांतर्गत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेची हमी देण्यात आली आहे. राज्यातील दादरचे सिद्धिविनायक मंदिर, इस्कॉन मंदिर, नांदेडचे गुरुद्वारा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर इथे मोठ्या प्रमाणात भाविक प्रसाद घेतात. तिथे या उपक्रमाची अंमलबजावणी यापूर्वी सुरु करण्यात आली. श्री सप्तशृंग देवी गड आणि त्र्यंबकेश्‍वरच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथील प्रसादाचे प्रमाणिकरण करण्यात आले आहे.

स्वामी समर्थ रामदास काय म्हणतात?

पोट भरणे हे यज्ञकर्मवदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।जिवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥१॥|| जय जय रघुवीर समर्थ ||समर्थ रामदास स्वामी यांचा हा श्‍लोक आहे. अर्थात, तोंडात घास घेताना श्री हरीचे फुकटचे नाव घेतल्याने हवन होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न साक्षात परब्रह्म आहे. पोटभरणे म्हणजे जेवण असे नाही, तर तो एक प्रकारचा यज्ञकर्म आहे, असे समर्थांनी या श्लोकात म्हटले आहे."

सांगली जिल्ह्यात 699 ग्रामपंचायती; 71 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाहीत

माहिती जाणून घ्या

सर्वाधिक जत तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नाहीत 

सांगली जिल्ह्याची स्थापना 1961 साली झाली. जिल्ह्यात दहा तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये मिळून एकूण 699 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या आता तीस लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची लोकसंख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नाहीत. यांपैकी सर्वाधिक 26  ग्रामपंचायती जत तालुक्यातील आहेत. जत तालुका सांगली जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका आहे. 120 गावांचा तालुका आहे. यामध्ये ऐतिहासिक उमराणी गावासह कोंतेव बोबलाद, बालगाव, अंकलगी या मोठ्या गावांचाही समावेश आहे. प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यातील घनघोर युद्ध उमराणी येथे झाले होते. अशा या शिवकालीन , प्रसिद्ध गावची लोकसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. मात्र तरीही या गावाला अद्याप ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत नाही. जिल्ह्यात स्वतःचे कार्यालय नसलेल्या 71 ग्रामपंचायतींची लोकसंख्या आता सरासरी दोन हजारांच्या घरात आहे. यातील 16 गावांची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार हजारांच्या आतच आहे. मात्र उर्वरित गावची लोकसंख्या अधिक असूनही त्यांना स्वतःची इमारत नाही. इमारती नसलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे: तासगाव 6, कवठेमहांकाळ2, आटपाडी4, कडेगाव 4, पलूस 2, मिरज 4, शिराळा 8, खानापूर7, वाळवा 8 

Wednesday, November 23, 2022

आरोग्यादायी रानभाज्यांचा आहारात समावेश करा: डॉ. विनोद शिंपले


जत,(जत न्यूज नेटवर्क) -

 आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार केल्याने चुकीच्या आहाराचे सेवन केले जात आहे. त्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. निरोगी प्रकृती राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. विनोद शिंपले यांनी केले. डॉ. शिंपले जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित "औषधी रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा" यांच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील  होते.

डॉ. शिंपले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, जगातील सतरा देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. त्यात भारताचा समावेश आहे. आपल्या देशातील उत्तर-पूर्व हिमालय भूप्रदेश (ईशान्य भारत), पश्चिम घाट परिसर, उत्तर-पश्चिम हिमालय भूप्रदेश व अंदमान-निकोबार बेटांचा परिसर येथे सुमारे 48 हजार वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली असून, यापैकी 17500 प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. भारतात आठ हजार औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत, तर गवतांच्या 1200 प्रजाती आहेत. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेपैकी 7.1 टक्के वनस्पती, तर एकूण प्राणी प्रजातींपैकी 6.7 टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात. तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने भूतलावरील 35 भूप्रदेश 'अती संवेदनशील' प्रदेशांपैकी आपल्या देशातील उत्तरपूर्व हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसर 'जागतिक हॉट स्पॉट रिजीनस' म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात म्हणजेच सह्याद्री  परिसरात महाराष्ट्रातील 12 जिल्हे व 62 तालुके समाविष्ट आहेत व येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे.  निसर्गातील वनस्पती विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मानवी जीवनक्रमात माणसाचा प्रत्येकक्षणी वनस्पतींशी संबंध येतो. शेतीप्रधान भारतात विविध पिकांच्या सुमारे 166 प्रमुख प्रजाती आहेत आणि सुमारे 320 प्रजाती या पिकांच्या जाती आहेत.

मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाज्यांच्या सुमारे 55 प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाजींच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशांतून या प्रजाती अनेक वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाच्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.

अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. यामुळे भाज्यांवर  जीवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी भाजींच्या पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात विषारी रासायनिक जीवाणू-विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसांमध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, पशांचे, पोटाचे विकार इ. रोग होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना एक पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे. आपल्या सभोवताली शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. आपल्या सभोवताली असणान्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबतची प्राथमिक स्वरूपाची माहिती खेड्यात, वनात राहणाऱयांना ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे व पाककला स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.

मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, भाज्यांमध्ये अनेक घटक असतात. पालेभाज्यांतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे तंतूमय पदार्थ जे पालेभाज्यांची पाने, शिरा, देठे, फळांची साल, तसेच खोडांत मोठ्या प्रमाणात असतात. भाज्यांमध्ये जीवनसत्वे व खनिजे (मिनरल्स) प्रमाणात असतात ती यांद्वारे शोषली जातात. त्यामुळे शरीरातील सप्तधातूंची कार्ये चांगल्या पद्धतीने चालतात. तंतूमय पदार्थ लहान आतडयांत शोषले जात नाहीत, त्यामुळे ते जसेच्या तसे मोठ्या आतड्यात येतात. त्यामुळे मलाचे प्रमाण वाढते, त्यास मऊपणा येतो आणि मलविर्सजनास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपेंडिसायटीस, कोलायटीस किंवा इतर आतड्याचे विकार होत नाहीत. मोठ्या आतड्यात जंतूपासून निर्माण होणारे हानिकारक द्रव्य तसेच इतर सेंद्रीय पदार्थ तंतू शोषून घेतात आणि शरीराबाहेर टाकण्यास महत्त्वाची मदत करतात. प्रकृती निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व इतर भाज्या अत्यंत आवश्यक आहेत. पालेभाज्या "सारक' असतात, म्हणूनच स्थूल शरीर असणाऱ्यांनी तसेच मधुमेह, बद्धकोष्ठ, अपचनांचे विकार असणान्यांनी अधिक प्रमाणात पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्यांत तंतूप्रमाणेच पाणीही जास्त प्रमाणात असते. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ प्रत्येक पालेभाजीत व इतर भाज्यांत कमी अधिक प्रमाणात असतात.

आधुनिक जीवनशैलीमुळे बैठे काम, व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे, यामुळे शौचास साफ न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध अल्सर, पित्ताचा त्रास आदि विकारांचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे खानावळीतील जेवण न खाता घरी बनविलेल्या रानभाज्यांचा आरोग्य टिकविण्यासाठी आहारात वापर करावा असे शेवटी डॉ. शिंपले यांनी आवाहन केले. सदर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन करून माहिती दिली. तसेच रानभाज्यांची पाककला सादर केली. 

स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर सौदागर यांनी  तर आभार प्रा. मल्लाप्पा सज्जन यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन पाटील, प्रा. महादेव करेन्नवार, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. शिवाजी कुलाळ, प्रा. निर्मला मोरे, प्रा. संगीता देशमुख, प्रा. ललीता सपताळ व विद्यार्थी उपस्थित होते.मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' कादंबरीला पुरस्कार


सांगली,(जत न्यूज नेटवर्क)-

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील लेखिका मेघा पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या मराठी कादंबरीला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा लक्षवेधी कादंबरी लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रीरामपूर येथे 4 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.

लोककलावंत मजनुभाई शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी मेघा रमेश पाटील यांच्या 'विस्कटलेली चौकट' या कादंबरीस 'लक्षवेधी कादंबरी लेखन' पुरस्कार जाहीर झाला आहे. 4 डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

मेघा पाटील यांनी आतापर्यंत  'पुढचं पाऊल'  (काव्यसंग्रह) , 'आलकीचं लगीन' (कथासंग्रह) तसेच 'उंबरठ्यावरचा नाल', 'विस्कटलेली चौकट', 'शेतकरी नवरा', 'सुलवान' या चार कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना साहित्य कलायात्री प्रकाशनकडून कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, युगंधर काव्यभूषण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाले आहेत. तसेच गारगोटी, अमरावती, पंढरपूर, नागपूर, जामखेड, अहमदनगर, पुणे, सटाणा, औरंगाबाद येथील विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच विविध काव्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे मिळवली आहेत. शेटफळे (आटपाडी) येथील कविसंमेलनात अध्यक्षस्थान भूषवले आहे. विविध कविसंमेलनात काव्य वाचन केले आहे.

नयना सोनवणे महिला नारीरत्न पुरस्काराने सन्मानित


जत,(जत न्यूज नेटवर्क)-

जत येथील मनुश्री बहुउद्देशीय विकास मंडळाच्या अध्यक्षा नयना भास्कर सोनवणे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणेस्थित मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देऊन पुण्यातील एका कार्यक्रमात गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा आकादमीच्यावतीने नुकताच पुणे येथे गुणिजन गौरव पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण झाले. या समारंभात नयना भास्कर सोनवणे यांनी मनुश्री बहुउद्देशीय विकास मंडळ (जत) या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात जे कार्य केले त्या कार्यासाठी त्यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक लोकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नूर महाराज प्रमुख पाहुणे होते. तज्ज्ञ मार्गदर्शक मोनिका यशोद, समाजसेवक तात्यासाहेब रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.