जत,(प्रतिनिधी)-
ग.दि. माडगूळकर यांनी सामान्य माणसांच्या हृदयात घर केले. सामान्य माणसांना त्यांनी आपलेसे केले , म्हणून त्यांचे साहित्य, गीत रामायण व अनेक भावगीते घराघरात आजही आवडीने ऐकली जातात, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे 'प्राध्यापक प्रबोधिनी' अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे हे होते. प्रारंभी प्राध्यापक प्रबोधिनीचे समन्वयक प्रा. एस. डी . चव्हाण यांनी प्रास्ताविक व स्वागत करून प्राध्यापक प्रबोधिनी मागील हेतू स्पष्ट केला.
ग. दि. माडगूळकर यांचे बहुतेक लेखन आत्मप्रकटीकरण व सौन्दर्य शोध यातून जन्मलेले आहे, याचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व बहुआयामी होते असे सांगून डॉ. जोंशी पुढे म्हणाले कि, गीते, कविता, सांगितिका, गीतकाव्ये, नाट्य नाटिका, काव्यगीते, कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, प्रवासवर्णन बालगीते, आत्मवृत्त अशा विविध वाड:मय प्रकारात लेखन केले. कलेच्या आणि वाङ्मयाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात जे कार्य केले ते उल्लेखनीय आहे असे सांगून ते शेवटी म्हणाले कि, ग. दि. माडगूळकर हे सांगली जिल्ह्याला लाभलेले लेणे आहे.
अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे म्हणाले कि, ग. दि. माडगूळकर यांच्या चरित्रातून एक प्रकारची ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. शून्यातून विश्व कसे उभे करावे हे ग. दि. माडगूळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर कळते. ग. दि. माडगूळकर यांची भावगीते आजही मनाला भुरळ घालतात. त्यांच्या लिखाणामध्ये जगण्याची प्रेरणा मिळते म्हणून ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे सर्वांनी वाचन केले पाहिजे असेहि प्राचार्य शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनकर कुटे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. अशोक हेरवाडे यांनी मांडले . कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment