Tuesday, December 25, 2018

गैरसोय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा: विनायक शिंदे


जत, (प्रतिनिधी)-
 चालू शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षक बदल्यांमध्ये संगणकीय व तांत्रिक चुकांमुळे झालेल्या गैरसोयीच्या बदल्यांमध्ये बदल करावेत, या मागणीसाठी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने दोन दिवसांत ग्रामविकास विभागाच्या सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या मे व जून 2018 मध्ये 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन आदेशानुसार ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या. यामध्ये संगणकीय तांत्रिक चुकांमुळे काही शिक्षकांच्या गैरसोयीच्या बदल्या झाल्या. जे शिक्षक रँडम व विस्थापित होऊन 100 ते 150 किलोमीटर अंतरावर बदली होऊन गेले. त्यांची फार मोठी गैरसोय झालेली आहे. त्यांना न्याय मिळावा, यासाठी शिक्षक संघाच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. याशिवाय विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडेही न्याय मागितला आहे. पण अद्याप त्याला यश आलेले नाही.
या रँडम व विस्थापित शिक्षकांमध्ये बर्याच महिला भगिनी व ज्येष्ठ शिक्षक आहेत. महाराष्ट्रातील बर्याच जिल्ह्यात अशा प्रकारच्या शिक्षकांच्या सोयी कराव्यात, अशी मागणी वारंवार झालेली आहे. पण याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या शिक्षकांना न्याय मिळावा, यासाठी सांगली जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने ग्रामविकास विभागाचे सचिव यांना येत्या दोन दिवसांत भेटणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.

No comments:

Post a Comment