जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी
आपल्या विविध मागण्यांसाठी आज जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी पाठिंबा दर्शविला.
सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण
रोजगार हमी योजनेच्या कामासाठी एकेक ग्रामरोजगार सेवक कार्यरत आहे. शासन निर्णयाप्रमाणे ग्रामरोजगार सेवकांना मॅनडेज प्रमाणे मानधन आणि प्रवास
भत्ता, महागाई भत्ता वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेने आपल्या
निवेदनात केला आहे. यावेळी ग्रामरोजगार सेवकांच्या विविध समस्या
मांडण्यात आल्या. यावेळी संघटनेने ग्रामरोजगार सेवकांना इतर राज्यांप्रमाणे
दर महिन्याला वेतन मिळावे, हे वेतन त्यांच्या वैयक्तिक खात्यावर
जमा करण्यात यावे, सेवकांचे प्रलंबित मानधन तात्काळ मिळावे आणि
सध्या जत तालुक्यात घरकूल योजना वगळता कोणतीच कामे सुरू नसल्याने ग्रामरोजगार सेवकांवर
उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात रोजगार हमीची नव्याने कामे
सुरू करण्यात यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांसाठी जत तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संजयकुमार गुरव, संतोष कुंभार,
सिद्धाप्पा माळी, विजय रुपनूर, उत्तम शिंदे, हिम्मत कोडग,बाळासाहेब
वाक्षे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सेवकांनी सहभाग घेतला होता.
या आंदोलनाला अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी येऊन पाठिंबा दिला.
यात जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सौ.रेखा बागेळी, अॅड. प्रभाकर जाधव, नगरसेवक उमेश सावंत, अजितकुमार पाटील, हणमंत कोळी, पंचायत
समितीचे माजी सदस्य सुनील पवार, रिपब्लिकन पक्षाचे श्रीकांत हुवाले,
टॅक्सी सम्घटनेचे संतोष मोटे, सज्जन चव्हाण
(डफळापूर), धुंडाप्पा बिराजदार, मोकाशीवाडीचे सरपंच आण्णासाहेब गायकवाड आदींनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन
पाठिंबा दिला.
गटविकासाधिकारी सौ.वाघमळे यांचे आंदोलनाकडे दुर्लक्ष
ग्रामरोजगार सेवकांचे धरणे आंदोलन जत
तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असताना याच ठिकाणी दहा फुटाच्या अंतरावर पाणी फौंडेशनच्यावतीने
चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या
चित्र प्रदर्शनाला गटविकास अधिकारी सौ. वाघमळे यांनी भेट दिली.मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. या आंदोलनकर्त्यांना
न भेटताच त्या निघून गेल्याने सेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment