अलिकडच्या काही वर्षात मराठी चित्रपटाने कात टाकली
आहे.
नवनवीन विषय, नाविण्यपूर्ण हाताळणी यामुळे मराठी
चित्रपटांकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. 2018 या वर्षातही
हीच प्रतिमा कायम ठेवत मराठी चित्रपट आणि कलाकारांनी आपला ठसा उमटविला. कलात्मक सादरीकरण, दमदार अभिनय आणि गुणवत्तापूर्ण विषय-
लिखाणातून प्रत्येक वेळी प्रेक्षकांसाठी काही नवीन देण्याचा प्रयत्न
यशस्वी ठरला. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेला
‘ये रे ये रे पैसा’ हा रोहित शेट्टीच्या स्टाईलचा
चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला. संजय जाधव दिग्दर्शित आणि सिद्धार्थ
जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडितच्या प्रमुख भूमिका असलेल्या
या पूर्णत: मनोरंजक चित्रपटाने चांगली कमाई केली. संजय जाधवचे दिग्दर्शन आणि दर्जेदार अभिनयासाठीही हा चित्रपट चर्चेत राहिला.
याचवेळी
प्रदर्शित झालेल्या ‘बारायण’ चित्रपटात,
बारावीच्या वर्षाला असलेला आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि स्वत:ची इच्छा अशा कात्रीत सापडलेल्या मुलाची गोष्ट बघायला मिळाली. मुळात हा विषय गंभीर आणि त्यात दीपक पाटील यांच्या दिग्दर्शनात वंदना गुप्ते,
संजय मोने आणि प्रतीक्षा लोणकर यांच्यासह नवोदित कलाकारांचा अभिनय अशी
मेजवानी या चित्रपटातून दर्शकांना मिळाली. समीक्षकांनीही या चित्रपटाची
प्रशंसा केली. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी या जोडीची
जमून आलेली केमिस्ट्री ‘व्हॉट्स अप लग्न’ या नव्या विषयावरील चित्रपटात बघायला मिळाली. विश्वास जोशी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा सोशल मीडियाचा नात्यांवर होणारा परिणाम
या दृष्टीने फुलते. ‘ल्हिली तुला, मिळाली
तिला’ या मजेदार टॅगलाईनमुळे वैभव डांगेचा ‘चिठ्ठी’ हा चित्रपट चर्चेत आला. निरागस प्रेमपत्र भलत्याच व्यक्तीच्या हातात पडल्याने उडालेली धमाल धनश्री
कडगावकर आणि शुभांकर एकबोटे यांच्या अभिनयातून बघायला मिळाली. काही चित्रपट महोत्सवांमध्येही हा चित्रपट सादर झाला हे विशेष! कथेचा सुखांत किंवा दु:खांत होण्यापेक्षा तिसर्या प्रकारे म्हणजे तडजोडीचाही असू शकतो, हे समीर पाटील
यांच्या ‘यंटम’ चित्रपटाने दाखवून दिले.
या तरल प्रेमकथेत सयाजी शिंदे, अपूर्वा शेलगावकर,
वैभव कदम आणि ऐश्वर्या पाटील यांच्या मुख्य भूमिका
होत्या. भावनापूर्णतेचा ओव्हरडोज असलेल्या ‘आपला माणूस’ या सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर
अभिनित चित्रपटाची जोरदार चर्चा झाली आणि त्याने चांगली कमाईही केली.
सचिन कुंडलकर दिग्दर्शित आणि सोनाली कुळकर्णी आणि
सिद्धार्थ चांदेकर अभिनीत ‘गुलाबजाम’ या चित्रपटाची यावर्षी सर्वाधिक चर्चा झाली. पारंपरिक
मराठी पदार्थांच्या पृष्ठभूमीवर जीवनातील विविध प्रसंग दाखविणार्या या चित्रपटाला सर्वदूर चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आम्ही
दोघी’ हा प्रतिमा जोशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे-प्रिया बापट आणि भूषण प्रधान अभिनीत चित्रपट महिलाप्रधान होता. समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेल्या या चित्रपटाने पश्चिम महाराष्ट्रात चांगली कमाई केली. मराठी चित्रपटसृष्टीत
कमी वेळा हाताळण्यात आलेला गूढ आणि रहस्यपटांचा विषय ज्ञानेश झोटिंगने ‘राक्षस’मधून हाताळला. सई ताम्हणकर
आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली.
यावर्षीच्या सर्वाधिक चर्चित आणि कमाई करणार्या चित्रपटांमध्ये माधुरी दीक्षितचा ‘बकेट लिस्ट’,
मुक्ता-स्वप्नीलचा ‘मुंबई-पुणे- मुंबई 3’, सुबोध भावेचा
‘मी...काशिनाथ घाणेकर’, वादग्रस्त
‘मुळशी पॅटर्न’ आणि नागराज मंजुळेचा ‘नाळ’ या दोन चित्रपटांचा समावेश करावा लागेल.
वर्षाच्या सर्वाधिक गाजलेल्या गाण्यांमध्ये ‘नाळ’मधील ‘जाऊ दे नं वं’, ‘रेडू’मधील ‘देवाक काळजी रे’ या गाण्यांसह
‘फर्जंद’मधील ‘शिवबा आमचा
मल्हारी’, ‘बकेट लिस्ट’मधील ‘होऊन जाऊ द्या’ आणि ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’मधील ‘आली ठुमकत नार लचकत’ ही गाणी तुफान गाजली. ‘धप्पा’,‘म्होरक्या’ आणि
‘कच्चा लिंबू’ या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय
पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली. वर्ष सरताना, ‘आरण्यक’,‘हॅम्लेट’,‘अ परफेक्ट मर्डर’
आणि ‘तिला काही सांगायचंय’ ही वेगवेगळ्या विषयांवरील नाटके रंगभूमीवर गाजली. नव्या
वर्षात अनेक मोठे चित्रपट मराठी बॉक्स ऑफिसवर धडकण्याच्या तयारीत असून त्यात,
‘भाई’ आणि ‘माऊली’चा प्रामुख्याने समावेश करावा लागेल.
No comments:
Post a Comment