जत,( प्रतिनिधी)-
उमराणी (ता. जत) येथील मल्लिकार्जुन विकास सहकारी सोसायटीने राज्यशासनाच्या कर्जमाफी वरील एक लाख वीस हजार रुपयांची व्याजआकारणी चुकीच्या पध्दतीने केली आहे. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जत येथे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयास टाळे ठोकले. तसेच शासनाचा निषेध केला.
या निवेदनात कार्यकर्त्यांनी म्हटले आहे, मल्लिकार्जुन विकास सोसायटीच्या काही कर्जदार शेतकरी सभासदांना कर्जमाफी मिळाली होती. तरीही सोसायटीने त्यांच्याकडून कर्जमाफीवरील जादा व्याजाची जवळपास एक लाख वीस हजार रुपयांची रक्कम वसूल केली होती. शासनाच्या नियमानुसार थकित कर्जावरील व्याज वसूल करण्यात येत नाही. यामुळे ही व्याज आकारणी बेकायदेशीर आहे. यासंदर्भात तक्रार केली. त्यावर सदरची रक्कम शेतकर्यांना परत करण्यात यावी, असा आदेश वरिष्ठांनी सोसायटीस दिला होता. मात्र यासाठी सोसायटी रक्कम परत करण्यास कुचराई करत होती. यासाठी संघटनेच्यावतीने टाळे ठोकण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला.
शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दुंडाप्पा बिराजदार, सुरेश कवटगी, शंकर गदग, शिवानंद बिराजदार, महादेव राजगोंड, सिध्दू परीट, काडाप्पा धनगोंड यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment