Friday, December 28, 2018

जि.प. तोडफोड: संशयितांना 4 दिवसांची कोठडी


सांगली,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील संख गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेत गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करत गुरुवारी सांगलीत जिल्हा परिषदेत तोडफोड करणार्या नऊ जणांना कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्यांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा समावेश आहे.

संख येथील नळपाणीपुरवठा योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी घेऊन आंदोलकांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाने आंदोलकांना चौकशीचे आश्वासन देणारे लेखी पत्रही दिले होते. परंतु आंदोलकांनी संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे पत्र देण्याची मागणी करत पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय गाठले. त्या कार्यालयात जाताच दरवाजा बंद करून आता कोणीही बाहेर जाणार नाही, असे बजावत कार्यालयात तोडफोड सुरू केली. या तोडफोडीत कक्ष अधिकारी कल्पना सुदाम रेंगडे यांना दुखापत झाली. कार्यालयाचे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन संघटनेच्या नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात श्रीमती रेंगडे यांनी फिर्याद देताना संबंधितांनी सरकारी कामात अडथळा करुन, अधिकारी कर्मचार्यांना कोंडून घालून कार्यालयाची तोडफोड करून नुकसान केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्या फिर्यादीनंतर संबंधितांना अटक करून शुक्रवारी कोर्टासमोर हजर केले. अटकेत असलेल्या सर्वांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून यामध्ये विकास देशमुख, महेश खराडे, महावीर आदगोंडा पाटील, महादेव दुड्डाप्पा बागेळी, भीमराव रामगोंडा बिरादार, भीमाशंकर मल्लिकार्जुन बिरादार, रमेश रामचंद्र माळी, सिध्दमला शिवराम जनगोडा आदींचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment