Friday, December 28, 2018

जनतेची दिशाभूल करणे म्हणजेच गुजरात पॅटर्न : प्रतीक पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभेसाठी इच्छुक असलो, तरीही पक्ष निर्णय घेईल, तो मान्य असेल. काँग्रेसमधील मतभेद दूर करून एकत्रित येऊन ही लोकसभा व विधानसभा लढविली जाणार आहे. पक्ष सांगेल तो निर्णय अंतिम राहील. विशाल पाटील, विश्वजित कदम आम्ही सर्वजण एकत्रितपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. भाजप सरकारचे आता पितळ उघडे पडले आहे. जनतेतून आता भाजपविरोधी लाट निर्माण झाली आहे. ‘जनतेची दिशाभूल म्हणजेच गुजरात पॅटर्नआहे. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या आता परत होणार नाहीत, असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले.

 माजी केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनीशी लढविणार आहोत. दिवंगत पतंगराव कदम, मदन पाटील, हाफिज धत्तुरे; तसेच राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील हे दिग्गज नेते नसल्याने मोठी पोकळी जाणवत आहे. परंतु आता विशालपाटील, विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आम्ही एकत्रित, एकाविचाराने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. भाजपच्या फसव्या धोरणां-विरोधात आता सर्वसामान्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. विद्यमान खासदारांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. नुसते आश्वासनांचे गाजर दाखवून मोदीलाटेवर ते निवडून आले होते. आता ती लाट ओसरली आहे. विद्यमान खासदारांनी गेल्या चार वर्षांत कोणतीही ठोस अशी कामे केली नाहीत. की कोणते उद्योग आणले नाहीत. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा युवकांमध्ये होती. परंतु तीही आता फोल ठरली आहे. बेरोजगारीचा आलेख वाढतच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतीक पाटील म्हणाले, आम्ही विकासकामांचा डोंगर उभा करूनही विद्यमान खासदार पक्षाला अदखलपात्र म्हणतात. परंतु आगामाी निवडणुकीत जनताच तुम्हाला अदखलपात्र करणार आहे. मिरजपूर्व भागासाठी वरदान असलेली म्हैसाळ योजना ही काँग्रेसने पूर्णत्वाकडे नेली. भाजप मात्र आता ही योजना पूर्ण केल्याचा आव आणत आहे. अजूनही पूर्व भागात पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. नोटाबंदी, जीएसटी अशा अनेक चुकीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका भाजपची सत्ता असली तरी भविष्यात काँग्रेसमधून गेलेले सर्वजण परत काँग्रेसकडे येतील. भाजपचा स्वत:चा कार्यकर्ता नाही. तो आयात करूनच सत्ता काबीज केली आहे. भाजपविरोधी लाट आता जोरात आहे. आता राज्यात कॉग्रेसची सत्ता येणार आहे. काँग्रेस सोडून गेलेल्यांची आता पंचाईत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment