तुरीला आधारभूत किमतीपेक्षा तब्बल हजार रुपये कमी दर
|
|
दुष्काळामुळे यंदा उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक घट होऊनही सध्या तुरीचे बाजारभाव
सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा कमी म्हणजे 4500 ते 4800 रुपये प्रतिक्विंटल असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकर्यांना सांगलीत जाऊन तूर विक्री करणे, आर्थिकदृष्ट्या
परवडत नाही. यामुळे शेतकर्यांना उत्पादनाच्या
दीडपट बाजारभाव मिळवून देऊ, अशी वल्गना करणार्या सरकारविरुध्द तूर उत्पादक शेतकर्यांकडून संताप व्यक्त
होत आहे.
यंदा तूर उत्पादित क्षेत्रात दुष्काळस्थिती असल्यामुळे उत्पादनात 80 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. सध्या तुरीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. केंद्र शासनाने तुरीला प्रतिक्विंटल 5 हजार 675 रुपये आधारभूत किंमत जाहीर केली आहे. तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शिवाय आर्थिक विवंचनेत असणार्या शेतकर्यांना सांगलीसह राज्यातील विविध कृषी उत्पन्नबाजार समितीत आपला माल विक्री करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पणनमंत्र्यांनी राज्यात आधारभूत तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात पणन विभागातर्फेे केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात व्यापार्यांना तूर विकू नये, असे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर देशाला डाळीची मोठी गरज असून शेतकर्यांनी डाळवर्गीय पिके घ्यावीत, असे आवाहन केले होते. त्याचवर्षी अन्य देशामधून डाळीची आयातही करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकर्यांनी तुरीचे विक्रमी उत्पादनही घेतले. त्यानंतर शेतकर्यांना तूर कवडीमोल दरात विक्री करावी लागली. अशा प्रकारे शेतकरी हिताच्याविरोधी धोरण अवलंबल्याने राज्य व केंद्र सरकारविरोधात शेतकर्यांमधून नकारात्मक भावना निर्माण होत आहे. त्यामुळे राज्यात तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
मिळेल त्या दरात तूर विक्री पर्याय!
पाऊस नसल्याने यंदा तुरीच्या उत्पादनात
मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सध्याचा बाजारभाव
विचारात घेतल्यास उत्पादन खर्चही निघत नाही. सरकारी खरेदी केंद्रही
सुरू नाहीत. आर्थिक अडचणीमुळे शासनाच्या खरेदी केंद्राची वाट
न पाहता मिळेल त्या दरात व्यापार्यांना तूर विकण्याशिवाय पर्याय
नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
तूर डाळीला मागणी
संपूर्ण
देशभरात प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातल्या पूर्व भागासह सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, जालना,
बीड, रायचूर, कलबुरगी,
विजयपूर, बिदर या परिसरात मोठ्या प्रमाणात तुरीचे
उत्पादन घेतले जाते. त्यामुळे लगतच्या सोलापूर, लातूर, बार्शीसारख्या ठिकाणी डाळ गिरण्यांची संख्या दिवसेंदिवस
वाढत आहे. येथील तुरीच्या डाळीला संपूर्ण देशभरात मागणी असते.
No comments:
Post a Comment