जत,(प्रतिनिधी)-
मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने दि.3 ते 26 जानेवारी अखेर सर्व शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे.
गेल्या 2 वर्षापासून राज्यातील सर्व शाळामध्ये 3 ते 26 जानेवारी या कालावधीत शैक्षणिक परिवर्तनाचे विशेषत:मुलींच्या शिक्षणासाठी एक महत्वाचे पर्व म्हणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्यात येते. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार प्रत्येक बालकास समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद करण्याची जबाबदारी राज्य शासनास सोपविली आहे. त्यानुसार मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, मुलीच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास रूजवणे, वैचारिक व तर्किक क्षमता निर्माण करणे, शारीरीक क्षमता वाढीस लावणे, त्यांच्या सृजनशीलतेस वाव देणे, तसेच विद्यार्थ्यांची गळती कमी होण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियानाअंतर्गत शाळामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना संचालक डॉ. सुनील मगर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना दिल्या आहेत.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान हा कार्यक्रम सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळेत राबविण्यात यावा. त्यामध्ये प्रभात फेरी,सावित्रीबाई फुले प्रतिमा पुजन व जीवन चरित्राचा परिचय, बालिका दिनाची प्रतिज्ञा व एकांकिका सादरीकरण व लघुपट दाखवून शाळा बाह्य मुले मुलींची यादी जाहीर करावी.
बालिका दिनी मी एक स्वतंत्र बालिका आहे. माझे भवितव्य मी घडविणार आहे. यासाठी येणार्या संकटाना, अडीअडचणींना धैर्याने तोंड देवून माझे शिक्षण पूर्ण करण्याची तयारी आहे. माझे शिक्षण मी अर्धवट सोडणार नाही. शिवाय माझ्या इतर भगिनींना देखील शिक्षणासाठी प्रोत्साहन देईन. घटनेने व्यक्ती म्हणून दिलेल्या हक्कांचा मी पूर्ण वापर करीन. सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केलेल्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून सदैव प्रयत्न करीन, देशाच्या प्रगतीच्या मार्गावर नेणारी सुजाण नागरिक बनेन अशी प्रतिज्ञा बालिका दिनी घेण्यात येणार आहे.
तसेच बालक पालक मेळावा, लेक वाचवा व लेक शिकवा या विषयावर स्पर्धा, शाळा बाह्य मुला मुलींच्या पालक भेटी, व्यावसायिक मार्गदर्शन, महिला कार्यकर्त्यांचा सन्मान, महिलांचे सक्षमीकरण या विषयावर प्रश्नमंजुषा, एक दिवस शाळेसाठी, स्व ओळख, स्व संरक्षणाची जाणीव व सुरक्षिततेचे उपाय, मैदानी व बौध्दीक स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा आराखडा शाळा प्रशासन व मुख्याध्यापकांना देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment