Monday, September 30, 2019

शासनाच्या सातव्या वेतन आयोगानंतरही मंदीचे सावट

चाकरमानी पैसा खर्च करेनात; उत्पन्नघटीमुळे
शेतकऱ्यांकडूनही खर्च बचतीला प्राधान्य
जत,(प्रतिनिधी)-
देशात नोटाबंदीपासून बाजारावर आलेले मंदीचे सावट अजूनही ओसरलेले नाही. शासन मागील दोन अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यालाही फारसे यश आलेले दिसत नाही. सातव्या वेतन आयोगानंतरही चाकरमान्यांच्या हातात पैसा खळखळेल व बाजाराला चैतन्य प्राप्त होईल, अशी व्यापाऱ्यांची आशा होती. परंतु तीसुद्धा फोल ठरल्याचे दिसून येत आहे.

Saturday, September 28, 2019

जतची डोंगरनिवासिनी श्री अंबाबाई

जत शहरापासून दक्षिणेला सुमारे दोन अडीच किलोमीटर अंतरावर, अथणी मार्गालगत असलेल्या डोंगरावर श्री अंबाबाईचं वसतीस्थान आहे. अलिकडच्या काही वर्षात याठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जात असल्याने आणि हा डोंगर परिसर शासनाने पर्यटनस्थळ म्हणून विकसित करायला घेतल्याने नवरात्र काळात आणि देवीच्या वारादिवशी भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसतात. निसर्गरम्य परिसर असल्याने अनेक भाविक सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह वेळ घालवायला येतात. परिसरातल्या शाळांच्या वनभोजनाच्या सहली येत असतात. या ठिकाणी एकप्रकारची शिस्त लावली गेली असल्याने भाविकांना इथे यायला आवडते. साहजिकच एक पर्यटनस्थळ म्हणून हा अंबाबाई डोंगराचा परिसर हळूहळू नावारुपास येऊ लागला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने शिक्षकांना 10 लाखांचे कॅश क्रीडेट देण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात सुमारे दहा हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या आहे. या शिक्षकांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 10 लाख रुपयांचे कॅश क्रेडिट देण्याची मागणी शिक्षक नेते मच्छिंद्र ऐनापुरे यांनी केली आहे. यामुळे शिक्षकांना अर्थसहाय्य तर होणार आहेत,पण बँकेलाही याचा फायदाच होणार आहे.
राज्यातल्या शिक्षक आणि इतर सरकारी कर्मचाऱयांना सातवा वेतन लागू झाला आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कॅश क्रेडिट रकमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शिक्षकांना सध्या 10 लाखांचे कॅश क्रेडिट देते.

जत तालुक्यात विविध ठिकाणी पोषणयुक्त आहाराचे प्रदर्शन

( जत येथे पोषणयुक्त आहार कार्यक्रमात फळा-भाज्यांची वसुंधरा माता हा  जिवंत देखावा उभा करण्यात आला होता.)
जत,(प्रतिनिधी)-
येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्यावतीने राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत जत तालुक्यातील अंगणवाडी विभागात अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्याच बरोबर पोषणयुक्त आहाराचे प्रदर्शन मांडून त्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले.

Thursday, September 26, 2019

जतेत मोकाट जनावरांचा 'रास्ता रोको'

(जत-अथणी रस्त्यावर बैठक मारून बसलेली जनावरे. शहारातल्या प्रमुख रस्त्यावर जनावरांचा नेहमीच रास्तारोको होत असल्याने वाहन चालकांना मार्ग काढणे अवघड होऊन जाते.)
जत,(प्रतिनिधी)-
शहरातील सर्वच रस्त्यांवर मोकाट जनावरांचा रात्रंदिवस वावर वाढला आहे. यामुळे वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच अपघातांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. शहरातल्या प्रमुख रस्त्यावरच ही जनावरे 'रास्ता रोको' करत असल्याने वाहन चालक पुरते वैतागले आहेत.

Wednesday, September 25, 2019

सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रभावी औषधे

२५ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक फार्मासिस्ट दिन' म्हणून जगभरात साजरा होत आहे. 'सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रभावी औषधे' ही संकल्पना या वर्षीच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने 'घोषवाक्य' म्हणून 'इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशनने' जाहीर केली. ही फेडेरेशन १४0 देशांचे प्रतिनिधित्व करते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरज आहेत. या व्यतिरिक्त ह्यऔषधे ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये औषध संशोधन, औषध निर्मिती आणि औषध पुरवठा या अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा असतात.

शिक्षकांना इतर कामाला लावल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

जिल्हा परिषदांना ग्रामविकासाचे पत्र
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेतील शिक्षकांस विद्यार्थ्यांना ज्ञानदान
करण्याच्या कामासाठी नियुक्त केले आहे. विद्यार्थ्यांना
शिकविण्याच्या कामाव्यतिरिक्त  अन्य कामांसाठी जुंपल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास विभागानेएका पत्रान्वये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हा परिषद व गटविकास अधिकाऱ्यांरीस्तरावर जि.प. शिक्षक यांना विशिष्ठ कामगिरीवर नेमून जिल्हा परिषद मुख्यालयात तसेच गटविकास अधिकारी कार्यालयात अनाधिकृतपणे नियुक्त केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे.

Tuesday, September 24, 2019

महादेव विद्यालयात "ग्रंथ समर्पण महोत्सव" उत्साहात साजरा

( रावळगुंडवाडी ता.जत येथील महादेव विद्यालयात ग्रंथ समर्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रारंभी विद्यार्थ्यांनी गावातून ग्रंथदिंडी काढली.)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील राळगुंडवाडी येथील श्री महादेव विद्यालय येथे 'ग्रंथ समर्पण महोत्सव' सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या ग्रंथालयाला सुमारे दीड लाखांची पुस्तके देणगीच्या स्वरूपात मिळाली. या निमित्ताने हा सोहळा साजरा करण्यात आला.

जत-कवठेमहांकाळ रस्त्यावर खड्डेच खड्डे

अपघातांचे प्रमाण वाढले;प्रवाशांना पाठीचे, मणक्याचे आजार वाढले
जत,(प्रतिनिधी)-
जत-कवठेमहांकाळ या रस्त्याची अवस्था मोठी दयनीय झाली असून जागोजागी खड्डे पडले असून वाहनचालकांना खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

Sunday, September 22, 2019

जत नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल

(जत शहरातील संभाजी चौकातील मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे लोकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.)
जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील नागरिकांना  मुळात आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना संभाजी चौकात मुख्य जलवाहिनी फुटल्याने कमी दाबाने, अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.  जलवाहिनी फुटून महिना झाला तरी नगरपरिषद याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Saturday, September 21, 2019

स्वतः बनवा आपल्या जीवनाचा सूर: रसिका शेखर

तिचा जन्म दुबईत तर वाढली अमेरिकेत. यूएसमध्येच तिने आपली संगीताची आवड पुढे नेली.तिच्या म्युझिक करिअरची सुरुवात 2011 मध्ये यूएसच्या एका वोकल गझल परफॉर्मर टूरने केली होती. यात उस्ताद गुलाम अली खान यांचा समावेश होता. नंतर ती भारतात आली आणि म्युझिकल त्रिकुट शंकर-एहसान- लॉय यांच्यासोबत काम केले. गझल, जज्जपासून बॉलिवूड म्युझिक पर्यंत सर्वत्र संचार केला. तिला सर्व स्वर-लहरी आवडतात. ही आहे बासरीवादक आणि गायिका रसिका.

Friday, September 20, 2019

जिल्ह्याची वाटचाल 'धुरमुक्त-गॅसयुक्त' च्या दिशेने

जत,(प्रतिनिधी)-
'धुरमुक्त-गॅसमुक्त' महाराष्ट्र संकल्पना राज्य सरकारने राबवली. त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. 100 रुपयांत गॅस कनेक्शन साठी 5 हजार 318 कुटुंबांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यापूर्वीच 6 लाख 47 हजार 646 गॅस जोडण्या कार्यरत आहेत. नव्यांना नोंदणीसह 6 लाख 52 हजार 964 कुटुंबांकडे गॅस जोडण्या होतील. दोन सिलिंडर गॅस असलेले ग्राहक विभक्त कुटुंबात एक एक गॅस सिलिंडर वापरत  असल्याचे चित्र आहे.

डफळापूर जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार स्पर्धा

जत,(प्रतिनिधी)-
डफळापूर येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्र. 2  मध्ये पोषण युक्त आहार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे साठ मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय पोषण महिना अंतर्गत  शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात आले.

Thursday, September 19, 2019

'वंचित आघाडी' चा उमेदवार ठरवणार जतचा आमदार ?

जत,(प्रतिनिधी)-
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या इच्छूकांनी आपली मोट बांधली असून यात भाजप मध्ये इच्छूकांची मोठी गर्दी झाली आहे. काँग्रेसकडून विक्रम सावंत प्रबळ दावेदार असले तरी आघाडीच्या जागा वाटपात  जत मतदार संघ राष्ट्रवादीला  सोडल्याचीही चर्चा असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच वंचित आघाडी आपला उमेदवार देणार असल्याने जतच्या राजकारणात कोणती समीकरणे घडणार ,याबाबत उत्सुकता आहे.
जतचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर  जत विधानसभा मतदारसंघाने १५ आमदार अनुभवले आहेत. शासन नियुक्त आमदार म्हणून जे. के. मोगली हे राहिले तर १४ वेळा जनतेतून आमदार निवडले गेले आहेत. नऊ जणांना आमदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. जत विधानसभा मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसची मजबूत पकड होती, पण मागील तीन विधानसभा निवडणुकीत भाजपचे कमळ फुलले आहे. सर्वाधिक काळ आमदारपदी राहण्याचा मान उमाजीराव सनमडीकर यांना मिळाला आहे. तर दोनवेळा आमदार होण्याचा मान श्रीमंत विजयसिंहराजे डफळे, एस. टी. बामणे, अॅड. जयंत सोहनी यांना मिळाला.

जत तालुक्यात जोकमारची परंपरा कायम

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात जोकमाराचे घरोघरी पूजन व औक्षण केले जात असून, मनोभावे दर्शन घेतले जात आहे. जोकमारला पर्जन्यदेवता म्हणूनही ओळखले जाते. गेल्या दोनशे ते तीनशे वर्षापासून जोकमारची पूजा करण्याची प्रथा आहे. जत तालुक्याला दुष्काळ पाचवीला पुजला असल्या कारणाने जोकमार पूजनाची प्रथा कायम राहिली आहे.

Wednesday, September 18, 2019

सरकारी कामकाजात 'दलित' ऐवजी 'अनुसूचित जाती व नवबौध्द' शब्दांचा वापर

जत,(प्रतिनिधी)-
शासनाच्या विविध विभागांच्या योजना, शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना यामध्ये “दलित” या शब्दाचा वापर केलेला असल्यास त्याऐवजी पर्यायी शब्द वापरण्याबाबत उच्च न्यायालय,खंडपीठ नागपूर येथे याचिका क्र.११४/२०१६ दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता 'दलित' या शब्दाऐवजी 'अनुसूचित जाती व नवबौध्द' असा वापर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

Tuesday, September 17, 2019

दुष्काळग्रस्त गावातील शालेय पूरक आहार योजना चालतेय उधारीवर

दुष्काळग्रस्त गावातील शालेय पूरक  आहार योजना चालतेय उधारीवर
जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळग्रस्त गावातील शालेय पोषण आहार योजना उधारीवर चालत असल्याचे जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील वास्तव समोर आले. शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शालेय पोषण आहार योजने अंतर्गत
द्यावयाच्या पूरक आहाराचे अनुदान दोन महिने लोटून ही उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे योजनेचा संपूर्ण खर्च मुख्याध्यापकांना करावा लागत आहे.

आठवडाभर 'बँका बंद'ने टेन्शन वाढणार


भारतीय बँक असोसिएशनच्या चार वेगवेगळ्या संघटनांनी विविध मागण्यांसाठी २६ व २७ सप्टेंबरला संपाचा इशारा दिला आहे. यात, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स, अशा चार संघटनांचा समावेश आहे.

त्याने 45 कप चहा नऊ मिनिटांत संपवला


माणसं कशाचीही पैज लावू शकतात.कोण ठराविक वेळेत लाडू खाणं. जिलेबी खाणं. असं बरेच काहीशेवटी पैज जिंकणं महत्त्वाचं असतं. म्हणतात ना, पैजेसाठी काय पण...! बघा ना, एका प्रवाशी वाहतूक करणार्या रिक्षावाल्याने चक्क पैजेखातर नऊ मिनिटात तब्बल 45 चहा कप प्याला. आणि पैज जिंकली. सध्या या पैजेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

Monday, September 16, 2019

आचारसंहितेमुळे तलाठी भरती रखडण्याची चिन्हे


जत,(प्रतिनिधी)-
 विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील तलाठी भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुणवत्ता यादी 7 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे, मात्र पुढची प्रक्रिया थांबली असल्याने नियुक्ती मिळणार की नाही, याची चिंता उमेदवारांना लागली आहे.

डॅशिंग उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज. डॅशिंग उदयनराजे म्हणून त्यांची सातार्याबरोबरच अख्ख्या महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांची आज चर्चा व्हायचे कारण म्हणजे त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्तेत असलेल्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून खासदार झाले होते. त्यांचा राजकीय प्रवासही नेहमीच चर्चेचाच राहिला आहेखासदार उदयनराजे भोसले 1991 साली पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिले. इथे ते एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभूत झाले. 1991 ते 1996 असे पाच वषर्ं ते नगरसेवक होते. 1996 मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली. त्यावेळी काँग्रेसचे प्रतापराव भोसले सातार्याचे खासदार होते.

लिव्ह इन रिलेशनशिपपेक्षा लग्न झालेल्या महिला अधिक सुखी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दावा
लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहणार्या महिलांपेक्षा लग्न झालेल्या महिला या खूपच अधिक प्रमाणात आनंदी असतात, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आला आहे. महिलांसंदर्भात अभ्यास करणार्या पुण्यातील संघाशी संलग्नदृष्टी स्त्री अध्यासन प्रबोधन केंद्राच्या एका सर्वेक्षणातून हे निष्कर्ष समोर आल्याचे सांगण्यात आले आहेमहिलांविषयीच्यास्टेट्स ऑफ विमेननामक या सर्वेक्षण अहवालाचे येत्या 24 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.

विधानसभा निवडणूक बहिष्काराला पाठिंबा -सांगलीकर

जत पूर्व भागातील ६४ गावांनी घेतलेल्या विधानसभा  निवडणूक बहिष्काराच्या निर्णयास आपला पाठिंबा असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सी. आर. सांगलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    जत पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न न सोडवला गेल्याने ६४ गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासनाने आश्वासन देऊनही ते पाळले नाही. त्यामुळे या गावांमधील लोकांमध्ये संतापाची भावना आहे. पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटावा,यासाठी  ह. भ. प. तुकारामबाबा महाराज यांच्या पुढाकाराने येत्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे ठरवले आहे तसेच  कोणीही  विधानसभेची निवडणूक लढवू नये,

Sunday, September 15, 2019

६४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी आरपारची लढाई: तुकाराम महाराज

उमदी,(गणेश बागडे यांजकडून)-
जत पूर्व भागातील वंचित ६४ गावातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष केल्याशिवाय पाणी येणार नाही. त्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. त्याकरीता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढाची गरज आहे. तरच आपणाला भविष्यामध्ये पाणी येणार आहे.ही लढाई आर या पारची करावी लागणार आहे. म्हैसाळ विस्तारीत.योजनेबाबत तत्वता मान्यता देण्याची घोषणा केली होती.जुलै महिन्यात पाणी खळखळणार असा शब्द दिला होता. ही योजनेची घोषणा फसवी आहे असा आरोप गोंधळेवाडी  (ता जत) चिकलगी (ता मंगळवेढा) येथील तपोवन भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराजांनी केला आहे .

योग्य जोडीदार मिळवून देणार फेसबुक

आता फेसबुकही तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार शोधण्यासाठी मदत करणार आहे. जगभरातील २0 देशांमध्ये फेसबुकने डेटिंग सेवा सुरू केली आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने फेसबुकच्या वार्षिक परिषदेमध्ये डेटिंग सेवा सुरू करण्याचा मानस बोलून दाखवल्यानंतर फेसबुकने अवघ्या दोन महिन्यांमध्ये ही सेवा सुरू केल्याची माहिती झकरबर्गनेच फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

Saturday, September 14, 2019

पाऊस थांबावा म्हणून चक्क बेडकांचा घटस्फोट!

माणसाला काहीच जास्त सोसत नाही. गेली दोन वर्षे देशात पाऊसमान कमी झाले. त्यामुळे देशात अनेक जीवन वस्तूंचे उत्पादन कमी झाले. महागाई वाढली. ,मात्र यंदा जरा चांगली परिस्थिती आहे. देशात बऱ्यापैकी पाऊस झाला ,पण अनेकांना पाऊस जास्तीचा वाटू लागला. त्यामुळे हा पाऊस थांबावा म्हणून लोकांनी बेडकांचा घटस्फोट घडवून आणला. ही घटना मध्य प्रदेशातील आहे.

मारुती सुझुकी कंपनीला ग्राहक मंचचा दणका

नवी कोरी कार बॅटरीच्या शॉर्ट सर्किटमुळे पेटली होती. विमा कंपनीकडून काही रक्कम मिळाली होती, मात्र याहीपेक्षा अधिक खर्च ग्राहकांचा झाला होता. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक मंचाकडे ही तक्रार दाखल केली  होती. त्यानुसार ग्राहकाला न्याय मिळवून दिला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील आहे.
कपिल नगर येथील सिद्धार्थ ढोके यांनी घेतलेली नवी मारुती डिझायर ही कार बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे जळाली. यासंदर्भात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच भंडारा यांनी नुकताच निकाल दिला. यात कार निर्माता कंपनी मारोती सुझुकीला दोषपूर्ण कार पुरविल्याबद्दल १ लाख ४७ हजार तसेच भंडारा येथील ऑटोमोटीव्ह डिलरला दोषपूर्ण सेवेसाठी ४0 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Friday, September 13, 2019

मंदीविरोधात लढण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका वर्तमानपत्रातील दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारवरच्या आर्थिक मंदीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर कडाडून टीका केली आहे. यावेळी त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर टीका केली. मरगळलेल्या अर्थव्यव्यस्थेला बळकटी देण्यासाठी मनमोहन यांनी मोदी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे. यावेळी मनमोहन यांनी मोदी सरकारवर टीकास्त्रही सोडले आहे. दिवसेंदिवस अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब होत आहे. पण भयानक गोष्ट ही आहे की सरकारला या गोष्टीची जाणीव नाही. सध्या आपण आर्थिक मंदीचा सामना करत आहोत. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत चिंताग्रस्त आहे हे मान्य करावे आणि त्यानुसार उपाय करावेत.

कर्जमाफीत नियमित कर्ज फेडणार्‍यांचाही विचार करा

जत,(प्रतिनिधी)-
विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत राज्यातील शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्य शासनाकडून होऊ शकते. अशा हालचाली राज्य शासनाच्या सुरू आहे, अशी माहिती माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. यामुळे नेहमीच कर्जमाफीच्या योजनेतून वंचित राहत असलेल्या व नियमितपणे बँकेच्या कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांचा विचार करून त्यांनासुद्धा कर्जमाफी योजनेत समाविष्ठ करण्यात यावे, अशी विनंती जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच केली.

पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुर्‍हाड


जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा संपत आला तरी जत तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी द्राक्षबागेवर कुर्हाड चालवली जात आहे. जत तालुक्यात अलिकडच्या काळात द्राक्षबागायत वाढत आहे. ठिबक सिंचनचा वापर करून शेतकरी पारंपारिक पिकांऐवजी द्राक्ष पीक घेऊ लागले आहेत. बोअर, विहीर अशा स्त्रोताच्या माध्यमातून शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळला आहे.

कृषी सहायकांना मिळणार ग्रामपंचायतीमध्ये कृषी कक्ष


जत,(प्रतिनिधी)-
राज्यातल्या कृषी सहायकांना गावपातळीवर बसण्या-उठण्यासाठी जागा नव्हती,पण आता त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये खास कृषी कक्ष उपलब्ध करून दिला जाणार आहे. राज्य शासनाने तसा आदेश दिला असून तब्बल साडे अकरा हजार कृषी सहायकांना याचा लाभ मिळणार आहे.

संजय सावंत यांचा सेनेत प्रवेश विधानसभेला शिवसेनेतून लढविणार

जत,( प्रतिनिधी)
दोन दिवसापुर्वी आपण मातोश्रीवर नेते उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असून जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली असल्याची माहिती माजी बनाळीचे माजी जि.प. सभापती संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माजी सभापती संजीवकुमार सावंत यांनी  शिवसेनेकडून विधानसभा लढविणार असून पक्षाकडे  उमेदवारीची मागितली आहे.

आशा,गतप्रवर्तक यांच्या मानधन वाढीचा निर्णय होणार

जत,(प्रतिनिधी)-
राज्यभर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे मोर्चे व जेलभरो व रास्ता रोको या पध्दतीने प्रचंड व तीव्र आंदोलन करीत आहेत. दि.४सप्टेंबर रोजी कृती समितीच्या नेत्यांची शिवसेनापक्षप्रमुख उब्दवजी ठाकरे व आरोग्यमंत्री एकनाथशिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुखांनी तातडीने मागण्या मुख्यमंत्र्यांना व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीचा निर्णय त्वरित घेण्याची विनंती केली.

जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरतीप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

जत,(प्रतिनिधी)-
     सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक संवर्ग भरती मध्ये शासन नियमाप्रमाणे बिंदू नामावली चा वापर न करता पदभरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. व त्याप्रमाणे दि.14 व 15 सप्टेंबर 2019 रोजी पदभरती परीक्षा आयोजित केली आहे.तथापि काष्ट्राईब कर्मचारी महासंघ, शाखा सांगलीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर  जनहित याचिकेमध्ये मागासवर्गीय 52 टक्के, मराठा आरक्षण 13 टक्के व शैक्षणिक व सामाजिक दृष्टीने मागास 10 टक्के प्रमाणे पदभरतीची जाहिरात दिली नसल्याने महासंघाने जनहित याचिका दाखल केली आहे.

Thursday, September 12, 2019

जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन केंद्र प्रमुखांची भरती करणार

जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील केंद्र प्रमुखांची पदे आता स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये १०० गुण बुद्धीमत्ता व अभियोग्यता आणि १०० गुण शालेय शिक्षणातील नियम,अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह अशा एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

Wednesday, September 11, 2019

जत तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. शिक्षकांना शिक्षा म्हणून जत तालुक्यात बदली दिली जाते आणि भोग मात्र विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतात, हे दाहक वास्तव आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत या विषयावर वर्षानुवर्षे चर्चा होतेय, फरक शून्य पडला आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा आणि प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षक यामुळे खेळखंडोबा मांडला गेला आहे. या परिस्थितीचा उद्रेक आता होऊ लागला आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जत तालुक्यातील प्रश्नांवर रान उठवले गेले. सदस्य विक्रम सावंत, सरदार पाटील, महादेव दुधाळ आदींनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यात शिक्षणाचा विषय ऐरणीवर आहे.
 जत,(प्रतिनिधी)
जाडर बबलाद( ता.जत) येथे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पती रावसाहेब ईरापा कांबळे यांने पत्नीसह एकास लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. यामध्ये पत्नी मैना रावसाहेब कांबळे( वय २६ रा. जाडर बबलाद) व अमशिद्धा अपण्णा काटे( वय ५४ रा. जाडरबोबलाद)   दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रावसाहेब ईरापा कांबळे याच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक

ग्रामसभेत ठराव आवश्यक; कर्मचाऱयांमध्ये खळबळ
जत,(प्रतिनिधी)-
जिल्हा परिषदामार्फत राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. कल्याणकारी शासन म्हणून या सेवा राज्यातील जनतेला विशेष:त ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते. याकरिता जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती केल्या जाणा-या वर्ग-३ च्या कर्मचा-यांना त्यांच्याकडून देण्यात येणा-या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी रहाणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक, आरोग्य सेवक तसेच शिक्षकांना त्यांच्या मुख्यालयी रहाणे आवश्यक आहे. असे असताना ब-याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालयी रहात असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. शिवाय घरभाडेही मिळवतात. त्यामुळे अशा कर्मचाऱयांना ग्रामसभेचा ठराव सादर करावा लागणार आहे. यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.

Tuesday, September 10, 2019

रोज एक गुळाचा खडा खा

  पूर्वी घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी देण्याची पद्धत होती. पूर्वी म्हणजे हे चहाचे प्रस्थ माजण्यापूर्वी. आता तर काय आल्यागेल्यालाच नव्हे तर घरातल्यालांनाही सकाळी उठल्याबरोबरच नाही, तर अगदी घडोघडी चहा लागतो. घरातही चहा लागतो आणि बाहेर पडल्यानंतरही चहा लागतो. कामावर असताना लागतो आणि फिरायला वा मित्रमंडळींकडे वा नातेवाईकांकडे गेल्यावरही लागतो.

Monday, September 9, 2019

जत तालुक्यातील पाण्याचे टँकर जबरदस्तीने बंद करण्याची कारवाई

पावसाळा संपत आला तरी पाण्याचे संकट कायम
जत,(प्रतिनिधी)-
पावसाळा संपत आला तरी जत तालुक्यातला पिण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कायम आहे. त्यातच सरकारी बाबू जबरदस्तीने पाण्याचा टँकर बंद करण्याची कारवाई करत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षभरापासून जत तालुक्यात पाण्याचे संकट उभे आहे.

Saturday, September 7, 2019

घरबसल्या अष्टविनायक दर्शन


अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आर्शय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले.मुद्गल पुराणात अष्टविनायकांचे वर्णन आढळते.

शाळांमध्ये संगणक साक्षरतेचे 'तीनतेरा

जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय अनुदानित, खासगी मान्यता प्राप्त विद्यालयात संगणक प्रयोग शाळा स्थापन करण्याचा शासकीय आदेश आहे. परंतु, अद्यापही जत तालुक्यातील ग्रामीण भागातील कित्येक शाळा संगणकापासून वंचित आहेत. तर काही संगणकावर धूळ बसली असून, विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञानचे दिले जात नसल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना संगणक हाताळावे, याकरिता विद्यालयात संगणक आहेत. ते संगणक बंद असून, विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित आहेत. संगणक आत शेवटच्या घटका मोजत असून धूळखात असल्याचे दिसून येत आहेत.

गुरुजींवर पुरुस्कारांची बरसात

विधानसभा निवडणुकीचया तोंडांवर शिक्षकांची मनधरणी
जत,(प्रतिनिधी)-
गणेशोत्सव झाल्यानंतर कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते, याची जाणीव ठेवत
अनेक राजकीय पक्षपुरस्कृत संघटनांनी यंदा शिक्षकदिनाचे औचित्य साधून  गुरुजनांवर पुरस्कारांची बरसात करायला   सुरू केली आहे. तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना मोठया प्रमाणात टार्गेट केले आहे. त्याच बरोबर  बड्या शिक्षण संस्थांनीच संस्थेतील अनेक शिक्षकांची पुरस्कारांसाठी शिफारस करून ठेवत विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पदरचा एक अन् एक कार्यकर्ता महत्त्वाचा असल्याचा संदेश दिला आहे.

Thursday, September 5, 2019

दप्तराच्या ओझ्याने लहान मुलांना पाठीचे आजार


जत,(प्रतिनिधी)-
लहान मुलांचे शालेय जीवन हे आनंददायी आणि उत्साहीत असले पाहिजे. मात्र तसे न होता आजकाल शाळांमध्ये मुलांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ओझे लादण्यात आले असल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यासह विविध प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या नजरेस पडत आहे. आधीच पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि त्यात दप्तराचे ओझे यामुळे मुलांना स्पर्धेत ढकलण्याच्या नादात त्यांच्या आरोग्याकडे पालकांचे दुर्लक्ष होत  असल्याचे चित्र आहे.

दळणाचे जाते झाले दिसेनासे


जत,(प्रतिनिधी)-
काळाच्या ओघात जात्यावर दळण दळण्याची परंपरा कालबाहय झाली आहे. आता पीठ गिरण्यांमुळे जाते दिसेनासे झाले आहे. आधी गहू, ज्वारी दळणासाठीच नव्हे तर डाळ दळण्यासाठीही जात्याचा वापर होत होता.
खेड्यापाड्यात कुटुंबासाठी उपयुक्त असलेले जाते व पाटे  वरवंटें  आजही घरातल्या अडगळीचा ठिकाणी ठेवलेले दिसून येतात. यांत्रिकीकरणाच्या युगात दळण दळण्यासाठी मशीन निर्माण झाल्या आहेत. याशिवाय मिक्सर ग्राईंडर घराघरात दिसून येतात. ज्यावेळी या मशीन नव्हत्या तेव्हा जात्याच्या माध्यमातून महिला पहाटे उठून दळण दळायच्या त्यापासून पोळी, भाकरी बनवायच्या. जात्याचे महत्व बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून प्रगटपणे जाणवते.

सोन्याळचे पोलिस पाटीलपद 39 वर्षांपासून रिक्त


जत,(प्रतिनिधी)-
सलग तीन वेळा सोन्याळ (ता.जत) येथील पोलिस पाटीलपद अनुसुचित जमातीसाठी आरक्षित पडल्याने आणि यासाठी उमेदवार मिळाला नसल्याने तब्बल 39 वर्षांपासून येथील पद रिक्त आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती सुशीला होनमोरे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून आरक्षण बदलाची मागणी केली,पण तरीही जिल्हा प्रशासन हलले नाही. त्यामुळे आता त्यांनी यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

राज्यात रेबीजने मृत्यू पावणार्‍यांची संख्या वाढतेय


राज्यात36 तर सांगली जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू
 जत,(प्रतिनिधी)-
रेबीजचा संसर्ग झालेले कुत्रे किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यामुळे रेबीजची लागण होऊन यावर्षी आतापर्यंत राज्यात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक 12 जणांचे मृत्यू हे रायगड जिल्ह्यात झाले असून त्याखालोखाल औरंगाबाद आणि पुण्याचा क्रमांक लागतो. या दोन्ही शहरांमध्ये अनुक्रमे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

‘हॉर्न’च्या कर्णकर्कश आवाजामुळे अपघात


जत,(प्रतिनिधी)-
कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषणाबरोबरच अपघातांच्या प्रमाणातही वाढ होत असून ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या मानसिक स्थितीवरही त्याचा परिणाम होत आहे. बेदरकार दुचाकी चालविणार्या स्टंटबाज युवकांमुळे त्यात आणखी भर पडत असल्याने हुल्लडबाज तरुणाईला आवर घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावरुन एकाग्रपणे वाहन चालविताना अचानक प्रेशर हॉर्न वाजण्यामुळे बिचकल्यासारखे होते. आपले काही चुकले नाही ना यासाठी पुढचा वाहनचालक दुचाकी वेगात असतानाही  मागेपुढे  पाहतो. या काळात लक्ष विचलित झाल्यामुळे  रस्त्यांच्या परिस्थितीकडे, दुचाकीच्या वेगाकडे दुर्लक्ष होते. तोल जाण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे अनेक अपघात होत असल्याचे चित्र आहे.

घरोघरी एलपीजी गॅस पोहचल्याने गोबरगॅसला सोडचिठ्ठी

जत,(प्रतिनिधी)-
एलपीजी गॅस आता ग्रामीण भागातही पोहचला आहे.शासनही यासाठी अनुदान देत आहे.साहजिकच काही शेतकऱ्यांनी गोबरगॅस यंत्रणा बंद करून टाकली आहे.त्यामुळे  आता त्याचे परसदारी फक्त सांगाडेच दिसत आहे. 
गावागावातआणि घराघरात असलेली चूल एलपीजी गॅसच्या आगमनामुळे हद्दपार झाली आहे. झटपट स्वयंपाक होत असल्याने त्यालाच पसंदी दिली जात आहे. त्यातच ग्रामीण भागात बदलती जीवनशैली आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे  पशुधन कमी झाले आहे. शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आल्याने बैलांच्या मशागतीऐवजी यांत्रिक शेती होऊ लागली आहे. तसेच एलपीजी गॅस आल्याने गायी, म्हैशींच्या शेणावर चालणारे बायोगॅस सयंत्र वापराबाबत तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही संयंत्रे काळाच्या ओघात कालबाह्य ठरू लागली आहेत. 

Wednesday, September 4, 2019

बीएसएनएल ८0 हजार कर्मचार्‍यांना देणार स्वेच्छानिवृत्ती

जत,(प्रतिनिधी)-
तोट्यात असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी टेलिकॉम कंपनीला खर्चाचा ताळमेळ घालणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. एकीकडे त्यांना जागा भाड्याने देऊन आपला खर्च भागवावा लागत आहे तर दुसरीकडे खर्चात कपात करण्यासाठी आपल्या सुमारे ८0 हजार कर्मचार्‍यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची वेळ आली आहे. यासाठी सरकारकडून मंजुरी मिळताच इच्छूक कर्मचार्‍यांना आकर्षक पॅकेज देऊन निवृत्त करण्यात येणार असल्याचे बीएसएनएलचे चेअरमन प्रवीणकुमार पूरवार यांनी सांगितले आहे.

युवकांच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणुक लढविणार: विक्रम ढोणे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका विस्ताराने मोठा व कायम दुष्काळी तालुका असुनही या तालुक्यातील प्रस्थापित नेते मंडळीच्या राजकीय इच्छाशक्तीअभावी तालुका विकासापासुन दूर आहे .या तालुक्यातील नेते मंडळीनी जिल्ह्यातील नेत्यांचे  मांडलिकत्व स्विकारले असल्याने   प्रस्थापित नेते या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात आपल्या तालुक्यासाठी संघर्ष करू शकत नाहीत .याचाच गैरफायदा जिल्ह्यातील  नेते मंडळीनी घेतल्याने  ऊस तोड कामगार पुरवणारा तालुका म्हणूनच आपल्या तालुक्याकडे पाहिले जाते .ही ओळख पुसण्यासाठी तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी  विधानसभा   लढावयाची  आहे ,असे प्रतिपादन युवक नेते विक्रम ढोणे यांनी केले.

धर्म आणि आध्यात्म यांचा अर्थ समजावुन घेणे महत्त्वाचे- किशोर पवार

जत,(प्रतिनिधी)-
आजचा मानव आध्यात्म आणी धर्मच्या नावाखाली वेगळा अर्थ काढुन आपले जिवन व्यर्थ घालवत आहे आहे पण खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करणे होय आणी आपण आपले मुळ स्वरुप कोणते आहे याची ओळख होणे म्हणजे आध्यात्म होय असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळाचे युवा प्रचारक किशोरजी पवार सांगली यांनी एस.आर.व्ही.एम.हायस्कुल जत येथे आयोजित सत्संग सोहळ्यामध्ये आध्यात्म आणी धर्म या विषयावर बोलताना केले.

Sunday, September 1, 2019

सप्टेंबर पासून बँकांचे काही नियम बदलले

एक सप्टेंबर 2019 पासून बँकेशी संबंधित काही नियम बदलले आहेत  बँकांकडून एका बाजुला घर खरेदीसाठी कर्ज स्वस्तात उपलब्ध करून दिले जात आहे तर दुसरीकडे बँकांची वेळ देखील बदलणार आहे. याशिवाय बँकेच्या आणखी काही नियमांमध्ये बदल झाले आहेत.
गृहकर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने स्वस्तात उपलब्ध करून दिले आहे. गृह कर्जाच्या व्याज दरात त्यांनी 0.२0 टक्क्यांची कपात केली आहे. हा नियम १ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

हॉटेलात राहिलेल्या जोडप्याला त्रास देण्याचा पोलिसांना अधिकार नाही'

जर एखाद जोडपे हॉटेलमध्ये राहत असेल तर त्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एखादे अविवाहित जोडपे हॉटेलमध्ये एका खोलीत राहणे हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. दरम्यान, कलम २१ नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जत नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जत,(प्रतिनिधी)-
नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून
शहरात आजाराचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रचंड वाढलेला कचरा, घाणीचे साम्राज्य, डासांचे वाढलेले प्रमाण आणि शहराला आळ्यामिश्रीत  पुरवठा होत  असलेले पाणी यामुळे शहराचेच आरोग्य बिघडले आहे.आहे. याबाबत पालिका प्रशासन कसलेही गांभीर्य घेण्यास तयार नसल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे.