Friday, December 28, 2018

(संपादकीय) गुप्तांग कापण्याचे महिलेचे धाडस


माणसं कायदा हातात घेण्याचा प्रकार अलिकडच्या काळात वाढला आहे. माणसांकडला सहिष्णुता प्रकार संपला आहे आणि कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते,त्या पोलिसांवरचा विश्वास उडाला आहे. राजकीय लोकांच्या दावणीला बांधले गेलेले हे खाकी वर्दीतले खाते खायच्याबाबतीतही आघाडीवर आहे. अशा या खात्यावर कुणाचा विश्वास बसणार? त्यामुळे महिलांची आणि अन्याय सहन करणार्या लोकांची सहनशीलता संपते तेव्हा अक्रित घडायला लागतं.खरे तर आपल्या देशाच्यादृष्टीकोनातून याचे समर्थन करता येत नाही. पण सगळेच उपाय थकतात,तेव्हा कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. मुंबईतल्या डोंबवली परिसरात घडलेली घटना त्यामुळेच धक्कादायक म्हणायला हवी. एका छेड काढणार्या इसमाच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून तिने त्याला धडा शिकवण्याचाच निर्णय घेतला. आणि आपल्या मित्रांच्या साथीने छेड काढणार्याचे गुप्तांगच कापून टाकले.

 एक तरुण सतत छेड काढतो, त्रास देतो इतकेच नाही तर वारंवार मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन करतो म्हणून एका संतप्त महिलेने या तरुणाचे आपल्या दोन मित्रांच्या मदतीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना परवा रात्री घडली आहे. अर्थात अशा प्रकारामुळे खळबळ उडाल्यास नवल नाही. हा तरुण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले आहे आणि डोंबवलीतल्याच एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे, असे नव्हे. पण यातून छेड काढणारे धडा घेताना दिसत नाहीत. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव तुषार पुजारे असे आहे. तर हल्ला करणारी महिला डोंबिवलीतील नांदीवली गावातील आहे.
तरुणाच्या त्रासाला कंटाळून या महिलेने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. यासाठी तिने याच परिसरातील एका मोकळ्या निर्जन स्थळी त्याला बोलावले व आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तरुणाचे गुप्तांग कापले.आता त्या महिलेच्या मित्रांना अटक करण्यात आली आहे.पण या घटनेतून धडा कोण घेणार? यातून कुणीच काही बोध घेतला नाही तर पुन्हा अशाच घटना घडत राहणार. पण मग अशा प्रश्नांची सोडवणूक होणार कशी?
आपल्याकडे राजकारण्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. त्यांची वाढत असलेली ताकद आताच्या तरुणांना आकर्षित करत आहे. त्यामुळे हे तरुण राजकारण्यांच्या आश्रयाला जात आहेत. राजकारणी लोकांपुढे भलेभले लोक माथा टेकतात,याची कल्पना आल्याने तरुण त्यांच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. आणि याचा फायदा घेऊन गुंडगिरी,दादागिरी करत तरुण फिरत असतात. ज्याचे गुप्तांग कापले त्याचे धाडस का वाढले,याची कल्पना नसली तरी त्याचे महिलेला छळायचे धाडस नक्कीच वाढले होते.त्यामुळेच महिलेला त्याला धडा शिकवावा लागला. पोलिसांना राजकारणापासून मुक्त केल्यास बराच फरक पडू शकतो.यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.




No comments:

Post a Comment