जत,(प्रतिनिधी)-
पावसाअभावी जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून यामुळे लोकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने तात्काळ बिळूर जिल्हा परिषद गटात तात्काळ पाण्याचे टँकर आणि चारा छावण्या सुरू कराव्या,अशी मागणी बसर्गीचे उपसरपंच किशोर बामणे यांनी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, जत हा कायम दुष्काळी तालुका असून, त्यापैकी काही गावात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. परंतु, तालुक्यातील बसर्गीसह बिळूर जिल्हा परिषद गटातील गुगवाड, वज्रवाड, एकुंडी, खिलारवाडी ,उमराणी ,सिंदूर इत्यादी गावे म्हैसाळ योजनेपासून वंचित असल्याने सर्व गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तसेच, जनावरांना चारा नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे, पिण्याच्या पाण्यासाठी 5 ते 6 किलोमीटर ची पायपीट करावी लागत आहे, दुष्काळामुळे भूजल पातळी कमी झाल्यामुळे विहीर, बोअरवेलमधील पाणी बंद झाले आहे. त्यामुळे दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरीवर्गाचे हाल सुरू आहे.
दोन-तीन महिन्यापासून टँकर मागणी करूनही आज पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यात आला नाही. टँकर मागणीचे प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडलेले आहेत व जत तालुका प्रशासन चालढकल करीत आहे. दुष्काळग्रस्त लोकांच्या भावनेशी न-खेळता यावर प्रशासनाने तातडीने उपाय योजना करणेच गरजेचे आहे, तसे न केल्यास सर्व गावातील ग्रामस्थांचा तहसीलदार व प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल,असा इशाराही दिला आहे. म्हैसाळ पाणी योजनेपासून वंचित असणाऱ्या या भागाला किमान पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची तरी व्यवस्था करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment