शनिवारी तरी दप्तराला सुट्टी द्या
जत,(प्रतिनिधी)-
एकीकडे क्लिष्ट असणारा अभ्यासक्रम, रोजच्या विविध तासिका आणि पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. हे ओझे चिमुकल्या खांद्यावर रोज वहावे लागत असल्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे हे ओझे कमी करण्यासाठी पुणे जि.प.च्या शिक्षण विभागाने नवीन उपक्रम सुरु केला असून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी तेथे दप्तराला सुट्टी मिळणार आहे. हाच उपक्रम पुण्याच्या धर्तीवर जत तालुक्यात अथवा सांगली जिल्ह्यात राबविल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
विविध विषय, त्यांच्या रोजच्या होणार्या तासिंकामुळे पाठीवर जड दप्तर घेऊन जाणारे विद्यार्थी रोज दिसायचे. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्या तब्येतीच्या तुलनेत दप्तराचे ओझे हे जास्त असायचे, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते. हे ओझे कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, दप्तराच्या ओझ्यात काही बदल झाला नव्हता. हे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेतर्फे ‘एक पुस्तक एक वही’ हा क्रांतिकारक निर्णय घेतला होता. मात्र, विद्यार्थ्यांना आणखी दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आणखी एक नवा उपक्रम राबवला. शनिवारी विद्यार्थ्यांची असलेली कमी पटसंख्या पाहता यात वाढ व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणापासून दिलासा मिळावा, या हेतूने यापुढे प्रत्येक शनिवारी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर दिसणार नाही.
शिक्षण विभागाकडून शनिवार हा दप्तरविना या उपक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. मुलांना बौद्धिक विकासाबरोबरच इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार आहे. या मागे दप्तराचे ओझे कमी करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा मुख्य उद्देश आहे. शनिवारी शाळा लवकर असल्याने अनेकांकडून शाळा बुडवली जाते. सर्व विद्यार्थी नियमित येण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरु केलेल्या शनिवार हा आता दप्तराविना या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणा वाव मिळण्याबरोबरच त्यांच्या उपस्थितीतही वाढ होणार आहे. पुण्याच्या धर्तीवर या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा जत सह सांगली जिल्ह्यातही अवलंब होणे गरजेचे आहे.
शाळेची गोडी वाढणार...
शनिवारी विनादप्तर आलेल्या विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार, योगातसेच इतर खेळांचे प्रकार घेतले जातात. प्रत्येक शाळांना अध्ययन समृद्धीची किट देण्यात आली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातो. भाषा आणि गणित विषयांमध्ये विद्यार्थी मागे राहतात. काही शाळांना अध्ययन समृद्धी कीट देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून शनिवारी अध्ययन समृद्धी किटच्या सहाय्याने अभ्यास घेतला जातो. यामध्ये अंकगणित, अंकवाचन आदी उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एक दिवस दप्तराविना या उपक्रमामुळे रोजच्या अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थी नव्या गोष्टी शिकतील. यामुळे त्यांच्यामध्ये शाळेची गोडी वाढून व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळणार आहे.
No comments:
Post a Comment