Monday, December 31, 2018

जतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू


हजारो भाविकांनी फेडला नवस;लाखभर भाविकांनी घेतले दर्शन
 जत,(प्रतिनिधी)-
 महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेच्या मुख्य दिवसातील आजचा हा पहिला प्रमुख दिवस.हजारोंच्या संख्येने भाविकांनी गंध लेवून देवीची ओटी भरली व आपला नवस फेडला. आज दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले.

नवसाला पावणारी देवी म्हणून श्री यल्लमाची सर्वदूर प्रसिद्धी आहे. आपले कार्य विनासायास सफल व्हावे म्हणून भाविक देवीला नवस बोलतात. आपली कार्यसिद्धी झाल्यास या दिवशी भाविक देवीच्या दारात येऊन नवस फेडतो.येथील कुंडात स्नान करून भक्तीभावाने देवीची ओटी भरली जाते. यात्रा स्थळावर भाविकांसाठी पिण्यासाठी व स्नानासाठी कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
यात्रा स्थळावर भाविकांची मोठी गर्दी होत असून भाविक लाखोच्या संख्येने दाखल होत आहेत.जत तालुक्यासह मुंबई,पुणे, बेंगळूर, बेळगाव, धारवाड,इंडी,बिदर,सोलापूर आदी परिसरातील भाविक मुक्कामाला येत असतात. तीन दिवस मुक्काम करत दुसर्यादिवशी देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर तिसर्यादवशी  किच पडल्यानंतर भाविका यात्रा स्थळ सोडतात. जवळपास चार लाखाहून अधिक भाविक यात्रेला हजेरी लावत असतात. यात्रा स्थळावर मेवा-मिठाईच्या दुकानांसह सौंदर्य प्रसाधने, संसारोपयोगी वस्तू,गरम लोकरीचे कपडे,खेळणी, हॉटेल्स,चायनीज पदार्थ,रसवंतीगृहे आदींची दुकाने,स्टॉल्स थाटली गेली आहेत. करमणुकीच्या साधनांमध्ये पाळणे,डिज्नेलँड,मौत का कुआ,जादूगार,तमाशे दाखल झाले आहेत.
यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री यल्लमा प्रतिष्ठान आणि स्थानिक प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या मागर्शनाखाली यात्रेची चोख व्यवस्था बजावली जात आहे.पापा सनदी, मोहन मानेपाटील, श्रीकृष्ण पाटीलगणपत कोडग, कुमार इंगळे,अरुण शिंदे, श्री. गायकवाड, राहूल जाधव, संग्राम शिर्के, अनिल शिंदे, चंद्रकांत कोळी, सुमित कोडग,मेजर सुनिल चव्हाण, विक्रम डफळे इत्यादी मंडळी यात्रेचे व्यवस्थापन पाहात आहेत.
नेहमीप्रमाणे सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार सचिन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, संखच्या अप्पर प्रांताधिकारी अर्चना पाटील, बाजार समितीचे संचालक रामगोंडा संती, माजी संचालक रमेश बिराजदार, सुभाष गोब्बी, सोमनिंग चौधरी, तालुका कृषी अधिकारी संभाजी चव्हाण, श्री. हुल्याळकर आदी उपस्थित होते.







No comments:

Post a Comment