Saturday, November 25, 2023

सांगली जिल्ह्यातील १७ तलाव कोरडे ; उर्वरित तलावांमध्ये 30 टक्केच पाणीसाठा शिल्लक

,(प्रतिनिधी):

सांगली जिल्ह्यात विशेषतः जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र होत असून तलाव, विहिरी, कुपनलिकांचे पाणी झपाट्याने कमी होत आहे. आगामी काळात शेतीचा प्रश्न मोठा गंभीर होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी  टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणीदेखील वाढू लागली आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर, आटपाडी तालुक्‍यांत प्रत्येकी १, जत १० आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यात १९ पैकी ४ तलाव कोरडे पडले आहेत. येथील विहिरी, कूपनलिकांनी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठला आहे. जिल्ह्यातील ८३ प्रकल्प तलावांमध्ये 

१५ नोव्हेंबर २०२२ रोजी ६ हजार ८२५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाणीसाठ्याची टक्केवारी ८८ होती. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यात २ हजार ३५४ दशलक्ष घनफूट म्हणजे ३० टक्के पाणीसाठा आहे. या आकडेवारीवरून पाणीटंचाईची तीव्रता लक्षात येत आहे. 

 जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने मध्यम व लघू प्रकल्प कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये केवळ ३० टक्के पाणीसाठा असल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. . मोरना (ता. शिराळा), सिद्धवाडी (ता. तासगाव), बसाप्पावाडी (ता. कवठेमहांकाळ), संख, दोडनाला (ता. जत) हे पाच मध्यम प्रकल्प असून, तिथे १ हजार ७६० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या केवळ ४९७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून, २८ टक्केच पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात78 लघुप्रकल्प असून सहा हजार 15 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणी साठ्याची क्षमता आहे. या ठिकाणी 1 हजार 857 दशलक्ष घनफुट असून त्याची टक्केवारी 31 टक्के आहे. मध्यम आणि लघू असे ८३ 

प्रकल्प जिल्ह्यात आहेत. यापैकी कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील प्रत्येकी एक तलाव, आटपाडी चार, जत दोन तलावांमध्ये सध्या ५५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. १७ तलाव कोरडे ठणठणीत असून, १४ तलावांमध्ये मृतपाणीसाठा आहे.