Saturday, December 29, 2018

नवीन वर्षाचे स्वागत आता ई-कार्ड शुभेच्छापत्राने


ग्रिटिंग कार्ड हद्दपार
जत,(प्रतिनिधी)-
सोशल मीडियाद्वारे नूतन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, विनामूल्य झाल्याने अनेकांनी ग्रिटिंग कार्डस्ना महत्त्व न देता व्हॉट्सअप, एसएमएस, ट्विटर, इन्स्टाग्रॉम, फेसबुक, मेसेंजर यांना पसंती दर्शविली आहे. सोशल मीडियाद्वारे देण्यात येणार्या शुभेच्छा पत्रांना ई-कार्ड शुभेच्छा म्हणूनही ओळखले जाते. अशा पत्रांनी सातत्याने उभे केलेले आव्हान स्वीकारण्यात अपयशी ठरलेला प्रिटेंड कार्ड बाजार मागे पडला आहे. या प्रिंटेड कार्डचा बाजार आता केवळ लग्नपत्रिकांमुळे थोड्याफार प्रमाणात टिकला आहे. एकूणच या व्यवसायाची सद्दी संपत आहे.

-कार्ड शुभेच्छापत्रांना तरुणाईची पसंती
सध्या सोशल मीडियाच्या जगात आता हे ग्रिटिंग कार्ड हद्दपार झाले असून एकेकाळी 90 टक्के असणारी ग्रिटिंग कार्डची मागणी आता दोन ते तीन टक्क्यांवर आली आहे. ग्रिटिंग कार्डची विक्री करणार्या व्यावसायिकांना आता इतर गिफ्टस् अॅटम ठेवून अन्य पर्यायाचा विचार करावा लागत आहे. सोशल मीडियाचा विस्तार होण्याआधीही व मोबाइल जगतात ऐतिहासिक क्रांती झाल्यानंतर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक स्वस्त असलेल्या एसएमएसला प्राधान्य देत. आता एसएमएसही मागे पडले असून व्हॉटस्अप, फेसबुक आदी सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आहे. एकेकाळी आपले वर्चस्व टिकवून ठेवणार्या ग्रिटिंग कार्डना घरघर लागली आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी नवीन वर्षाच्या स्वागतावेळी आकर्षक रंगसंगतीतील, लहान मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असलेले ग्रिटिंग कार्ड एकमेकांना देऊन याचे सेलिब्रेशन व्हायचे. आपल्या जीवलगांनी, आप्तस्वकियांनी पोस्टाद्वारे, कुरियरद्वारे किंवा इतरांनी भेटून दिलेले ग्रिटिंग वर्षांनुवर्षे सांभाळून ठेवली जात. याचबरोबर आपल्या हाताने तयार केलेले ग्रिटिंग कार्ड देण्याचा आनंद वेगळाच असायचा. ग्रिटिंगमध्ये सुविचार लिहिण्यासाठी पुस्तके चाळावी लागत होती. परिणामी आपोआपच वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळत होती. असे ग्रिटिंग कार्ड तयार करायला थोडी मेहनत करावी लागत होती, मात्र यात एक प्रकारची मजाच होती.
व्हॉटस्अॅप स्टिकर
व्हॉटस्अॅप वापरणार्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. व्हॉटस्अपद्वारे शुभेच्छा देण्याची प्रथा रूढ झाली आहे. यात आता नवीन प्रकार सुरू झाला आहेेे. गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या दिवाळीच्या मोसमात व्हॉटस्अॅप स्टिकर हा नावीन्यपूर्ण प्रकार सोशल मीडियामध्ये आला आहे. या स्टिकरच्या माध्यमातूनही नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. व्हॉटस्अॅपचे यूजरही या स्टिकरला मोठ्या प्रमाणात लाइक करीत आहेत.

No comments:

Post a Comment