Wednesday, December 26, 2018

संख पाणी योजनेची चौकशी करण्यासाठी सांगलीत उपोषण


सांगली,(प्रतिनिधी)-
 संख (ता. जत) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत 6 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण असून या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही लोकांना पाणी नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याचा निषेध करीत जत तालुका शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

 याबाबत सीईओ अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काम न करता खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. या कामाचे टेंडर न करता रोजगार हमीवर काम करणार्या एका मजुराला इतके मोठे काम दिले आहे. याबाबत त्रयस्थ यंत्रणेचे तपासणी अहवालही आले आहेत. मात्र तरीही कारवाई केली जात नाही.वारंवार मागणी करूनही कारवाईत टाळाटाळ केली जात आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी, कंत्राटदार व इतर संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
 निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, तालुकाध्यक्ष रमेश माळी, नागनाथअण्णा शिळीन, राजू पुजारी, चंद्रशेखर रेबगोंड, भीमाशंकर बिरादार, विठ्ठल कुंभार, शरण्णाप्पा शिळीन, विश्वनाथ बिरादार, रमेश न्हावी यांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment