प्राचार्य अभयकुमार साळुंखे
जत,(प्रतिनिधी) -
विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नवनवीन शोध लागत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ज्ञानसंपन्न माणसे आहेत. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण जगाला झाला पाहिजे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा परिषदांचे आयोजन होऊन ज्ञानाचे आदान-प्रदान झाले पाहिजे,असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
श्री. साळुंखे जत येथील राजे रामराव महाविद्यालयात घेण्यात आलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कतार युनिव्हर्सिटी कतारचे प्रोफेसर अबूबक्र अब्दुल्ला होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालय राबवत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय परिषदेमागील उद्देश सांगितला.
जे विज्ञान आपणास कळले त्याचा जीवनात उपयोग करायला शिकणे म्हणजेच खरे विज्ञान संपादन करणे होय,असे सांगून प्राचार्य साळुंखे पुढे म्हणाले की, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक डॉ.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. तर राजे रामराव महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अशा जन्मशताब्दी व सुवर्णमहोत्सवी वर्षात राजे रामराव महाविद्यालयात पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन होत आहे,ही अभिमानाची गोष्ट आहे. विज्ञानाने माणसातील जिज्ञासा जागृत केली असून ही जिज्ञासा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची जिज्ञासा पूर्णत्वाला नेली पाहिजे पण त्याचबरोबर विज्ञानाला सुसंस्काराची जोड दिली पाहिजे. सुसंस्कार हे आध्यात्मामुळे वाढीस लागतात म्हणून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञान आणि विज्ञानाला सुसंस्काराची जोड दिली आहे. विज्ञान आणि आध्यात्म एकत्र आले तर मानवी जीवन सुजलाम- सुफलाम होईल.
यावेळी बोलताना कतार युनिव्हर्सिटी कतारचे प्रोफेसर अबूबक्र अब्दुल्ला म्हणाले कि, भौतिकशाश्त्रामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. नवनवीन संशोधन होत आहे. या संशोधनाचा मानवी कल्याणासाठी उपयोग झाला पाहिजे. अडव्हान्सेस इन मटेरियल सायन्सेस मध्ये बदल होत आहे. त्यामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये 'अडव्हान्सेस इन मटेरियल सायन्सेस' या विषयामध्ये तज्ञ प्राध्यापक आपापले शोधनिबंध सादर करणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कतार युनिव्हर्सिटी,कतार, आफ्रिकेतील हायर इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ममाऊ, झाम्बिया युनिव्हर्सिटी, झाम्बिया नेपाळ येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी, डॉग्युक युनिव्हर्सिटी,साऊथ कोरिया युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ टोरियो, इटली त्याबरोबरच पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद व अमरावती विद्यापीठ येथील तज्ञ संशोधक उपस्थित राहणार आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियोजन प्राचार्य डॉ.व्ही.एस. ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ . ए.के .भोसले, डॉ. संजय लट्ठे व प्रा. राजाराम सुतार यांनी केले .
No comments:
Post a Comment