Friday, December 28, 2018

जत पालिकेत 17 कोटीचा निधी पडून


जत,(प्रतिनिधी)-
पालिकेत अधिकारी, सत्ताधार्यांमध्ये उदासीनता असल्याने सतरा कोटींचा निधी पडूनही शहराचा विकास होत नाही, यासारखे दुर्दैव नाही. या ठिकाणी भ्रष्टाचाराशिवाय काही चालत नाही, असा आरोप आमदार विलासराव जगताप यांनी जत येथे जाहीर सभेत बोलताना केला.

जत नगरपालिकेच्या कारभाराचा पोलखोल करण्यासाठी भाजपच्यावतीने जत येथील मंगळवार पेठेतील मारुती चौकात घेण्यात आली होती.यावेळी आमदार जगताप बोलत होते. ते म्हणाले की, जत तालुक्याच्या राजकारणात आर. आर. पाटील, पतंगराव कदम व राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील या तिन्हीं मंत्र्यांनी आम्हाला बाद करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळी जनतेला पाण्याचे स्वप्न दाखवून तिन्ही मंत्र्यांनी आपल्या स्वार्थासाठी जत तालुक्यातील एकमेव साखर कारखाना मोडीत काढून शेवटी जयंत पाटील यांच्या घशात कवडीमोल किमतीत घातला, असा थेट आरोप आमदार विलासराव जगताप यांनी जाहीर सभेत केला. नगरपालिकेच्या निवडणुकीत याच दोन्ही पक्षांच्या तालुक्यातील नेत्यांनी जतकरांना विकासाचे गाजर दाखवून एकमेकांचे कपडे फाडले व लोकांची दिशाभूल केली. आता दोघेही सत्तेत एकत्रित येऊन एक वर्ष झाले तरी देखील जत शहराचा काडीचा विकास झालेला नसल्याचे आमदार जगताप म्हणाले.
आमदार जगताप म्हणाले, तुबची, बबलेश्वर योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दहा कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. ते अद्याप मिळाले नाहीत. विक्रम सावंत यांनी पाणी परिषद घेऊन दोन्ही राज्यांच्या रथी-महारथींना बोलावून पाणी आणण्यासाठी चर्चा केली. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये करार होऊन, आपल्या शासनाने पाणी दिल्याशिवाय कर्नाटक शासन पूर्वभागाला पाणी देणार नाही. दरम्यान, याच पाण्यासाठी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आमदारकीचे बाशिंग बांधलेल्या मंडळींनी आम्हाला डावलून कर्नाटक व आपल्या राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. जतमध्ये यांना कोण पुसत नाही. हे मंत्र्यांच्या भेटी घेत सुटल्याची टीका, डॉ. रवींद्र आरळी व सभापती तम्मनगौडा रवी-पाटील यांचे नाव न घेता केली. सभेला अॅड. प्रभाकर जाधव, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, नगरसेवक प्रकाश माने, प्रमोद हिरवे, नगरसेविका दीप्ती सावंत, प्रा. जयश्री मोटे, श्रीदेवी सगरे, विजय ताड, उमेश सावंत, अजित पाटील, अण्णा बिसे, संतोष मोटे आदीसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment