Thursday, January 31, 2019

दुष्काळी सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठिय्या आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
शासनाने दुष्काळाच्या सोयी व सवलती जाहीर केल्या आहेत .परंतु त्याची अमंलबजावणी अद्याप सुरू करण्यात आली नाही .बंद असलेली अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात यावी या मागणीसह इतर विविध मागण्यासाठी  जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जत तहसीलदार कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात  आले . 
    याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे. परंतु विद्यार्थ्याकडून शिक्षण संस्थेत सक्तीने फी भरून घेतली जात आहे . भरून घेतलेली फी विद्यार्थ्यांच्या खात्यावर त्वरित परत वर्ग करण्यात यावी. पाणीटंचाई जाणवत असलेल्या  गावातील नागरिकांनी टँकरची मागणी  केल्यानंतर प्रशासनाकडून  टँकर मंजूर करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

दुष्काळामुळे दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत

जत,(प्रतिनिधी)-
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा दुग्ध व्यवसायाला बसत आहेत. पाण्याविना जनावरांच्या चार्‍याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असल्याने सर्वच प्रकारच्या चार्‍यांचे भाव कडाडले आहेत. कडब्याच्या एका पेंढीचा दर तब्बल 15 ते 22 रूपयांवर गेला आहे. कडवळ, मकवान, उसाचे वाडे आदींच्या एका पेंढीचा दर 4 ते 5 रूपये झाला आहे. चार्‍यांचे भाव वाढले असतानाच दुधाचे दर मात्र किरकोळच आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय प्रचंड आर्थिक अडचणीत असून आगामीकाळात तर या व्यवसायाचा प्रवास आणखीनच खडतर होणार आहे, हे निश्‍चित.

बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील पांडोझरी गावाखालील  बाबरवस्ती  येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्यावतीने आदर्श शाळा  पुरस्काराने गौरव  करण्यात आला आहे.

जंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत

(जंगम समाजाच्या बैठकीप्रसंगी मरूळशंकर स्वामी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.)

जत तालुका जंगम विकास संस्थेची मागणी 
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा जंगम समाज विकास संस्थेची बैठक नुकतीच जत येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आर.के. स्वामी होते. या बैठकीत जंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत असा सूर निघाला.

Wednesday, January 30, 2019

जतमध्ये बेशिस्त चालकांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा


जत,(प्रतिनिधी)-
जत शहराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत आहे. मात्र त्याचबरोबर अनेक समस्यांनीही शहराला ग्रासले आहे. पोलिस प्रशासनची बघ्याची भूमिका संशयास्पद आहे. वास्तविक हा प्रश्न मार्गी लावून रहदारी सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. मात्र वाहतुकीचा प्रश्न जैसे थे आहे. शिवाय पोलिसांच्या उदासिनतेमुळे शहराला बेशिस्त वाहनचालकांचे ग्रहण लागले आहे. त्यातून शहरातील वाहतुकीचा खोळंबा कायम आहे.

खुलेआम दारूचे धंदे सुरू, पोलिसांचे दुर्लक्ष


जत तालुक्याचा पूर्वभाग: कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्वभागात खुलेआम गावठी (हातभट्टीच्या) दारूचे धंदे सुरू असून अवैध धंद्यामुळे तरुण पिढी वाया चालली आहे..या अवैध धंद्यांना लवकरात लवकर आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जत तालुक्यात सर्वच भागात अवैध दारू धंद्याची बरकत झाली असून पूर्वभागात तर प्रत्येक गावात गावठी दारूचे अड्डे फोफावले आहेत. या परिसरात हा धंदा राजरोस व निर्भयपणे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. याला राजकीय पाठबळ मिळत असल्याने या अवैध धंद्यांना रोखणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गुटख्याची राजरोस तस्करी

जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाने राज्यामध्ये गुटखाबंदी करून काही वर्षांचा  कालावधी झाला असला, तरी याचाच फायदा करून घेत काही गुटखा तस्करांनी आपले नेटवर्क तयार केले आहे. होलसेलपासून रिटेलपर्यंत थेट जाग्यावर गुटखा पोहोच देण्याची स्वतंत्र व्यवस्था केल्याने राज्य शासनाच्या गुटखाबंदीचा फज्जाच उडाला आहे.

डफळापूर मुलींच्या शाळेची क्षेत्रभेट

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जि.प. मुलींच्या शाळेमध्ये शिक्षण पूरक उपक्रम या सदराखाली क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले  होते. डफळापूर गावाच्या पश्चिमेला असणारे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या  कॅनॉलमधून पाण्याचा पाठ मागील दहा दिवसापासून वाहत आहे. सध्या जत तालुक्यात मोठा दुष्काळ आहे. आजूबाजूला पाणी नसल्याने लोकांचे हाल सुरू आहेत. शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे,अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी डफळापूर परिसरात आल्याने आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना कॅनॉल व त्यातील वाहात असलेला पाण्याचा  पाठ ही  काय संकल्पना असते हे समजावून देण्यासाठी येथील शाळेचे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांच्या संकल्पनेतून क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

एसटीच्या मेगाभरतीतून दुष्काळी युवकांवर अन्याय: विक्रम ढोणे

जत,(प्रतिनिधी)-
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने  चालक व वाहक व इतर तांत्रिक या पदासाठी मेगा नोकरभरतीचे आयोजन महामंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ही जाहिरात जानेवारी २०१९ च्या काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. मात्र यामध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत जत येथील विक्रम ढोणे यांनी लेखी तक्रार एका  निवेदनाद्वारे  मुख्यमंत्री, परिवहनमंत्री दिवाकर रावते व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे.

Tuesday, January 29, 2019

म्हैसाळ योजनेचे पाणी बिळूर शिवारात दाखल

जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज (दि.27) सकाळी बिळूरच्या शिवारात दाखल झाले.गेल्या दोन दिवसांपासून बिळूर आणि परिसरातील लोक पाण्याची प्रतीक्षा करत होते. पाणी आल्यावर लोकांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला.

७० गावे,४६६ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा

सर्वाधिक जत तालुक्यातील 32 गावांना टँकर
जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाराटंचाई भीषण असली तरी, छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती, सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.

Monday, January 28, 2019

जत तालुक्यात मनरेगाची कामे बंद पाडायला भाजपचे नेते कारणीभूत

जत,( प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भष्टाचार करून ही योजना बंद पाडण्याचे पाप भाजपच्या बगलबच्चांनी केले आहे, अशी  टीका काँग्रेस नेत्यांनी पत्रकार बैठकीत केली.

भावी शिक्षक पिढी भरतीअभावी अस्वस्थ

जत,(प्रतिनिधी)-
शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण होत नाही,तोपर्यंत त्यांना खात्री वाटत नाही.त्यामुळे डी. एड.,बी. एड. धारक अस्वस्थ झाले आहेत. या मंडळींना नोकर भरती आचार संहितेत अडकणार का,अशी भीती वाटू लागली आहे.

Saturday, January 26, 2019

जि.प.शाळेत शिकलेली भावंडे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण



जत,(प्रतिनिधी)-
    आज पालकांच्या डोक्यात इंग्रजी माध्यामाचेच खूळ बसले आहे. पैसे कितीही जाऊ द्या,पण आपल्या मुलाने इंग्रजी शाळेतच शिकले पाहिजे,असा अट्टाहास करताना पालक दिसतात. मात्र जिल्हा परिषदेच्य आणि तेही ग्रामीण भागात शिकलेल्या मुलांनी आपल्या कष्टाच्या,जिददी च्या जोरावर अत्यंत अवघड समजली जाणारी सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन एक वेगळीच वाट आजच्या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना घालून दिली आहे. जत तालुक्यातील वाळेखिंडी या गावची नेहा आणि निरंजन या भावंडांनी सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

म्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार

एकुंडी ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
जत,(प्रतिनिधी)-
कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील एकुंडी गावाकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून  येत्या लोकसभा निवडणूकी आधी एकुंडीला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे अन्यथा म्हैसाळ योजनेचे पाणी येऊपर्यंत सर्व निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा एकुंडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघवीत यश

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा परिषदे अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आसंगी(जत) येथील जिल्हा परिषद  प्राथमिक मराठी शाळेने यश मिळवले आहे. दादासो अंकुश गायकवाड या विद्यार्थ्याने लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक, ५०मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक व १०० मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक असे तिहेरी यश मिळवून शाळेचे नाव लौकिक केले आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे.

बसर्गीत माणुसकी फौंडेशनतर्फे मुलांना खाऊ वाटप

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील बसर्गी येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माणुसकी फाउंडेशनच्यावतीने गावातील कन्नड-मराठी माध्यमांचे विद्यार्थी आणि उपस्थित ग्रामस्थांना खाऊचे वाटप करण्यात आले.

मिरजेच्या शिवलीया कला, क्रिडा संकुल पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

जत,(प्रतिनिधी)-
कोल्हापूर येथे झालेल्या  आठव्या राज्यस्तरीय 'पेंचक सिलाट'  या इंडोनेशियन मार्शल आर्ट्स स्पर्धेत  मिरजेच्या सुभाषनगर येथील शिवलीया कला, क्रीडा, संकुलच्या खेळाडूंनी एक सुवर्ण, एक रौप्य व तीन कास्य पदके  मिळवून 28 ते 30 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.

के.एम.हायस्कूलमध्ये व्याख्यानमाला, स्नेहसंमेलन उत्साहात


जत,(प्रतिनिधी)-
जत येथील के.एम.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज त्याचबरोबर शारदा विद्यामंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बसव व्याख्यानमाला मोठ्या उत्साहात पार पडली. सलग तीन दिवस चाललेल्या व्याख्यान, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांच्या मेजवानीचा विद्यार्थी, पालक आणि प्रेक्षक आदींनी मनमुराद आस्वाद घेतला.

Friday, January 25, 2019

आमदार जगताप यांची पक्षातून हक्कालपट्टी करा:तम्मनगौडा रवीपाटील

सांगली,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील भाजप नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषद शिक्षण सभापती तम्मनगौडा रवीपाटील या दोघांमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. जिल्हा परिषद सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी आमदार विलासराव जगताप निष्क्रिय असल्याचा आरोप केला आहे. शिवाय पक्षातून जगतापांची हक्कालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

Thursday, January 24, 2019

मुली नकोशाच...


राष्ट्रीय आरोग्य अहवालातील धक्कादायक माहिती
आज देशातल्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असताना आणि विशेष म्हणजे आपल्या देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री ही सर्वोच्च पदे महिलांनी भूषवली असतानाही देशातल्या आई-बापांना मुलगी नकोशीच आहे.राष्ट्रीय आरोग्य अहवालात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. स्त्री भ्रूणहत्या काही थांबलेली नाही. तिचा आलेख वाढतच चालला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातले आई-वडील मुलगी जन्माला घालायला नकार देत आहेत.

सदाशिव पाटील यांच्या 'सुलभ हिंदी व्याकरण' पुस्तकाचे प्रकाशन


 
(सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.संजीवकुमार भूशेट्टीवाय देवेंद्रप्पाएम.एस.हिरेमठशंभू ममदापूर यांच्या उपस्थितीत झाले.)
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील जिरग्याळ येथील शिक्षक सदाशिव पाटील यांच्या सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन अथणी (जि. बेळगाव) येथील श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयात एका कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी शंभू ममदापूर होते.
अथणी येथील के.एल.. या संस्थेच्या श्रीमती सी.बी.रनमोडे विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सुलभ हिंदी व्याकरण या पुस्तकाचे प्रकाशन कर्नाटक विज्ञान परिषद (धारवाड)चे अध्यक्ष डॉ. संजीवकुमार भूशेट्टी, वाय.देवेंद्रप्पा, प्राचार्य एम.एस.हिरेमठ यांच्याहस्ते झाले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

मनावरचा ताण स्वर गायनाने निघून जातो-प्राचार्य ढेकळे

जत,(प्रतिनिधी)-
मनावरचा ताण सारे गम पध नि सा या सप्तस्वराने निघून जातो. सांस्कृतिक समृद्धी आली की मनाची समृद्धी येते. मन विकासाच्या दिशेने जाण्यासाठी सांस्कृतिक समृद्धी महत्वाची आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले.

आरोग्याच्या प्रश्नावर आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदानावर एल्गार!

जत,(प्रतिनिधी)-
 जनतेच्या व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे पण प्रलंबित प्रश्न महाराष्ट्र राज्य सरकारने सोडवावेत, या बद्दल शासनाकडे आग्रह धरण्यासाठी आशा गटप्रवर्तक, सरकारी आरोग्य कर्मचारी, मेडिकल ऑफिसर्स, नर्सेस संघटना व जन आरोग्य अभियान यांनी एकत्र येऊन “आरोग्य सेवा संरक्षण आणि हक्कासाठी आघाडी” स्थापन केली असून या आघाडीतर्फे दि. २३ जानेवारी २०१९ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे विशाल धरणे आंदोलन करण्यात आले.

Wednesday, January 23, 2019

आसंगी तुर्कचा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मोठ्या गटातील मुलींच्या कबड्डी संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

शिक्षकांसाठी तीन दिवसांची स्तराधारीत अध्ययन कार्यशाळा संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
सहावी ते आठवी इयत्तेत पायाभूत परीक्षेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी 60 दिवसांचा स्तराधारीत अध्ययन कार्यक्रम (एलबीएल) राबवण्यात येत असून याबाबतची मुख्याध्यापक, शिक्षकांसाठीची तीन दिवसांची कार्यशाळा नुकतीच जत येथील सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये पार पडली. या कार्यशाळेनंतर शाळा पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 60 दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार आहे.

शिक्षकांच्या व्यथा गोव्याच्या अधिवेशनात मांडणार : शि. द. पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 गोवा येथे होणार्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक अधिवेशनात शिक्षकांच्या 2005 नंतरच्या व्यथा केंंद्र शासनाकडे मांडणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांचे अनेक ज्वलंत प्रश्न हे शिक्षक संघाच्या व्यासपीठावरच सुटले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा मान मला मिळाला असून इथून पुढेही मी जिवंत असेपर्यंत शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहणार असल्याचे मत माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शनिवारी बैठक

 जत,(प्रतिनिधी)-
म्हैसाळ योजनेच्या कामाला गती देऊन, म्हैसाळ योजने अंतर्गत बंदिस्त व नैसर्गिकरित्या (सायपन) पध्दतीने जत पूर्वभागातील दोड्डानाला व संख मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील 16 लघुपाटबंधारे तलाव व आसपासचे पाझर तलाव भरून देण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित तालुका पाणी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केल्याची माहिती तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी पत्रकारांच्या बैठकीत दिली.

खिलार खोंडाने धन्याला मिळवून दिले 3 लाख

आटपाडी,(प्रतिनिधी)-
माण, सांगोला, आटपाडी हे तालुके माणदेश म्हणून ओळखले जाते या माणदेशात खिलार जनावरे शेळ्या मेंढपाळ हाच खरा कायमस्वरूपी पाण्याची सोय नसल्याने व्यावसाय होता या     खिलार जनावरांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘माणदेशी आटपाडीतल्या’ 22 महिन्याच्या खोंडाने आपल्या धन्याला 3 लाख 41 हजार रुपये किंमत मिळवून देवून कृतकृत्य केले आहे.

आता पुन्हा शिक्षकांचे पगार ऑनलाइन

जत,( प्रतिनिधी)-
राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन शालार्थ प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये जानेवारी 2018 पासून तांत्रिक दोष निर्माण झाल्याने मार्च 2019 पर्यंत ऑफलाइन करण्यात येणार आहे. मात्र, एप्रिल महिन्यापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार ऑनलाइनच करण्यात येणार आहेत. त्यासाठी शालार्थ प्रणालीचे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) या कंपनीकडे  दिली आहे.

सांगली जिल्ह्यात 92 बालके अतितीव्र कुपोषित;832 उंबरठ्यावर

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातील पाच वर्षापर्यंतच्या एक लाख ३९ हजार ६३९ बालकांपैकी ९२ बालके अतितीव्र कुपोषित असल्याचे आढळले. याशिवाय ८३२ बालके कुपोषणाच्या उंबरठ्यावर आहेत.

उमराणी उपसरपंचपदी बसवराज धोडमनी

जत,(प्रतिनिधी)-
उमराणी ( ता. जत ) येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी बसवराज जंगाप्पा धोडमनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. माजी पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

उमराणी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनागोंडा बिराजदार

जत,(प्रतिनिधी)-
उमराणी ( ता. जत ) येथील  जय हनुमान  विकास सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनगोंंडा मलगोंडा बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .सोसायटीवर काँग्रेस पक्षाची सत्ता असून बिराजदार हे माजी पंचायत समिती सदस्य मल्लेशी कत्ती समर्थक आहेत.

दुष्काळी सवलती लागू करा: विक्रम सावंत

 जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात भयानक  चारा व पाणी टंचाई जाणवत आहे. दुष्काळी भागासाठी शासनाने जाहीर केलेल्या सोयी व सवलतीची अंमलबजावणी अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे .शासनाने घोषणा केलेल्या सवलतीची त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जत तालुका काँग्रेसचे नेते विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी वि .ना . काळम पाटील यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले आहे.

जतमध्ये एकावर चाकू हल्ला

जत,(प्रतिनिधी)-
घरासमोरील गटारीत सतत कचरा साचून दुर्गंधी पसरते त्यावर जाळी बसवा म्हणून सांगितल्याचा राग मनात धरुन सलीम महमंद काकतीकर ( वय ५० रा.हुजरे गल्ली जत ) यांच्या हातावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याच्या आरोपावरून  उत्तम थोरात व त्यांची बहीण सुनिता गडदे रा.दोघे जत यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. याप्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही.

Tuesday, January 22, 2019

शाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलनाची रेलचेल सुरू

जत,(प्रतिनिधी)-
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातल्या शाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलन,सांस्कृतीक कार्यक्रम ,क्रीडा स्पर्धाची रेलचेल सुरू झाली आहे. या निमित्ताने पालक मेळावेदेखील होत आहेत.जतच्या ग्रामीण भागात विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्यदेखील स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे.

जत तालुक्यात 23 गावांना टँकरने पाणीपुरवठा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढतच असून पिण्याच्या पाण्याची टंचाईदेखील तीव्र होत चालली आहे. जत तालुक्यात 23 गावांसह शंभराहून अधिक वाड्या वस्त्यांना 10 टँकरद्वारा पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, टँकर चालकांद्वारा मंजूर खेपा केल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शिवाय सध्या जिल्हय़ातील 61 गावे आणि 380 वाडय़ावस्त्यांना 51 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे.

दुष्काळी भागाला वरदान: अ‍ॅपल बोर


 सांगली,कोल्हापूर, नाशिक,पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातही अॅपल बोर हे नगदी पीक चांगलेच रुजत आहे. अत्यंत कमी पाणी, कमी खर्च, कमी देखभाल अशा अवस्थेतही हे फळपीक उत्तम प्रकारे येते. फळांचा आकार मोठा आकर्षक रंग, चवीला छान असलेले अॅपल बोर स्थानिकांसह शहरांमधल्या बाजारांमध्ये चांगला उठाव करत आहे. विशेष म्हणजे अॅपल बोराला मिळत असलेला प्रतिसाद हा तोंडातोंडी आहे. कृषी विद्यापीठे किंवा कृषी विभाग यांच्या शिफारशींशिवाय राज्यात अॅपल बोरला चांगले मार्केट मिळत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातून कुष्ठरोग हद्दपार


जत,(प्रतिनिधी)-
पोलिओचे निर्मूलन करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. पण, राज्यात कुष्ठरोगाचे रूग्ण आजही आढळून येत आहेत. पण, यामध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ात नव्याने सापडणाऱया रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र नव्याने आढळून येणाऱया रूग्णांची संख्या झपाटय़ाने कमी झाली असून सध्या याचे प्रमाण 0.35 इतके आहे.
कुष्ठरोगाच्या निर्मुलनासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. या रोगाच्या रूग्णांची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येतात. तर, रूग्ण शोधून आणणाऱया अंगणवाडी सेविका, परिचारिका, आशा वर्कर आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दोनशे रूपयांचे मानधनही देण्यात येते. शासनाने सप्टेंबरमध्ये कुष्ठरूग्णांची विशेष शोध मोहीम राबविली. यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे विदर्भ आणि मराठवाडा विभागात आढळून आले. पश्चिम महाराष्ट्रातही कुष्ठरूग्ण आढळून आले. पण, याचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे कुष्ठरोग सेवा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

सांगली जिल्ह्यात एचआयव्ही रुग्ण दीड टक्क्यांवर


जत,(प्रतिनिधी)-
एड्सच्याबाबतीत सांगली जिल्ह्याचे नाव मुंबई,पुणे पाठोपाठ घेतले जात होते. मात्र गेल्या दहा वर्षात यात कमालीची घट झाली आहे.2006 मध्ये एड्सचे रुग्ण तब्बल 35 टक्के होतेआज हेच प्रमाण फक्त दीड टक्क्यांवर आले आहे.  प्रबोधन,  समुपदेशन आणि बाधित रुग्णांवरील योग्य उपचार यामुळे एचआयव्हीचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे.

Monday, January 21, 2019

पाणी चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा-प्रा.मानेपाटील

जत,(प्रतिनिधी)-
समस्त प्राणीमात्रांचा भविष्यकाळ उज्ज्वल करून भविष्यात पाण्यासाठी होणारे तिसरे महायुध्द टाळायचे असेल तर पाणी चळवळीत प्रत्येकाने सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.सी.वाय.मानेपाटील यांनी केले.

उंटवाडीची पूजा हुचगोंड लांब उडीत जिल्ह्यात प्रथम


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उंटवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची कु. पूजा दुडाप्पा हुचगोंड हिने जिल्हा स्तरीय लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

ग्रामीण भागात वाढतोय परप्रांतीय मजुरांचा लोंढा

जत,(प्रतिनिधी)-
पोटाची खळगी भरण्याकरिता राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांतून पोटाची खळगी भरण्याकरिता शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील मोठ्या प्रमाणात मजूर स्थलांतर करून आले आहेत. पुरुषांबरोबर महिला आणि लहान मुलांची संख्याही मोठी आहे.

आशा गटप्रवर्तकांचे २३ ला आझाद मैदानावर धरणे

जत,(प्रतिनिधी)-
अबकी बार, आरोग्य अधिकार! असा नारा देत राज्यातील सरकारी 'दवाखान्याकडे होणारे राज्य शासनाचे दुर्लक्ष केव्हा थांबणार? याचा जाब विचारण्यासाठी सर्वसामान्य जनता, आशा, गटप्रवर्तक, डॉक्टर, नर्सेस, 'फार्मासिस्ट, आरोग्य कर्मचारी, यांच्या न्याय हक्कासाठी २३ जानेवारी रोजी विराट धरणे आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र आशा-गटप्रवर्तक युनियन जिल्हा अध्यक्षा  कॉ. मिना कोळी यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. 

Sunday, January 20, 2019

लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच!


तपास यंत्रणेचे अपयश;कर्मचार्यांचा निर्ढावलेपणा वाढला
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमध्ये पाच हजारांची लाच घेताना गावकामगार तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. अशा प्रकारच्या घटना आठ दिवसांत कुठे ना कुठे ऐकायला आणि वाचायला मिळत आहे. लाचलुचपत यंत्रणेच्या जाळ्यात लाचखोर सापडत असले तरी त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी मुजोर झाली आहेत. गेल्या वर्षाचा आढावा घेतला तर फक्त 33 टक्के लाचखोर लोकांना शिक्षा झाली आहे.

आमदारांनी बैठकांचा फार्स बंद करावा: विक्रम सावंत

दुष्काळी स्थिती हाताळण्यात अपयश
जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यातील  दुष्काळ 1972 पेक्षाही भीषण   आहे. दिवसेंदिवस त्याची दाहकता वाढतच चालली आहे. मात्र  आमदार विलासराव जगताप केवळ बैठका घेण्यातच धन्यता मानत आहेत. त्यांनी  बैठकांचा फार्स बंद  करावा. अन्यथा जनता भाजपला धडा शिकवेल, असा इशारा  जिल्हा बँकेचे संचालक, काँग्रेसनेते विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

90 टक्के तरुण सोशल मीडियावर बिझी


भविष्यातील पिढीवर याचे विपरीत परिणाम; सच्चा मैत्रीची जाणीव व्हायला हवी
जत,(प्रतिनिधी)-
सोशल मीडियाचा वापर अलीकडच्या काळात चांगलाच वाढला आहे. सोशल मीडियाच्या व्यसनाची नशा अथवा धुंदी सोलापूरकरांमध्ये वाढत आहे. यामुळे माणसामाणसांमधील संवाद कमी झाला असून याबाबत विशेषतः युवा पिढीमध्ये जनजागृतीची गरज असल्याचे निरीक्षण शहरातील मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कौटुंबिक संवाद हरपतोय. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी मोबाइलमध्ये बिझी असतात. याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. त्यामुळे पालकांनीच पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या मोबाइल वापरावर निर्बंध घालावेत. अन्यथा भविष्यातील पिढीवर याचे विपरीत परिणाम होतील, असा इशारा मानसोपचार तज्ज्ञ
देत आहेत.

डफळापूर जिल्हा परिषद शाळा क्र.2 मध्ये स्नेहसंमेलन

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील डफळापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा क्र.2 येथे 'संगीत कस्तुरी 2019' या नावाने स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. पालक आणि गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
    विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकाराचा पाया इथेच घातला जातो, असे म्हटल्यास वावगे होणार नाही आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याप्रमाणे विद्यार्थीदेखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुलांसाठी स्नेहसंमेलन खूप महत्त्वाचे असते.

Saturday, January 19, 2019

नवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’ २१ रोजी

जत,(प्रतिनिधी)-
चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असतो. त्यामुळे तो महिन्यातून एकदा पृथ्वीच्या जवळ येतो व एकदा दर ही जातो. मात्र, ज्यावेळी चंद्र पृथ्वीपासून वाजवीपेक्षा कमी अंतरावर येतो. त्यावेळेस चंद्राचे बिंब नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा मोठे दिसते. अशा चंद्राला ‘सुपरमून’ असे म्हगतात. दि. 21 जानेवारी रोजी या वर्षीची पहिल्या सुपरमूनचा योग आहे.

सायकल दुकानदाराचा महिलेने केला गळा आवळून खून

जत,(प्रतिनिधी)-
कोंतेबोबलाद (ता. जत)  येथे  शुक्रवारी  शहानूर खाजासाब  मकानदार (वय 25) याचा याचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. त्याचा अनैतिक संबंध ठेवण्याच्या कारणावरून खून झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एका संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.अनैतिक संबंधासाठी वारंवार त्रास देत असल्याने आपण शहानूरचा गळा आवळून खून केल्याचे संशयित महिलेने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्याच्या पूर्व भागातील लोकांच्या सोयीसाठी संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी विविध किरकोळ  दाखले सोडले तर काहीच उपलब्ध होत नाही. उलट लोकांचा त्रास वाढला असून दाखल्यांच्या पूर्ततेसाठी जतला मग पुन्हा संख असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लोकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय होत आहे. संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू केल्यास बहुतांश सोयी ची पूर्तता होणार आहे. त्यामुळे संखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशीला होनमोरे यांनी महसूल मंत्र्यांकडे केली आहे.

जत-देवनाळ रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

(जत-देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना पाठीमागे अशी खडी उचकटली जात आहे.)
जत,(प्रतिनिधी)-
जत ते देवनाळ रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. डांबराचा अजिबात वापर करण्यात न आल्याने अंथरलेली खडी पुन्हा उखडू लागली आहे. या कामाची चौकशी व्हावी व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

Friday, January 18, 2019

मोहनराव,विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नाहीत

काँग्रेसमध्ये  उमेदवारीबाबत गोंधळ 
जत,(प्रतिनिधी)-
खासदार संजय पाटील यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्याबाबत काँग्रेस गोंधळलेली असल्याचे स्पष्ट दिसत असून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कालच झालेल्या काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत याचे पडसाद दिसून आले. या बैठकीत आमदार मोहनराव कदम आणि विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नसल्याचे स्पष्ट झाले.

(संपादकीय) मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या


ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये ओडिया माध्यमांच्या शाळांमध्ये स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन अध्यापन प्रणाली यासाठी विकसित केली असून यथावकाश अशा प्रकारचे शिक्षण संपूर्ण राज्यात दिले जाणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून शिक्षण देण्याची ही कल्पना मोठी भन्नाट असून याचा लाभ नक्कीच विद्यार्थ्यांना होणार आहे. विविध विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांनी घेतलेल्या शिकवणीचे रेकॉर्डिंग करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. यूट्युब आणि व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून शिक्षकांचे अध्यापन उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिला तरी त्याला स्मार्टफोनच्या माध्यमातून मागे काय शिकवले, याची माहिती मिळू शकते.या स्मार्टफोन शिक्षणाचा नक्कीच फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. खरे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने याबाबतीत आघाडी घ्यायला हवी होती. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र हे शब्द फक्त नावालाच आहेत, असेच शिक्षणाच्याबाबतीत जाणवते.