Monday, May 31, 2021

गोष्ट खूप छोटी असते हो….


तुम्ही गाडीतून जातांना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बर्‍याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, दादा पत्ता सांगता का? असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्हज द्यायचे. कधी स्कीनचं मलम देऊन टाकायचं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टँडवर न लावता, सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं थँक यू ऐकायला मस्त वाटतं…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणार्‍याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.

माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…

गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची…

®®®®®®®®®®®®®®®®®®

योगायोग आणि मनाला पडलेला प्रश्न

या वर्षी एकही पाणी टंचाईची बातमी नाही…..

मे महिना संपत आला तरीपण कुठल्या धरणात किती टक्के पाणी आहे याची साधी माहीती चौकशीपण नाही….

ना टँकर, ना पाण्यासाठी

वणवण ….

उलट घरी असल्याने,स्वच्छतेमुळे पाण्याचा वापर जास्त….

मग दरवर्षी खरंच पाणी टंचाई असते का?

ती निर्माण केली जाते?

एक विचार करण्यासारखी गोष्ट…

®®®®®®®®®®®®®®®®®®®

खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती तिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते.

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

शिक्षक : बंड्या, ‘मुलगी खाली उभी आहे’ हे वाक्य इंग्रजीत बोलून दाखव.

बंड्या : सोप्पं आहे सर…

“Mis-Under-standing….

Friday, May 28, 2021

कोरोनाकाळात सायकल उद्योग तेजीत


गेल्या वर्षभरात देशात कोरोनाचे संकट थैमान घालत असल्याचे सगळ्यांना माहिती आहे. या काळामध्ये नागरिकांच्या सार्वजनिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर निबर्ंध लादण्यात आले. लॉकडाउनमुळे कोट्यवधी लोकांना घरातच बसावे लागले. अजूनही अनेक राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाउनचेच निबर्ंध लागू आहेत. या पार्श्‍वभूमीवर इतर असंख्य उद्योगांचे आलेख खालच्या दिशेने येत असताना भारतातील सायकल उत्पादन उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच ऐन कोरोना लॉकडाउन काळात देशात सायकलींची मागणी तब्बल २0 टक्क्यांनी वाढली आहे. क्रिसिल या उद्योगांना मानांकन देणार्‍या संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात सायकल उद्योगात नोंद करण्यात आलेली ही सर्वात मोठी वाढ ठरली आहे.

क्रिसिलने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात सायकलींची मागणी १ कोटी २0 लाखांच्या आसपास होती. मात्र, चालू आर्थिक वर्षांत त्यामध्ये १ कोटी ४५ लाखांपर्यंत वाढ होईल. लोकांमध्ये फिटनेसविषयी आलेली जागृकता आणि कोरोना काळात घरीच बसल्यामुळे असलेला बराचसा मोकळा वेळ यासाठी कारणीभूत ठरल्याचे देखील निरीक्षण क्रिसिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उत्पादित केल्या जाणार्‍या सायकलींचे साधारणपणे ४ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. यामध्ये स्टँडर्ड, प्रिमियम, किड्स आणि एक्स्पोर्ट अशा चार प्रकारांचा समावेश आहे. यापैकी स्टँडर्ड प्रकारच्या सायकलींची मागणी एकूण मागणीच्या साधारण ५0 टक्के असते. या प्रकारच्या सायकली थेट सरकारकडून खरेदी करून विविध प्रकारच्या योजनांमध्ये त्यांचे वाटप केले जाते. त्यानंतर प्रिमियम आणि किड्स या दोन प्रकारच्या सायकलींच्या मागणीचे प्रमाण ४0 टक्क्यांच्या घरात आहे. फिटनेस आणि मोकळा वेळ या कारणांमुळे या प्रकारच्या सायकलींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यानंतर एक्स्पोर्ट आणि इतर प्रकारच्या सायकलींसाठीच्या मागणीचे प्रमाण १0 टक्के आहे.

क्रिसिलने म्हटल्याप्रमाणे, सायकल उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. एक म्हणजे प्रिमियम आणि किड्स प्रकारच्या सायकलींसाठीची मागणी तब्बल ५0 टक्क्यांपर्यंत वाढली. दुसरे म्हणजे प्रिमियम आणि किड्स या प्रकारच्या सायकलींची मागणी त्यांच्या किंमतीनुसार फारशी कमी-जास्त होत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये जवळपास ६0 ते ६५ टक्के हिस्सा असलेल्या स्टीलसारख्या कच्च्या मालाच्या किंमतीत बदल झाला, तरी देखील तो खर्च किंमतीमध्ये वाढवण्यात उत्पादकांना कोणतीही अडचण येत नाही. यामुळे एकूणच सायकल उत्पादकांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली आहे.

Wednesday, May 26, 2021

हेही जरा ऐका...!


दीडशे कि.मी. वरून हिमालयाची शिखरे स्पष्ट दिसू लागली .. गंगा नदीचा तळ स्पष्ट दिसू लागला…

दहा पंधरा दिवस घरी शांत बसा, नाहीतर आकाशातून येताना यम सुद्धा स्पष्ट दिसायला लागेल…

@@@@@@@@@@@@@

जातं ओढायला सुध्दा ताकद लागते, पण जातं जास्त ताकद लावून ओढलं ना तर त्याचा खुंटा बाजूला निघून पडतो.

याचा अर्थ असा आहे की,आयुष्याचे दळण जर व्यवस्थित दळायचे असेल तर…

अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं,तेव्हा आयुष्याचा खुंटा व्यवस्थित चालतो…!!

आज घरी राहिलात तर, उद्याचा दिवस तुमचाच असेल…

@@@@@@@@@@@@@@

एका बाईने डॉक्टरला विचारलं,

जेव्हा माझा नवरा बँकेमधुन घरी येतो तेव्हा मी त्यांना बुट आणि कपडे बाहेर काढायला सांगते, मग डेटॉलने पूर्ण शरीर स्वच्छ करते. मग त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालते मग गुळण्या करायला गरम पाणी आणि लिंबू देते. मग सॅनिटाईझरने हाथ पाय स्वच्छ करते… एवढं पुरेसे आहे का..?

डॉक्टर : जमले तर तुम्ही त्यांना कुकर मध्ये घालून तीन शिट्या घेऊ शकता.

Tuesday, May 25, 2021

व्हॉट्स अप


विनाकारण आपण व्हॉट्सअ‍ॅपला नावे ठेवतो. आपल्याला काय फायदे झालेत ते वाचा.

रोजचं चॅटिंग करता-करता छान टायपिंग करायला शिकलो. रोजचे सॉरी / थँक्सपासून, सर्व व्यवहार पाळायला शिकलो. आपलेच सेल्फी काढता-काढता चांगली छायाचित्रे काढायला पाहायला शिकलो.

नवनवीन मेसेज पाठवताना आपण थोडे वाचायलाही शिकलो. वेगवेगळ्या स्टीकरचा वापर करून…शब्दाविना भाव दाखवायला शिकलो. रोजचे सुविचार वाचून थोडं अध्यात्माकडेही नकळत झुकलो.

कधीकधी कॉमेंट करुन ‘मनमोकळे विचार‘ मांडायला शिकलो. कायम नेट पॅक मारत असताना अनावश्यक खर्चही करायला शिकलो. सुसंवाद वाढवत जाऊन नाती अधिकाधिक जपायलाही शिकलो. छान सुंदर विनोदी प्रसंग वाचून.. इमोजींसह हसायला व हसवायलाही शिकलो. चांगले सकारात्मक विचार दृष्टीत आले की, इतरांशी अशा विचारांची, देवाण घेवाण करणे शिकलो. घर बसल्या मनोरंजन होते आहे, विकासही होतो आहे..!!!

&&&&&&&&&&&&&&&&&&&

सांग सांग भोलानाथ

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? खूप वर्षांपासून चाललेल्या या कवितेला शेवटी यश आलं! आमचं बालपणापासूनच स्वप्न पूर्ण झालं!

&&&&&&&&&&&&&&&&&&&&

सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले यावरून काय बोध घ्यायचा ? यम आणि मृत्यूदेखील तुम्हाला तुमच्या बायकोपासून वाचवू शकत नाही. तेव्हा शांत रहा, बायकोवर प्रेम करा. कारण दुसरा उपाय नाही!


Monday, May 24, 2021

नव्या म्हणी… तेवढ्याच उद्बोधक

 


हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात,

कोरोनाला हरवायला, बसा आपापल्या घरात

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,

सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,

रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून

शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा

ताजमहाल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,

लक्षण दिसली कोरोनाची तर डॉक्टरना भेटा थेट

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,

कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले

चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ,

आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ,

चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,

डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप, 

काळजी घ्या, सुरक्षित राहा…

*************************************

वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो… गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशिरा उगवतो आणि हजारो वर्ष जगतो… तसेच चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही… म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणार्‍या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणार्‍या लोकांच्या सानिध्यात राहावे

**************************************

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो. कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते, म्हणूनच स्वभावसुद्धा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे…

****************************************

जेव्हा नखं वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो. नखं वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही… त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका… ‘विश्वास’ एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला ‘फसवताना’ तो स्वत:ला ‘दोषी’ समजेल…

सांगलीचा एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव


मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरीक्षक पडवळवाडी (ता. वाळवा) येथील संभाजी गुरव  यांनी जगातील सर्वांत उंच असलेले एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्र पोलिस दलाचा झेंडा फडकावला. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत नोंदवले गेले आहे. गुरव यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याची घोषणा संबंधित कंपनीने आपल्या वेबसाईटवर केली आहे.

गुरव मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलाचे ते तिसरे कर्मचारी ठरलेत. गुरव यांना पोलिस दलात भरती होण्यापूर्वी गिर्यारोहणाची आवड होती. ती त्यांनी पोलिस दलात भरती झाल्यानंतरही जोपासली. त्यांनी यापूर्वी आपली शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेसकॅम्प प्रशिक्षण  पूर्ण केले होते. त्यानंतर एव्हरेस्ट सर करणारच, असे ध्येय उराशी बाळगून त्यांनी गेली दोन वर्षे अथक परिश्रम केले. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने त्यांच्या परिश्रमाचे चीज झाले आहे. उणे १९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असलेल्या एव्हरेस्ट शिखरावर त्यांनी काठमांडू  येथून चढाई करण्यास सुरुवात केली. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ६५ किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करत १७ मे रोजी बेस कॅम्प २ पर्यंत, १८ मे रोजी बेसकॅम्प ३, १९ मे रोजी बेस कॅम्प ४ आणि २० मे रोजी तेथून एव्हरेस्ट शिखराची चढाई सुरू केली. २१ मेपर्यंत निसर्गाची साथ राहिली, तर एव्हरेस्ट सर करता येईल, अशी आशा होती. वातावरण आणि निसर्गाने साथ दिल्याने शनिवारी (ता. २२) रोजी त्यांनी एव्हरेस्ट शिखरावर आपले पाय रोवले. त्यांच्या या कामगिरीने वाळवा तालुक्‍यासह सांगली जिल्ह्याचे नाव गिर्यारोहकांच्या यादीत सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले आहेच. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्वप्न पूर्ण झाले संभाजी गुरव हे वाळवा गावाशेजारील पडवळवाडीचे रहिवासी आहेत. ते सामान्य कुटुंबात जन्मले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षकपदी भरती झाले. त्यांनी यापूर्वी गडचिरोली येथे पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. व्यायाम आणि शारीरिक क्षमता राखण्यावर त्यांचा कायम भर असे. एक दिवस जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करायचे हे त्यांचे स्वप्न होते. ते अनेक वेळा बोलूनही दाखवत. ते कायम व्यायाम व त्यासाठी लागणारी शारीरिक क्षमता निर्माण करण्यासाठी धडपडत होते. ८८४८ मीटर उंच एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांना अनंत अडचणी व बर्फवृष्टीचा सामना करावा लागला; पण त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून एव्हरेस्टवीर हा मानाचा किताब पटकावला.

तिसरे पोलिस कर्मचारीयापूर्वी महाराष्ट्र पोलिस दलातील आयपीएस सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यांच्यानंतर संभाजी गुरव हे शिखर सर करणारे तिसरे कर्मचारी ठरले आहेत. दरम्यान सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील कस्तुरी याही आता एव्हरेस्ट शिखराजवळ पोहोचल्याची बातमी आली आहे. कॅम्पच्या तीनच्या दिशेने चढाई करत आहेत. करवीरकन्या कस्तुरी सावेकरची एव्हरेस्टची अंतिम चढाई सुरू झाली असून बुधवारी (२६) पहाटे ती एव्हरेस्टवर तिरंगा फडकवण्याची शक्यता आहे. एकूणच कोल्हापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट असून, आज ती कॅम्प दोनवर होती. उद्या (सोमवारी) पहाटे ती कॅम्प तीनच्या दिशेने चढाईला प्रारंभ करणार आहे.

कस्तुरीच्या टीममध्ये एकूण बारा गिर्यारोहकांचा समावेश आहे. ही सर्व टीम सुखरूप असून मंगळवारी (२५) पहाटे कॅम्प चारच्या दिशेने त्यांची चढाई सुरू होईल आणि बुधवारी पहाटे एव्हरेस्टचा शिखर माथा ती गाठेल आणि एव्हरेस्टवर कोल्हापूरचा झेंडा रोवेल, असे आज तिचे वडील दीपक सावेकर यांनी सांगितले. दरम्यान, कस्तुरी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून इतक्या मोठ्या मोहिमेसाठी गेली असून, तिला अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था, संघटनांनी आर्थिक बळ दिले आहे. मात्र, तरीही निधी कमी पडला असल्याने मालोजीराजे छत्रपती यांनी तत्काळ पन्नास हजारांची आर्थिक मदत कस्तुरीचे वडील दीपक सावेकर यांच्याकडे दिली. यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, उद्योजक तेज घाटगे, जय कामत, यशराजराजे छत्रपती आदी उपस्थित होते.