जत,(प्रतिनिधी)-
जत व परिसरात नववर्षाचे स्वागत मद्य प्राशन करून कराल तर त्यांच्या नववर्षाची सुरुवात पोलिस कोठडीत होणार आहे; त्यामुळे नववर्षाचे स्वागत करा,पण अति उत्साह टाळा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो नागरिक घराबाहेर पडतात. अलीकडच्या काळात नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करण्याची नवीन संकल्पना रुजत चालली आहे. तरुण-तरुणी या मोहजाळ्यात पूर्णपणे आधीन गेली आहे. दारू व अन्य मादक पदार्थ यांच्या नशेत त्यांना कोणत्याही ठिकाणाचे व परिस्थितीचे भान राहात नाही. ते सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य भाषा, गैरवर्तन करीत हुल्लडबाजी करून धिंगाणा घालतात. अनेकवेळा याचे भांडणात रूपांतर होते, याचा परिणाम सर्वांना सोसावा लागतो.
जत परिसरात अथवा निर्जनस्थळी होणार्या काही पार्ट्यांचा एक नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मागील काही दिवसांत मोठ्या शहरात व परिसरात झालेल्या छुप्या रेव्ह व धांगड-धिंगाणा पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात देखील पोलिसांची या परिसरातील हॉटेल्स व बंगल्यावर करडी नजर राहणार आहे. त्यासाठी पोलिसांची काही विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच रस्त्यांवर दारू पिऊन वाहने चालविणे, विनापरवाना वाहने चालविणार्यांची तपासणी करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत स्पिकर्स, ध्वनिक्षेपक चालविणार्या हॉटेल व मालकाविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment