जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेचे पडघम वाजायला लागले
आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र यहां तो सब शांती शांती आहे, म्हणण्याची वेळ आली आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका तीन-चार महिन्यावर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसच्या गोठात शांतताच दिसून येत आहे.
लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार,याचाच खल सध्या
सुरू आहे. माजी मंत्री प्रतीक पाटील यांना डावलले जाणार का,
असाच सवाल सध्या तरी ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशीच पारंपारिक लढत होणार,
अशी चिन्हे असून विद्यमान खासदार संजय पाटील हेच पुन्हा भाजपाचे उमेदवार
असतील, असे बोलले जात असले तरी श्री. पाटील
यांना पुन्हा लोकसभेची लॉटरी लागणार का, याबाबत सांशकता व्यक्त
केली जात आहे.
काँग्रेसलादेखील उमेदवार
शोधण्याची वेळ आली आहे.
अनेकांना सक्रीय,ताकदवान उमेदवार हवा आहे.
मात्र त्यांचा शोध पुन्हा प्रतिक पाटील यांच्याजवळच येऊन थांबत आहे.
मात्र अनेकांना वसंतदादा घराण्याबाहेर उमेदवारी दिली जाऊ शकते,
असा विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे काही इच्छुकांनी यात उड्या घेतल्या आहेत. गेल्या
वर्षदोन वर्षात काँग्रेसला जबर धक्के बसले आहेत. त्यांचे अनेक
दिग्गज आज हयात नाहीत. भारती विद्यापीठ स्थापणारे आणि राजकारणात
आपला स्वतंत्र ठसा उमटवलेले डॉ. पतंगराव कदम, मदन पाटील यांच्या अकाली जाण्याने सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रकारची
पोकळी निर्माण झाली आहे. गतवर्षी नरेंद्र मोदींच्या लाटेत राज्यमंत्री
असलेले प्रतिक पाटील यांचा फार मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. ही पोकळी कशी भरून निघणार, असा प्रश्न आहे.
गेल्या साडेचार वर्षात प्रतिक
पाटील अज्ञातवासातच होते.
त्यामुळे ते रिंगणात असतील की त्यांचे धाकटे बंधू विशाल असतील,
अशी चर्चादेखील होताना दिसत आहे. पतंगराव कदम असताना
आमदार विश्वजीत कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा होती,पण आता तेवढी चर्चा होताना दिसत नाही.प्रतिक आणि विशाल
दोघांनीही पक्षाकडे लोकसभेच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. या शिवाय या
यादीत काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्रीताई
पाटील यांचीही नावे चर्चेत आली आहेत. भाजपकडून पुढे उमेदवार कोण
दिला जाईल याबाबतही आडाखे काँग्रेसकडून बांधले जात आहेत. त्याचे
कारण म्हणजे मोदी लाटेवर स्वार होऊन दिल्लीत गेलेल्या संजय पाटलांबद्दल वाढत चाललेली नाराजी.
ही नाराजी पक्षांतर्गतच सुरू झाली. गोपीचंद पडळकर
या असंतोषाचे जनक ठरले.
त्यानंतर अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज
देशमुख, आमदार विलासराव जगताप, सुरेश खाडे
यांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्रीताई यांच्याही नावाची चर्चा खासदारकीसाठी
आहे. पृथ्वीराज पाटील देखील वेगाने पुढे येत आहेत. असे असले तरी माजी मंत्री प्रतीक पाटील यांचा थेट दहा जनपथशी असलेला संपर्क
नजरेआड करून चालणार नाही. दादा घराण्याला जर सांगली विधानसभा
दिली तर ते लोकसभेसाठी आग्रही राहणार नाहीत, असे बोलले जात आहेत.
पण यात पुन्हा काँग्रेस अंतर्गत गटबाजी उफाळण्याची शक्यता व्यक्त होत
आहे. भाजपकडेही तगडे आव्हान देऊ शकेल, असा
उमेदवार दिसत नसला तरी समझोता घडविणे हे देखील पहिले आव्हान असेल. गटबाजी टाळण्यासाठी काँग्रेसवाल्यांना सबुरीने घ्यावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment