Sunday, March 31, 2019

कोळगिरीत कडबा जळून अडीच लाखांचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोळगिरी येथे पवनचक्कीच्या विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अमसिद्ध आण्णाप्पा चमकेरी यांचा ज्वारीचा कडबा जळून खाक झाला. यात त्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, आमसिद्ध चमकेरी यांचे कोळगिरी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर काराजनगी रस्त्यालगत घर आहे. त्यांनी नुकतीच ज्वारीची काढणी करून कडबा (वाळलेला चारा) एकत्रित रचून ठेवला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कडब्याजवळून गेलेल्या पवनचक्कीच्या तारांमधून ठिणगी पडून कडबा जळून खाक झाला.

जतमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत माने हद्दपार


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीमध्ये संभाव्य अनुचित घटना व प्रकार घडू नये याची दक्षता घेत उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशान्वये जत शहरातील अनिकेत ऊर्फ पाँडी अशिक माने (वय 23) यास सांगली व सोलापूर जिल्ह्यांमधून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तीन महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

बहुचर्चित धुमस 5 एप्रिलला प्रदर्शित होणार


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते उत्तम जानकर आणि गोपीचंद पडळकर हे धुमस चित्रपटाच्या निमित्ताने अभिनयात पदार्पण करत आहेत. हा चित्रपट शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सिनेरसिकांची मने जिंकण्यासाठी राज्यातील चित्रपटगृहांमध्ये हजेरी लावत आहे. दाक्षिणात्य तंत्रज्ञानाची जोड देऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे.

मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर




जत,(प्रतिनिधी)- 
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढून मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.    

निवडणुकीत तरुणाईचा कौल महत्त्वाचा!

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण पिढीवरच या देशाचे भवितव्य अवलंबून असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाई कुणाला कौल देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रामुख्याने सांगली लोकसभा मतदारसंघात तरुणाई कोणत्या उमेदवाराला व पक्षाला पसंती देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Saturday, March 30, 2019

सातव्या वेतनाच्या पहिल्या पगाराची कर्मचार्‍यांना पुन्हा प्रतीक्षा


जत,(प्रतिनिधी)-
सातवे वेतन सातत्याने लांबणीवर पडत चालल्याने सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यात निराशा पसरत चालली आहे. सातव्या वेतनाचा पहिला पगार एप्रिल महिन्यात कर्मचार्यांच्या हाती पडेल, अशी शक्यता होती,मात्र ऑनलाइन सेवार्थ प्रणालीचा टॅब ओपन होत नसल्याने अखेर सहाव्या वेतनाप्रमाणेच पगार काढण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात आले. या प्रक्रियेमुळे पगार लांबणार असल्याने कर्मचार्यांमध्ये निराशा पसरत चालली आहे.

स्वच्छता अभियानाची ऐशी की तैशी


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरात स्वच्छतागृहांची वानवा असून त्यामुळे बाजारहाट करण्यासाठी येणार्या लोकांची विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. बाजारात स्वच्छतागृहांची त्याचबरोबर शहरात जागोजागी स्वच्छतागृहांची आणि शौचालयांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

जीवनात ईश्‍वरप्राप्तीशिवाय खरा आनंद मिळणे कठीण: झेंडॅ


जत,(प्रतिनिधी)-
 जीवनामध्ये खरा शास्वत आनंद प्राप्त करायचा असेल, तर ईश्वरप्राप्तीशिवाय पर्याय नाही. ईश्वरप्राप्तीनेच मनुष्य जीवन आनंदी, सुखमय, समाधानी बनू शकते, असे प्रतिपादन संत निरंकारी मंडळ शाखा, कोसारी यांच्यावतीने आयोजित विशाल सत्संग कार्यक्रमामध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रचारक सचिन झेंडे (मुंबई) यांनी केले.

बलशाली भारताठी विद्यार्थ्यांनी गरूडझेप घ्यावी: चिपडे


जत,(प्रतिनिधी)-
येळवी (ता. जत) येथील श्री संत ज्ञानेश्वर आश्रमशाळेत इ. 7 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. याप्रसंगी अपयशाने खचून जाऊ नये, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यातील गुण शोधावेत, बलशाली भारत घडविण्यासाठी गरुडझेप घेण्याची जिद्द ठेवावी, असे प्रतिपादन बीआरसी तज्ज्ञ मार्गदर्शक चिपडे यांनी केले.

येळवी यूथ टॅलेंट सर्च परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद


 जत,(प्रतिनिधी)-
 सावली फौंडेशन सेवाभावी संस्था आयोजित यूथ टॅलेंट सर्च एक्झाम नुकतीच अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने पार पडली. या परीक्षेस लहान गटातून 145 विद्यार्थ्यांनी, तर मोठ्या गटातून 60 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा यशस्वी करण्यात प्राथमिक, माध्यमिक व आश्रम शाळांमधील शिक्षक व संयोजन समितीतील सर्वच सदस्यांनी पारदर्शक कामगिरी बजावली. तसेच तालुक्यातील नामवंत ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून उच्च पदावर कार्यरत असणार्या गुणवंतांचा व या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी यांचा विशेष सत्कार व बक्षीस वितरण सोहळा पार पडला. त्याचबरोबर येळवी मॅरेथॉन याही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अक्षय आवटे, बापू आटपाडकर, बिरुदेव कुटे, अजित घोंगडे, दत्तात्रय साळे, विश्वास कोळी, नरेश शिंदे, अमोल आवटे, राहुल शिंदे आदींचे विशेष सहकार्य लाभले.

सांगली लोकसभा चौरंगी होणार का?


जत,(प्रतिनिधी)-
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीतील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीला सोडल्याने काँग्रेसची नाचक्की झाली असताना सांगलीच्या वसंतदादा पाटील घराण्यातील विशाल पाटील यांना पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागल्याने या घराण्यावरदेखील मोठी नामुष्की ओढवली आहे. विशाल पाटील यांना स्वाभिमानीची बॅट घेऊन लढावे लागणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश शेंडगे आणि अपक्ष म्हणून गोपीचंद पडळकर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने चौरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खासदार राजू शेट्टी हॅट्ट्रिक साधणार काय?



शेतकर्यांचे कैवारी खासदार राजू शेट्टी या निवडणुकीत हॅट्ट्रिक साधणार काय, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतलेले, खानदानी राजकीय व्यक्तिमत्त्व लाभलेले धैर्यशील माने या निवडणुकीत बलाढ्य पैलवानाबरोबर कुस्ती खेळताना गनिमी काव्याचा वापर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी दुरंगी वाटणारी ही निवडणूक तिरंगी रंगेल, असे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रीय नेतृत्वाकडे झेप घेतलेले खासदार राजू शेट्टी पुन्हा संसदेत जाणार काय, याबाबत राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Friday, March 29, 2019

चिंच उत्पादनात कमालीची घट

जत,(प्रतिनिधी)-
चिंचेच जरी नुसते नाव काढले तरी, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. जिल्ह्यात चिंचेच्या झाडांची लागवड करून उत्पन्न मिळवणार्‍यांची संख्या मोठी आहे. पण यावर्षी कमी पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे चिंचेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादनात घट होणार असल्याने आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे चिंच उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

शांत,हसतमुख प्रा. चंद्रसेन मानेपाटील

आमचे सर्वांचें जिवलग , शांत स्वभावाचे , कायम हसतमुख असणारे  व जत नगरीतील आदर्श कुटुंबातील आणि जत येथील राजे रामराव महाविद्यालयात  प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले  चंद्रसेन उर्फ भारत यशवंतराव माने पाटील यांना अखंड सेवा केले नंतर आज त्यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, हे वाचून आम्हा सर्वांना खूप खूप मनापासून आनंद झाला व होत आहे.

Thursday, March 28, 2019

निवडणूक खर्च नियमनातील तरतुदींचे काटेकोर अनुपालन करा


निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया
सांगली,(प्रतिनिधी)-
सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांनी निवडणूक खर्चाच्या संदर्भात घ्यावयाची दक्षता आणि त्याचे संनियंत्रण यंत्रणेकडून केले जाणारे सक्त संनियंत्रण याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, लोकप्रतिनिधित्व अधिनियममधील अनुषंगिक तरतुदी आणि निवडणुकांचे परिचालन नियमांचे अनुषंगिक तरतुदींचे काटेकोर अनुपालन करण्याचे सक्त निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक राकेश भदादीया यांनी काल येथे दिले.

पीक कर्ज, प्राधान्यक्रमाच्या योजनांना सकारात्मक प्रतिसाद द्या


 जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट 85 टक्के पूर्ण झाले असले तरी रब्बी पीक कर्ज वाटपाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. पीक कर्ज वितरण व शासनाने ठरवून दिलेली प्राधान्यक्रमाची क्षेत्रे, प्राधान्यक्रमाच्या योजनांना बँकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

जिल्ह्यात 131 गावे, 864 वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी


जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात 131 गावे व 864 वाड्या-वस्त्यांवरील 2 लाख 82 हजार 766 शेतकर्यांना 134 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून टँकरची मागणी कुठेही प्रलंबित नाही. मागणी येईल तशी खात्री करून तात्काळ टँकर दिला जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली.

निवडणूक कामामुळे सरकारी कार्यालयांमध्ये सामसूम


जत,(प्रतिनिधी)-
 सांगली लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने प्रशासकीय विभागाने जय्यत तयारी चालू केली आहे. शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना निवडणूक प्रशिक्षण, प्रात्यक्षिक यांमध्ये गुंतवल्यामुळे सरकारी कार्यालये ओस पडल्याचे दिसून येत आहेत. निवडणूक कामाची यंदा अधिक प्रमाणात भर पडल्याने शासकीय कर्मचारीही गोंधळलेले दिसत आहेत. साहजिकच निवडणूक कामे झाल्याखेरील लोकांची कामे होणार नाहीत, असाच सूर निघत आहे.

वळसंग-कोळगिरी रस्त्यावर अपघात; तरुण ठार


 जत,(प्रतिनिधी)-
 वळसंग ते कोळगिरी रस्त्यावर वळसंगपासून तीन किलोमीटर अंतरावर आयशर टेम्पो व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यामध्ये वळसंगमधील संतोष विजयकुमार कोळी (वय 17) हा तरुण जागीच ठार झाला. या अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.

डॉ. रवींद्र आरळी यांची राज्य पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती


जत,(प्रतिनिधी)-
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सांगली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष आणि जत येथील प्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डॉ. रवींद्र आरळी यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळावर शासन नियुक्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे .

जत पूर्व भागात उमदी येथे मिनी एमआयडीसीची मागणी

जत,(प्रतिनिधी)-                     
जत तालुका विस्ताराने मोठा असल्यामुळे संख आणि उमदी येथे स्वतंत्र तहसिल कार्यालय सुरू करण्यात आले आहे,तसेच जतच्या पूर्व भागाचा स्वतंत्र  तालुका करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे.यामुळे तालुका आज साठ वर्षातही मागास राहिला आहे.  तालुक्याचा विकास साधायचा असेल तर तालुक्यात उद्योगधंदे उभारणे गरजेचे आहे. यासाठी जतच्या पूर्व भागात लघु औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची मागणी होत आहे.

जत तालुक्यातून जाणारे दोन्ही रेल्वे मार्ग नामंजूर केल्याने तालुकावासीयांची निराशा


जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्याचा सर्वागीण विकास  करण्यासाठी २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी पाठपुरावा करून मिरज- जत- विजयपूर (१२२किमी) आणि पंढरपूर -उमदी-विजयपूर (१०८.२४किमी) हे दोन्हीही रेल्वे मार्ग सर्व्हेक्षण करण्यासाठी मंजूर करून घेतले होते.त्यापैकी पंढरपूर -उमदी-विजयपूर या जत तालुक्यातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे सर्व्हे  पूर्ण होवून १२९४.६९ कोटी रूपये तरतूद करून  अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविले होते.या दोन्हीही रेल्वे मार्गाचा पाठपुरावा म्हणून सध्याच्या लोकप्रतिनिधीनी आॕगस्टला मंत्रालयाकडे विचारणा केली होती. त्यामुळे  या दोन्हीही रेल्वे मार्गाला गति मिळाली होती, पण रेल्वे बोर्डाने ऑगस्ट आणि नोव्हेंबर २०१८ ला या दोन्हीही रेल्वे मार्ग  नामंजूर केल्याने तालुकावासीयांची घोर निराशा झाली आहे.

Wednesday, March 27, 2019

जत पूर्व भागातील राष्ट्रीय महामार्ग एकपदरीच कामाची चौकशी करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जत पूर्व भागातून जाणाऱ्या पंढरपूर -उमदी-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम हे पंढरपूर ते उमदी पर्यत पूर्ण करण्यात आले आहे. पण याच महामार्गापैकी जत तालुक्याच्या हद्दीतीलच उमदी ते को.बोबलाद हा 36 किमीचा रस्ता सिंगलपदरीच ठेवून शासनाच्या आणि लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार केला आहे.या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात


महावितरणचे आवाहन
जत,(प्रतिनिधी)-
 ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनमहावितरणने केले आहे.

आदमापुरात बाळूमामा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
 श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवानिमित्त प्रतिवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षीही बुधवार दि. 26 मार्चपासून ते 3 एप्रिल 2019 अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांनी भंडारा उत्सवास प्रारंभ होत आहे.

देवनाळच्या तरुणाची उदगावात आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
 देवनाळ (ता. जत, जि. सांगली) येथील राजाराम बलभीम कांबळे याने उदगाव येथे आत्महत्या केल्याची नुकतीच घटना घडली. त्याची पत्नी, सासू, सासरे, मेहुणा व अन्य एक अशा पाचजणांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद राजाराम कांबळे यांचे बंधू रामचंद्र बलभीम कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी संशयित पत्नी गंगा कांबळे, सासू शांताबाई लांडगे, सासरे लक्ष्मण लांडगे, मेहुणा मर्याप्पा लांडगे व योगेश आवळे यांना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर वीजदरवाढ


जत,(प्रतिनिधी)-
 सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असतानाच उन्हाळ्याच्या 38-40 अंश सेल्सिअस तापमानाचे ऊन डोक्यावर घेणार्या सहनशील जनतेला वीजदरवाढीचा दणका बसणार आहे. 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणार्यांना प्रतियुनिट 24 पैसे जादा मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेला वीजदरवाढीचाशॉकबसणार आहे.

Tuesday, March 26, 2019

आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : अप्पर पोलीस अधीक्षक


जत,(प्रतिनिधी)-
 लोकसभा निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेची कडकपणे अंम लबजावणी करणार आहे. राजकीय पक्षांसह सर्वच घटकांनी पालन करावे; अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी माहिती सांगलीचे अपर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिली.

शिक्षकांच्या 7 व्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत पाठपुरावा करणार


विनायक शिंदे यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
 जिल्हा परिषदेकडील 1 जानेवारी 2016 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांवर सातवा वेतन आयोगामध्ये अन्याय होत आहे, यासह सातव्या वेतन आयोगातील इतर बाबी व त्रुटींबाबत शिक्षक संघ मंत्रालय पातळीवर प्रयत्न करणार असून शिक्षकांचे लाखो रुपयांचे नुकसान वाचवणार आहे, अशी माहिती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिदे यांनी दिली.

जत तालुक्यात भाजपमधील दोन गटांचा वाद चव्हाट्यावर


जत,(प्रतिनीधी)-
 जत तालुक्यात भाजप-शिवसेना महायुतीच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा संयुक्त संवाद मेळावा तालुक्यातील दोन गटांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला होता. आमदार गटाने जिजामाता महिला सभागृहात बैठक आयोजित केली होती; तर दुसर्या गटाने म्हणजेच डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौङा रवी-पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमा नर्सिंग कॉलेज येथे स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. या दोन्ही गटाला खासदार संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी हजेरी लावली. या दोन्ही गटांच्या बैठका संपल्यानंतर सायंकाळी उशिरा दोन्ही गटांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद मिटला नसल्याच समजते.

येळवी सोसायटीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जमदाडे


जत,(प्रतिनिधी)-
 येळवी (ता. जत) येथील येळवी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब जगन्नाथ जमदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष जमदाडे म्हणाले आमचे नेते रेल्वे बोर्डचे पुणे विभागीय संचालक प्रकाश जमदाडे व आर. के. माने यांच्या विश्वासाला पात्र राहून सभासद व संस्थेच्या हिताचा कारभार करू. यावेळी दर्याप्पा जमदाडे, दादासाहेब माने, मच्छिंद्र खिलारे, रामहरी भंडे, सुरेश खिलारे, नितीन माने, ज्ञानेश्वर जमदाडे उपस्थित होते.

आंतरजातीय विवाह लाभार्थीं अनुदानाच्या प्रतीक्षेत


जत,(प्रतिनिधी)-
 केंद्र सरकारचे अनुदान आले नसल्याने जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह अनुदानासाठी पात्र असणारे 180 लाभार्थीं लाभ मिळण्यापासून लटकले आहेत. राज्याचे अनुदान आले आहे. प्रत्येक पात्र लाभार्थी दांपत्याला 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. मात्र केंद्राचे अनुदान उपलब्ध नसल्याने लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

Monday, March 25, 2019

तळ्यात-मळ्यात करणारे अजूनही संभ्रमावस्थेत


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच रंगतदार बनत चालले असून रोज एक नवनवीन राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. भाजपचा उमेदवार निश्चित झाला असला तरी काँग्रेसकडून अद्याप चित्र स्पष्ट करण्यात आले नाही. ही जागा स्वाभिमानीला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातच माजी मंत्री आणि काँग्रेसकडून इच्छूक असलेले प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याने मोठी संभ्रवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे आयाराम-गयाराम लोकांची अडचण झाली आहे. त्यांना कोणता झेंडा हाती घेऊ, कळेनासे झाले आहे.

सोशल मीडियावर तापू लागले राजकीय वातावरण


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच ठिकाणी राजकीय चर्चेला उधाण आलेले आहे.चौकातील किंवा पारावरच्या गप्पांची जागा आता सोशल मीडियाने घेतलेली आहे. सोशल मीडियाची व्यापकता आणि उपयुक्तता पाहता सर्वांनीच राजकीय चर्चेसाठी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळविलेला आहे. राजकीय पक्षांकडून लोकसभेच्या उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत तसतसे राजकीय चर्चांनी सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापत आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


जत,(प्रतिनिधी)-
सध्या जत तालुक्यात भीषण दुष्काळचा सामना करावा लागत आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी व दुष्काळ हद्दपार करण्यासाठी पाणी फौंडेशनच्या वतीने माडग्याळ व उमदी येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. जत तालुक्यात पाणी टंचाई ने नागरिक हैराण झाले आहेत. सर्व तलावे,विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. जनावरांना चारा मिळेना झाला आहे. पाणी व चार्याअभावी पशुपालक चिंतेत आहे. यांचे हाल दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरले पाहिजे.पाण्याची पातळी वाढली पाहिजे, यासाठी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून एकदिवसीय कार्यशाळा उमदी व माडग्याळ येथे घेण्यात आली.

जत तालुक्याला पाणीपुरवठा करणारे टँकर गाठणार शंभरी


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुका हा वर्षनुवर्षे दुष्काळाशी सामना करत दिवस काढत असलेला हा तालुका आहे. या तालुक्यात दरवर्षी किमान शंभर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात सहा महिने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तालुक्यात सध्या 70 गावे व 455 वाड्या-वस्त्यांना सत्तर टँकरद्वारे एक लाख दहा हजार लोकांना प्रतिमाणसी वीस लिटरप्रमाणे पाण्याचा पुरवठा होत आहे. मार्चअखेर 100 पेक्षा जास्त टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याने प्रशासनाची मात्र ऐन लोकसभा निवडणुकीत चांगलीच तारांबळ उडाली आहे.

टँकरने 41 गावांना पाणीपुरवठा करणारा अंकलगी तलाव गाठतोय तळ


जत,(प्रतिनिधी)-
जत पूर्व भागातील 41 गावांना पाणीपुरवठा करणार्या अंकलगी साठवण तलावात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असून झपाट्याने तलावाने तळ गाठण्यास सुरवात केली आहे. भविष्यात जत पूर्वभागात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासनाने आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

दिनकर कुटे यांना डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार


(मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ढाले पाटील  यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना राजे रामराव महाविद्यालयाचे प्रा.दिनकर कुटे)
जत,(प्रतिनिधी)-
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार राजे रामराव महाविद्यालय, जत येथील मराठीचे प्रा. दिनकर कुटे यांना मराठावाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह, 5000 रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते.

Sunday, March 24, 2019

टीव्ही मालिकांत न गुरफटता आपल्या मुलांच्या विकासाकडे लक्ष देण्याची आजची गरज


प्राचार्य बोराडे
जत,(प्रतिनिधी)-
आज काल टी व्ही मालिकांचे पेव फुटले असून पालकवर्ग त्यात गुरफटून गेला असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यामुळे घरातील मुलांच्या संस्कारक्षम आणि विकासात्मक वयात त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब गंभीर आहे. कौटुंबिक मालिका या केवळ मालिकाच असतात. काही खरे नसते त्यात. त्यापेक्षा छ. संभाजी महाराज सारखी एखादी मोजकीच मालिका सहकुटुंब पहा आणि आपल्या पाल्याला स्वाभिमानी बनवा. असे विचार जत येथील रामराव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य वसंत बोराडे यांनी व्यक्त केले.

Friday, March 22, 2019

जत तालुक्यात 65 गावे,455 वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे  टँकरच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. तालुक्यातील ६५  गावे व त्याखालील ४५५ वाड्या वस्त्यावरील सुमारे  एक लाख आठ हजार ८५४ नागरिकांना मानसी वीस लिटर प्रमाणे टँकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. ३१ मार्च अखेरपर्यंत टँकरची संख्या शंभर होण्याची शक्यता जत पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Wednesday, March 20, 2019

कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात केले पाहिजे


उपसंचालक नागेश मोटे
जत,(प्रतिनिधी)-
भारत हा जगामध्ये सर्वात जास्त तरुणांचा  देश आहे. पण या तरुणांच्या हाताला आपण काम दिले पाहिजे. आज देशासमोर बेरोजगारीचे आव्हान आहे. हे बेरोजगारीचे आव्हान पेलायचे असेल तर कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबईचे उपसंचालक  नागेश मोटे यांनी केले.

Tuesday, March 19, 2019

उन्हाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी!

यंदाचा उन्हाळा मोठा भयंकर आहेअजून उन्हाळ्याचे दोन महिने बाकी असताना सूर्य अक्षरशआग ओकत आहेवेधशाळेदेखील यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता व्यक्त केली होतीच,त्यानुसार सध्या त्याचा प्रत्यय येत आहेयंदा सगळीकडे पावसाने समाधान दिले असल्याने विदर्भ,मराठवाडा सोडला राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहेमात्र वातावरणातला बदल उष्णतेची लाट घेऊन येत आहेत्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य असणार आहेसाहजिकच आपल्याला आपल्या शरीराची आणि अवयवांची काळजी करायलाच हवीउन्हाचा पारा चढत चालल्याने त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता अधिक आहेउन्हाळ्यात डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतातत्या दूर ठेवण्यासाठी नागरिकांना उन्हात फिरताना डोळ्यांची काळजी घ्यायला हवी आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक नोकरभरती विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार- काष्ट्राईब महासंघ

 मागासवर्गीयांना डावलून नोकरभरती;आरक्षण धोरणानुसार भरती प्रक्रिया राबवा;मनमानी थांबवा
जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत  होत असलेल्या जम्बो नोकर भरतीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांना डावलून नोकरभरती करण्यात येत आहे. ही भरती  मागासवर्गीय अनुशेष आणि बिंदूनामावलीप्रमाणे  करण्याची मागणी आहे.शिवाय शासनाच्या नोकरभरती संदर्भातील मार्गदर्शक धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने मागासवर्गीय उमेदवारामध्ये तीव्र नाराजी आहे. शासन निर्णय आणि परिपत्रकाचा आदर राखून ही भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी आहे.

पाण्याचे एक भांडे ठेवू अन् दुर्मीळ होणारी चिमणी वाचवू

(जागतिक चिमणी दिवस)
जत,(प्रतिनिधी)-
सध्या दुष्काळ आणि पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. अनेक निरागस निष्पाप पक्ष्यांना यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, तर काहींचा पाण्याअभावी किंवा दूषित पाणी पिऊन मृत्यू होतो. अशा परिस्थितीत पक्ष्यांना पाणी देण्याची जबाबदारी माणसांवरच आहे. आपल्या छतावर किंवा घरासमोर आपण असे पाणी ठेऊन आपल्या निसर्गचक्रातील प्रमुख घटक असलेल्या या पक्ष्यांना दिलासा देऊ शकतो. चला तर मग  आज 20 मार्च जागतिक चिमणी दिनानिमित्त चिऊसाठी एक भांडे पाणी ठेवून तिला वाचविण्याचा संकल्प करू यात.

जतमध्ये परिचारिकेची गळफासाने आत्महत्या

जत,( प्रतिनिधी)-
शेगाव (ता.जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका  उज्ज्वला मच्छिंद्र नेटके ( वय  40) यांनी  घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. घराच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने आत्महत्येची ही घटना उजेडात आली. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. जत पोलिस ठाणे तसेच  घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, उज्वला नेटके यांचा विवाह 20 वर्षांपूर्वी जत येथील शिवाजी खंडागळे यांच्याबरोबर झाला होता. खंडागळे मजुरी करतात.

Monday, March 18, 2019

मतदार ओळखपत्राबरोबरच अन्य दहा पुरावे ग्राह्य धरणार

जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसल्यास संबंधित मतदाराला अन्य दहा प्रकारच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा सादर केला तर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदारांना नवीन रंगीत ओळखपत्र देण्यास सुरुवात केली आहे.

बेलगाम झालेल्या समाजमाध्यमांवर करडी नजर


जत,(प्रतिनिधी)-
फेसबुक, व्हॉटस्अप, ट्विटरसारखी समाजमाध्यमे हे राजकीय प्रचाराचे जालीम हत्यार होऊ शकते हे सिध्द झाले आहे. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये समाजमाध्यमांवरही आचारसंहिता लागू होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. बेलगाम झालेल्या समाजमाध्यमांना वेसण घालण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल ठरावे. समाजमाध्यमांवरून होणार्या प्रचारासाठी गुगल, फेसबुक आदींनी राजकीय मजकुरासाठी नियमावली तयार केली आहे. या माध्यमांवर जाहिरात करणारा मजकूर टाकताना व त्यासाठी खर्च करताना राजकीय प्रतिनिधींना वेगळे खाते ठेवावे लागणार आहे.त्यामुळे राजकीय लोकांना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे.

आचारसंहिता कक्षेतून चारा छावणी वगळर


जत,(प्रतिनिधी)-
संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षेतून चारा छावण्यांचा विषय वगळून त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी जत तालुक्यातून होत आहे.

Sunday, March 17, 2019

संत निरंकारी मंडळातर्फे वळसंग येथे पाणपोई सुरु


जत,(प्रतिनिधी)-
संत निरंकारी मंडळ  शाखा जत व महादेव पाटील यांच्या सहाय्यातून वळसंग येथे पाणपोईचे उदघाटन  संत निरंकारी मंडळाचे सेवादल संचालक संभाजी साळे यांचे हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी मंडळाचे सुभाष माने,जगन्नाथ केंगार, महादेव पाटील आदी तसेच संत मंडळी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

येळवीत युथ फेस्टिवलचे आयोजन


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील येळवी येथील सावली फौंडेशनच्यावतीने येळवी युथ फेस्टिवल 2019 चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलमध्ये 27 मार्चला युथ टॅलेंट सर्च परीक्षा तर 31 मार्चला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात येळवी मॅरेथॉन यशवंतांची गौरवगाथा, मान्यवरांचे मार्गदर्शन, बक्षीस वितरण आणि माँ तुझे सलाम या सांस्कृतिक अशा कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आल्याची माहिती सावली फौंडॅशनचे अध्यक्ष सुनील साळे आणि सचिव प्रकाश गुदळे यांनी दिली.

Thursday, March 14, 2019

ऋतुरंग काव्यसंग्रह म्हणजे निसर्गाचा लेखाजोखा

प्रकाशन सोहळ्यात इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांचे उद्गार
जत,(प्रतिनिधी)-
शेगाव (ता. जत) येथील कवी, लेखक महादेव बी. बुरुटे यांच्या बहुचर्चित आणि निसर्गप्रेमी काव्यरसिकांच्या पसंतीस उतरलेल्या 'ऋतुरंग' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पुणे जिल्ह्य़ातील सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात व्यंकोजीराजांचे तेरावे वंशज तंजावर येथील युवराज संभाजीराजे भोसले आणि इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांच्या हस्ते झाले.

मानव हाच भारतीय राज्यघटनेचा केंद्रबिंदू:प्राचार्य डॉ.ढेकळे

जत,(प्रतिनिधी)-
भारत हा  जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. या देशाच्या लोकशाहीच्या केंद्रस्थानी राज्यघटनाच आहे आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू हा मानव असून भेदाभेद अमंगळ हीच शिकवणूक भारतीय राज्यघटना देते. राज्यघटना ही भारतीय लोकशाहीचा आत्मा असून त्यांचे  संरक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.व्ही.एस.ढेकळे यांनी केले.

Wednesday, March 13, 2019

राज्यात गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्के कमी जलसाठा


जत,(प्रतिनिधी)-
उन्हाळा हंगाम सुरू झाला असून राज्यातील सर्व लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 32.18 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. जो गतवर्षीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी आहे. अनेक तलाव आणि मध्यम प्रकल्पांनी तळ गाठला आहे तर बहुतांश तलाव पाण्याअभावी कोरडे पडले आहेत.

उष्णता वाढल्याने डेर्‍यांची मागणी वाढली


जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने तहान भागविण्यासाठी बाजारपेठेत मातीपासून तयार केलेल्या डेर्यांची मागणी वाढली असून याच्या किमतीनीही गतवर्षी पेक्षा भाव खाल्ला आहे.
मागील काही दिवसापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून बाजारपेठेत गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेले डेरे विक्रीस येत आहेत. जत तालुक्यात मडकी तयार करून विकणारे कुंभार कुटुंब कमी आहेत. या कुटुंबाणी आपल्या कुटुंबाची मदत घेत मोठ्या प्रमाणात डेरे तयार केले आहेत. सध्या डेरे तयार करण्यासाठी माती जतमध्ये उपलब्ध नसल्याने ती पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथून आणून डेरे तयार करत आहेत. वाहतुकीचा खर्च वाढल्याने याचा परिणाम डेर्यांच्या किमतीवर होत आहे. तीन ब्रास मातीमध्ये 2 हजार डेरे तयार होतात. सध्या बाजारातील एका डेर्याची किंमत दीडशे ते अडीचशे रूपयापर्यंत आहे. यामधून नैसर्गिकरीत्या थंड पाणी मिळत असल्यामुळे ग्राहकांचा खरेदी करण्याकडे ओढा जास्त आहे. फ्रीजमधील थंड पाणी पिल्यानंतर याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याने ग्रामीण भागात डेर्याला दुसरा पर्याय नाही.

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच येणार उमेदवारांची छायाचित्रे


जत,(प्रतिनिधी)-
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. लोकसभा मतदारसंघासाठी दुसर्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच मतपत्रिकेवर उमेदवारांचे पासपोर्ट फोटो छापण्यात येणार असल्याची माहिती राज्यातल्या विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.

आचारसंहिता काळात तरी अवैध व्यवसाय रोखा


जत,(प्रतिनिधी)-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात पोलीस प्रशासनाचे सर्वच राजकीय हालचालींकडे बारीक लक्ष असले तरी अवैध व्यवसायाकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा आहे. अवैध व्यवसायाच्या निमित्ताने काही वाद होण्याची भीती असते आणि याचा परिणाम निवडणुकीवर होण्याचीही शक्यता असते. हे सर्व होऊ नये यासाठी या काळात तरी पोलिसांनी अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवावे, अशी जतकरांची अपेक्षा आहे.

निवडणूक आचारसंहितेचे तंतोतंत पालन करा : तुषार ठोंबरे


जत,(प्रतिनिधी)-
 निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली असून या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आदेश तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. जत विधानसभा क्षेत्रातील सर्वपक्षीयांच्या उपस्थितीत आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत प्रांत ठोंबरे बोलत होते.

Sunday, March 10, 2019

जिल्हा परिषद शिक्षकांची आता तीन वर्षे बदली नाही


जत,(प्रतिनिधी)-
शासनाने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणात शुद्धिपत्रक काढत बदलीपात्र शिक्षकांच्या व्याख्येत बदल केला असून त्यानुसार सर्वसाधारण क्षेत्रात सलग 10 वर्षे मात्र सध्याच्या शाळेत तीन वर्षे सेवा झालेले शिक्षक यंदा बदलीस पात्र ठरणार आहेत. यामुळे मागील वर्षी मोठ्याप्रमाणात बदली झालेल्या शिक्षकांची आता पुढील तीन वर्षे बदली होणार नाही.

कडबा विक्रीला बंदी घालण्याची मागणी


दुष्काळामुळे जनावरांच्या चार्याची होतेय हेळसांड
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने तालुक्यावर दुष्काळाची गडद छाया असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जत तालुक्यात प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर ज्वारीचे पीक घेतले जात असल्याने मोठ्या प्रमाणात जनावरांना चारा उपलब्ध होत असे. मात्र, यंदा ज्वारीची पेरणी नसल्याने तालुक्यात चार्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, दुष्काळजन्य परिस्थितीत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चारा विक्रीला व्यावसायिक नेत असल्याने यावर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.

सोलापूरसाठी 18 तर माढ्यासाठी 23 एप्रिलला मतदान


सोलापूर,(प्रतिनिधी)-
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून यात दुसर्या टप्प्यात माढा मतदारसंघासाठी 18 एप्रिलला तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. ही निवडणूक शांततेत व मुक्त वातावरणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

धनगर समाजाची सरकारने केली फसवणूक : प्रकाश शेंडगे

जत,(प्रतिनिधी)-
धनगर समाजाला आदिवासीचे आरक्षण मिळवण्यासाठी धनगर व धनगड जमात एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. मात्र, सरकार न्यायालयात राज्यात धनगड आदिवासी जमात अस्तित्वात नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. धनगर आरक्षण प्रश्न न्यायालयात लटकविण्याचा डाव आहे. सरकारने धनगर समाजाची घोर फसवणूक केली आहे, असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जत येथे बोलताना केला

Saturday, March 9, 2019

जतमध्ये महिलांना छत्री वाटप


जत,(प्रतिनिधी)-
 जत येथे विक्रम फाउंडेशनच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त बाजार पेठेतील महिलांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जि. . बँकेचे संचालक विक्रमसिंह सावंत, पंचायत समिती गट विकास अधिकारी अर्चना वाघमळे, विनोद सावंत,नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवर,नगरसेविका गायत्रीदेवी सुजय शिंदे,अश्विनी माळी,विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज बाळ निकम,उपाध्यक्ष राजेंद्र माने,वर्षा सावंत,मिनल सावंत, मीरा शिंदे, प्राची जोशी, विजया बिज्जरगी, गीता सावंत, जोती घाटगे, निलम थोरात, नीता मालानी, भारती तेली, महिला उपस्थित होत्या.

रँडम राऊंडमधील शिक्षकांना दिलासा


सांगली,(प्रतिनिधी)-
 सांगली जिल्हा परिषदेकडील ज्या शिक्षकांची रँडम राऊंडमध्ये बदली झाली होती अशा शिक्षकांची सोईच्या ठिकाणी नियुक्ती करण्यासाठी संबधित शिक्षकांकडुन विकल्प घेण्यात आले. लवकरच समुपदेशाने या शिक्षकांना सोईची शाळा देण्यात येणार असुन अनेक दिवसांची या शिक्षकांची अडचण दुर होणार आहे. सुमारे 231 शिक्षकांना याचा लाभ होणार आहे.

नविन शिक्षक भरतीपूर्वी पदोन्नतीचा विषय मार्गी लावणार


सीईओ राऊत यांचे शिक्षक संघ शिष्टमंडळास आश्वासन
जत,(प्रतिनिधी)-
 नविन शिक्षक भरतीपूर्वी पदोन्नती देण्यात येईल असे आश्वासन सीईओ अभिजित राऊत यांनी दिल्याची माहीती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिदे व सरचिटणीस अविनाश गुरव यांनी दिली. सांगली जिल्हा परिषदेकडील ज्या शिक्षकांची रँडम राऊंडमध्ये बदली झालेली आहे अशा शिक्षकांना समुपदेशनाने सोयीच्या शाळा मिळाव्यात अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने केली.

बेपत्ता बालिकेचा विहिरीत मृतदेह


जत,(प्रतिनिधी)-
 वज्रवाड (ता. जत) येथील अक्षरा सिदधया मठपती ही नऊ वर्षांची चौथीत शिकणारी शाळकरी मुलगी गुरुवारी सकाळी अचानक गायब झाली होती. तिच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र तिचा मृतदेह शनिवारी सकाळी एका विहीरीत सापडल्याने परीसरात एकच खळबळ माजली. घटनास्थळी जत पोलिसांनी धावले. त्यांनी दुपारपर्यंत अक्षराचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरीय तपासण्यासाठी मिरज येथील सिविल हॉस्पिटल ला पाठवला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

वाहनाच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार


जत,(प्रतिनिधी)-
कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे शाळेतून घरी जात असताना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने शाळकरी मुलगा विनोद आकाराम दुधाळ (वय 11, मूळ गाव देवनाळ, ता. जत, सध्या रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) हा ठार झाला आहे. हा अपघात काल शनिवारी सकाळी साडे अकरा च्या सुमारास झाला.

मुख्यमंत्र्यांची 65 गावांसाठी प्रस्तावीत म्हैसाळ विस्तारीत प्रकल्पास तत्वतः मान्यता


खासदार संजय पाटील
 सांगली,(प्रतिनिधी)-
 सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील 65 गावांचा समावेश असलेल्या म्हैसाळ सिंचनच्या विस्तारित प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार संजय पाटील यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली. पाटील म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळू शकणारी, पण योजनेत समाविष्ट नसलेली 48 गावे आणि सुधारित प्रस्तावीत मान्यतेमध्ये समाविष्ट असलेली 17 अशी एकूण 65 गावे म्हैसाळ योजनेच्या विस्तारित प्रकल्पात समाविष्ट केली आहे. हा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्यांनी अहवालाची पाहणी करून त्यास तत्वत: मान्यता दिली.

सर्व आमदार,पक्षाचे पदाधिकारी माझ्यासोबत:खासदार पाटील


सांगली,(प्रतिनिधी)-
 विकास कामाचा डोंगर उभा केलेला असताना माझ्या विरोधात भाजपमध्ये संशयास्पद वातावरण केले जात आहे. अशा कुरघोड्या करणार्यांच्या खोलात जावून माहिती घेऊ असे कृष्णा खोरे विकास महा- मंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. मी आयुष्यात कोणाच्या मागे लागलो नाही. कोणी कोटी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची फिकीर केली नाही. मी विकासकामाचे ध्येय ठेवून काम केले, त्यावरच उभा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय पाटील यांच्या विरोधात पक्षात अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध, नाराजी सुरू आहे. याबद्दल विचारता ते म्हणाले, तसे काही नाही. सर्वच आमदार, पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. त्यातून जरी कोणी कार्यकर्ते संशयास्पद वातावरण करीत असेल तर त्याच्या खोलात आता जावेच लागेल, असेही ते म्हणाले.

Friday, March 8, 2019

सर्व क्षेत्रात विद्यार्थी परिपूर्ण असावा :तुकाराम महाराज


जत,(प्रतिनिधी)-
 आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहता कामा नये. त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. येळवी येथील कृष्णप्रकाश गुरुकुल करिअर अकॅडमीने केलेली ही सुरुवात आदर्शवत आहे. ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, तसेच मातृपितृसेवेसोबत आध्यात्मिक ज्ञानदान ही काळाची गरज असून सर्व क्षेत्रात विद्यार्थी परिपूर्ण असावा, असे प्रतिपादन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांनी केले.