सांगली,(प्रतिनिधी)-
शाळा सोडल्याचे
बनावट दाखले देणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी पकडली. या टोळीमध्ये माजी शिक्षकाचा समावेश आहे. टोळीकडून तासगाव
तालुक्यातील चिंचणी येथील डी. के. पाटील
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नावे बनावट दाखले, शिक्के, गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी त्या विद्यालयाचा माजी
शिक्षक किरण गणपत होवाळे (वय 42, रा.
सरस्वतीनगर, वासुंबे ता. तासगाव), अशोक किसन इंगळे (वय
30), हणमंत तिमाप्पा गोल्लार (वय 25) दोघेही रा. संजय गांधी झोपडपट्टी, सांगली), बशीर बाळू मुल्ला (वय
38, वडर कॉलनी, सांगली) या
चौघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान,
सांगलीतील आणखी एका संशयिताचा शोध घेत पोलिस गेल्यानंतर संबंधिताने अंगावर
गरम पाणी ओतून घेतल्याची चर्चा आहे. तासगाव तालुक्यातील चिंचणी
येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयाचा माजी शिक्षक किरण होवाळे हाच हे रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे आली
आहे. 10 ते 15 हजार रुपयांच्या मोबदल्यात
तो शाळा सोडल्याचा दाखल देत होता. त्याच्याकडे यशवंत हायस्कूल,
तासगाव आणि चिंचणी येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अशा दोनशाळांचे शाळा सोडल्याचे बनावट
दाखले, बनावट मार्कलिस्ट, बनावट शिक्के
मिळाले आहेत. तो गरजू ग्राहक शोधून त्यांना शाळांचे बनावट दाखले
तयार करुन देत होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत
पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांचे पथक तासगाव परिसरात
गस्त घालत असताना पथकाला होवाळे याच्या कारनाम्याची माहिती मिळाली. होवाळे याने तासगाव येथील कॉलेज कॉर्नर जवळ एका ग्राहकाला बोलावले होते.
त्याला बनावट दाखल्यावर शिक्के मारून त्यावर बनावट सही तो देणार होता.
या माहितीच्या आधारे पथकाने त्या परिसरात सापळा लावला. संशयित होवाळे हा काही जणांबरोबर बोलत थांबल्याचे पथकाच्या लक्षात आले.
पथकाने त्या सर्वांनाच ताब्यात घेवून त्यांची चौकशी केल्यानंतर बनावट
दाखल्याचे प्रकरण उघडकीस आले. बनावट दाखले, शिक्के, मार्कलिस्टसह पथकाने होवाळे, अशोक इंगळे, बशीर मुल्ला, हणमंत
गोल्लार या चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी संशयितांवर तासगाव
पोलिसात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment