Friday, December 28, 2018

लोकसभेपूर्वी शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची मागणी


सांगली,(प्रतिनिधी)-
 लोकसभेपूर्वी शिक्षक भरती करून नियुक्तिपत्रे देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याबाबत सुरू असणारे काम पाहता ही प्रक्रिया पूर्ण होईल का, याबाबत शंका निर्माण होत आहे. ’पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही. प्रत्यक्षात बिंदूनामावलीसह अनेक प्रक्रिया प्रलंबित असल्याने प्रशासनाने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आले.

 जिल्ह्यातील डीएड, बीएडधारक तरुणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्यासह अधिकार्यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. अर्जुन सुरपल्ली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत भरतीची मागणी केली. शिक्षणसेवकांची भरती झालेली नाही. दरवर्षी डीएड, बीएडधारक तरुण शिक्षण घेऊन बाहेर पडत असताना व शिक्षकांच्याही जागा रिक्त असताना त्यावर कार्यवाही होत नसल्याने तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. प्रथम टीईटी व त्यानंतर अभियोग्यता चाचणीची अट घालूनही अनेक तरुणांनी या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भरतीची घोषणा करण्यात आली असलीतरी रिक्त जागांच्या तपशिलांवरून अस्वस्थता कायम आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळांतील सर्व रिक्त जागांवरपवित्र पोर्टलमार्फत जागा भरण्यात याव्यात व त्यास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शंभर टक्के रिक्त पदांची माहितीपवित्र पोर्टलवर भरण्यात यावी, बिंदूनामावली दिलेल्या मुदतीत अद्यायवत करून पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच रिक्त जागापवित्र पोर्टलवर अपलोड केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील सहावी ते आठवी वर्गासाठी विषय शिक्षकांची रिक्त पदे अपलोड करण्यात यावीत, यासह दिलेल्या मुदतीत भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment