Friday, November 30, 2018

विद्यार्थ्यांना सरसकट लाभ देण्याची मागणी


दुष्काळग्रस्त एसटी बस पास योजना
बिळूर:
दुष्काळ पास सवलत योजने अंतर्गत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना याचा लाभ द्यावा, अशी मागणी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहन मानेपाटील यांनी केली आहे. प्रथम सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी एसटी बसचे पास काढले नाहीत ते विद्यार्थी या योजनेपासून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना आता दुष्काळग्रस्त विद्यार्थी मोफत पास योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यांचाही या योजनेत समावेश करावा अशी मागणी श्री.मानेपाटील यांनी आगाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विवाहितेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू


पुणे,(प्रतिनिधी)-
हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून घटस्फोट देण्यासाठी तिच्या शरीरात डॉक्टर पतीने चक्क एचआयव्ही या जीवघेण्या आजाराचे विषाणू सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येळवी तलावात पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील: प्रकाश जमदाडे


जत,(प्रतिनिधी)-
 येळवी (ता. जत) येथील तलावातम्हैसाळचे पाणी सोडावे म्हणून कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या दहा दिवसांत येळवी भागात पाणी दाखल होणार असल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रकाश जमदाडे यांनी दिलीपाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणी गावाजवळील परिसरात आल्याने शेतकरी जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गुड्डापूर यात्रेत देवस्थानला पाणी पुरवठा करणे कसरतीचे ठरणार


दुष्काळामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील गुड्डापूर येथे दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. चार दिवसांवर आलेल्या यात्रेमुळे देवस्थानला पाणी पुरवठा करणे कसरतीचे ठरणार आहे. गावात व वाडी-वस्तीवर पाणीटंचाई प्रकर्षाने जाणवते आहे.
 ग्रामपंचायतीने टँकर मागणीचा प्रस्ताव तहसीलदार कार्यालयास यांना दिला आहे; मात्र अजून टँकर दिलेला नाही.

गोबर, रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज नको : अभिजित राऊत


सांगली : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्हाभरात सध्या गोवर, रूबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. यामध्ये काही ठिकाणी मुलांमध्ये आरोग्यविषयक किरकोळ लक्षणे दिसून आलेली आहेत. मात्र ही लक्षणे निदर्शनास येणे नैसर्गिक आहे. त्यामुळे या लसीकरणाबाबत गैरसमज न करून घेता, याबाबतची माहिती घेणे उचित ठरणार असून पालकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

माडग्याळमध्ये नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद


जत,(प्रतिनिधी)-
 माडग्याळ (ता. जत) येथील शिवसेना प्रणीत युवासेनाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबीर शेतकरी कट्टा व महादेव मंदिर या ठिकाणी घेण्यात आले. याला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 250 रुग्णांची यावेळी तपासणी करण्यात आलीमोफत नेत्र तपासणी शिबिरास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून प्रारंभ करण्यात आला. युवासेना माडग्याळ यांच्यावतीने बुधवारी सकाळी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

पालकांनी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्यावेत:अपर्णा नाईक


जत,(प्रतिनिधी)-
 आज चांगल्या शिक्षण आणि संस्काराची गरज आहे. या पिढीवरच देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन समुपदेशनतज्ज्ञ अपर्णा नाईक (पुणे) यांनी जत येथील अल्फोंसा स्कूल येथे समुपदेशन कार्यक्रमात बोलताना केले. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थी व पालकांच्यासाठी अपर्णा नाईक यांचे समुपदेशन घेण्यात आले.

शेगाव, मालगावमधील गुन्हे हंगामी दरोडेखोरांच्या टोळीकडून


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील शेगावसह कुकटोळी येथील दरोड्यातील गुन्हेगारांच्या दिशेने पोलिसांचा तपास निघाला असून हे गुन्हे एकाच टोळीने केले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा करण्याची पध्दत एकच आहे. याच पध्दतीने मिरज तालुक्यातील मालगाव परिसरातही दरोड्याचा गुन्हा घडला असून ही हंगामी दरोडेखोरांची टोळी असावी, लवकरच गुन्हेगार पोलिसांच्या हाताला लागतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

जतला ज्ञानेश्वर व्याख्यानमाला सोमवारी 3 पासून

जत,(प्रतिनिधी)-
जत येथील रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्ञानेश्वर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून व्याख्यानमाला सोमवारी ता.3 ते बुधवार ता.5 डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत होणार आहे, जतवासियांनी लाभ घ्यावा , असे आवाहन मुख्याध्यापक व्ही. पी. बोराडे यांनी दिली.

Thursday, November 29, 2018

'शिक्षक भारती'चे धरणे आंदोलन स्थगित

गटशिक्षणाधिकारी यांचे लेखी आश्वासन
जत,(प्रतिनिधी)- 
जत तालुका प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्यावतीने  जत पंचायत समितीसमोर प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी १ डिसेंबर रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र याची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब जगधने यांनी संघटनेशी चर्चा करून शिक्षकांचे प्रश्न मुदतीत सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले.

जतमध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम


जत,(प्रतिनिधी)-
 महात्मा जोतिराव फुले यांच्या 128 व्या स्मृतिदिनानिमित बहुजन समाज पार्टी जतच्या वतीने जत शहरात कार्यकम घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते किरण शिंदे, जितेंद्र सुर्वे, बी. पी. बुद्धसागर विधानसभा प्रभारी महादेव कांबळे, विधानसभा अध्यक्ष तानाजी व्हनखंडे, महासचिव शरद शिवशरण, मेसू काटे, रोहन साळे, दीपक कांबळे, कुमार कोळी, राजू ऐवळे, बादल सर्जे, संतोष साबळे, कुमार सुर्वे, जगन्नाथ कांबळे,

राजाभाऊ सरवदे यांचा सत्कार


जत,(प्रतिनिधी)-
 महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदी सोलापूर येथील रिपाइंचे नेते राजाभाऊ सरवदे यांची निवड झाल्याबद्दल जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संजय कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे म्हणाले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यामुळेच हे महामंडळ मिळाले असून या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मागासवर्गीय युवकांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा करून त्यांना त्यांच्या पायावर ती आर्थिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

‘लाचलुचपत’च्या छाप्याने जत पोलीस ठाणे बदनाम


जत पोलिस ठाणे स्वच्छ करण्याची आवश्यकता; आतापर्यंत चार पोलिस अधिकारी जाळ्यात
जत,(प्रतिनिधी)-
जत पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे याच्यावर सांगली येथील लाचलुचपत कार्यालयातील अधिकार्यांनी छापा टाकून त्याला परवा पोलीस ठाण्यातच जेरबंद केले. या घटनेने पुन्हा एकदा पोलीस ठाणे बदनाम झाले आहे. यापूर्वी तीन पोलिस अधिकार्यांना लाचलुचपतने आपल्या जाळ्यात ओढले होते. खाबुगिरीने जत पोलिस ठाणे संपूर्ण सांगली जिल्ह्यात कुप्रसिद्ध पावले आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी जत पोलिस ठाणे स्वच्छ करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.

बेडगमध्ये पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस


जत,(प्रतिनिधी)-
मिरज तालुक्यातील बेडग येथील अर्जुन मारुती सन्नके यांनी आपल्या दुकानाशेजारी सन 2013 मध्ये पिंपळाचे झाड लावले होते. त्या रोपांचा आता वृक्ष तयार झाला आहे. स्वत: च्या मुलाचे आपण संगोपन करतो, त्याप्रमाणे त्यांनी झाडाचा सांभाळ केला आहे. आपण आपल्या मुलांचा वाढदिवस ज्याप्रमाणे साजरा करतो, त्याचप्रमाणे त्यांनी त्या पिंपळाच्या वृक्षाचा सहावा वाढदिवस गुरुवारी साजरा केला.

व्हसपेठमध्ये घरातील गँसचा स्फोट,दोन लाखाचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील व्हसपेठ येथील शिवाजी मनू गायकवाड यांच्या घरातील गॅसचा स्फोट होऊन सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.अचानक झालेल्या स्फोटामुळे गायकवाड कुंटुबिय बेघर झाले आहेत.  स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

एक लाखाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा


जत,(प्रतिनिधी)-
शहरातील राज हाॅटेलमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांने जेवण्यासाठी आलेल्या एकाची आॅनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्याच्या माध्यमातून एक लाखाची फसवणूक केली आहे. सचिन बसवंत बामणे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत बामणे यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सोन्याळमध्ये पाण्यासाठी घागर मोर्चा


जत,(प्रतिनिधी)-
वार्ताहर सततची पाणीटंचाई, सत्ताधार्यांची नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराला कंटाळलेल्या सोन्याळ (ता. जत) येथील संतप्त नागरिकांनी गुरुवारी सकाळी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून सत्ताधार्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. सुरळीत आणि पुरेसा पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोन्याळ गावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सोन्याळ गावासाठी दोन पाणीयोजना अस्तित्वात आहेत. पैकी गावातील जुन्या विहिरीला पाणी नसल्याने आता ही योजना बंद आहे.

बेदाण्याला मिळाला 243 रुपयांपर्यंत चढा दर


सांगली,(प्रतिनिधी)-
दिवाळीपूर्वी बेदाणा दरात झालेली घसरण दिवाळीनंतरच्या पहिल्याच सौद्यात वाढली आहे. काल सांगली मार्केट यार्डात बेदाणा सौदे पार पडले. बेदाण्याला 243 रुपयांपर्यंत दर मिळाला. दरम्यान, बेदाण्याचे पेमेंट वेळेत न करणार्या (हिशोब चुकता न करणार्या) 15 व्यापार्यांवर बॅन आणण्याचा निर्णय सांगली तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला. मार्केट यार्डात दिवाळीनंतर पहिलाच बेदाणा सौदा झाला. सांगली मार्केटमध्ये 15 गाड्यांमधून 150 टन बेदाणा आवक झाली. पहिल्याच सौद्यामध्ये बेदाण्यास चढा भाव मिळाला.

संदीप मोटे ठरला जत अजिंक्यतारा केसरीचा मानकरी


 जत,(प्रतिनिधी)-
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व सांगली जिल्हा तालीम संघ व अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कंठी (ता. जत) येथील संदीप मोटे यांनी जत अजिंक्यतारा केसरीचा मानकरी ठरला असून त्याची महाराष्टृ केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खासदार संजय पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

जुन्या पेन्शनसाठी शिक्षक समितीचे 1 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन

जिल्हा उपाध्यक्ष डी. एम. कट्टीमनी यांची माहिती 
जत,(प्रतिनिधी)-
नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन (डीसीपीएस) व राष्ट्रीय निवृत्ती वेतन (एनपीएस) योजना बंद करून जुनी पेन्शन योजना राबविण्यात यावी ,या व अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष डी. एम. कट्टीमनी यांनी दिली.

Wednesday, November 28, 2018

कोळगिरीत शेतकऱ्याची आत्महत्या


जत,(प्रतिनिधी)-
कोळगीरी (ता. जत) येथील शिवाजी सिद्धाप्पा पुजारी (वय 50) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवाजी यांचा मुलगा सिद्धाप्पा शिवाजी पुजारी यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

डॉ. अशोक खाडे यांना सांगली भूषण पुरस्कार जाहीर


जत,(प्रतिनिधी)-
 विश्वजागृती मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा सांगली भूषण पुरस्कार यावर्षी प्रसिध्द उद्योगपती, दास कंपनीचे सर्वेसर्वा डॉ. अशोक दगडू खाडे यांना जाहीर करण्यात आला. 25 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करा : जिल्हाधिकारी काळम


सांगली,(प्रतिनिधी)-
 अपंग घटकांतील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. अभिनव संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबवून शाळा, महाविद्यालयांनीही 3 डिसेंबर रोजी अपंग दिनी दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिले.

जतमध्ये गोवर, रुबेला लसीकरणाबाबत फेरी


जत,(प्रतिनिधी)-
 जत शहरात गोवर, रुबेला लसीकरणाबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन लायन्स क्लबचे संस्थापक डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आले. गोवर व रुबेला हा प्राणघातक रोग आहे. त्याचा प्रसार विषाणूद्वारे होतो. ‘सदृढ बालक - सशक्त निरोगी भारतकरिता 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना लस टोचून घ्यावी, असे यावेळी आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्र पोलिसोमुक्त झाला आहे. त्याच धर्तीवर गोवर व रुबेलामुक्त महाराष्ट्र करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यास हातभार लावावे, असे आवाहन डॉ. आरळी यांनी केले. गोवर, रुबेला जनजागृती फेरीत उमा नर्सिग कॉलेज, एस. आर. व्ही. एम. कॉलेज, सिध्दार्थ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शहरात घोषणा देत फेरी काढली. यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. डी. जी. पवार, डॉ. हेमा क्षीरसागर, डॉ. अभिजित पवार, भगवान पवार उपस्थित होते.

शिक्षक भारतीचे शनिवारी धरणे आंदोलन


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुका शिक्षक भारती संघटना ही शिक्षकांच्या प्रश्नाच्या मागणीसाठी शनिवार, दि. 1 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा जत तालुकाध्यक्ष अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी गटशिक्षणाधिकार्यांना निवेदनाद्वारा दिला आहेजत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक भारतीच्या जत शाखेकडून शिक्षण विभागास यापूर्वी निवेदने देण्यात आली होती.

जिल्हा बँकेतही मिळणार अण्णासाहेब पाटील महामंडळाची कर्ज


जत,(प्रतिनिधी)-
 शेतकर्यांची, सामान्यांची बँक म्हणून ओळख असणार्या जिल्हा बँकेने ग्रामीण भागातील; तसेच शहरातील तरुणांसाठी प्रगतीच्या वाट खुल्या करणारे पाऊल टाकले असून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मंजूर लाभार्थींना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tuesday, November 27, 2018

तरुण कारागिराला मारहाण; तहसील कार्यालयावर मोर्चा

जत,(प्रतिनिधी)-
 बिळूर ( ता. जत ) येथील सलून कारागिरांना मारहाण  करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करावी व त्यांच्या विरोधात  कायदेशीर कारवाई करावी आणि  सलून कारगिराना संरक्षण मिळण्यासंदर्भात कायदा करावा यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा या प्रमुख मागण्यांसह इतर विविध मागण्यासाठी व्यवसाय बंद ठेवून तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने जत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

चार तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्यात येणार

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील  म्हैसाळ  उपसा जलसिंचन योजनेच्या मायथळ ( ता.जत ) येथील मुख्य कालव्यातून संख ,  गुड्डापूर , तिकोंडी व सिद्धनाथ तलाव भरून घेण्याच्या योजनेला राज्याचे जलसंपदा व जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी तत्त्वतः मान्यता देऊन या कामाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे . या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ शिवसेना जत  तालुका प्रमुख अंकुश हुवाळे व जिल्हा उपप्रमुख तम्मा  कुलाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुष्काळ संकट नव्हे संधी;तातडीने उपाययोजना करण्याची मागणी


रोजगार व परिसर विकास करण्याची नामी संधी
 जत,(प्रतिनिधी)-
राज्यात निम्म्यापेक्षा जास्त तालुक्यांमध्ये पावसाअभावी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या संकटाशी सामना करण्याचा प्रयत्न होत असला तरी तो फारच अपुरा आहे. दुष्काळ हे संकट नसून संधी आहे. यानिमित्ताने परिसरातील लोकांना रोजगार आणि विकास करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने वेळ न दवडता या संधीचा उपयोग करायला हवा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

जत शहरातील विवाहितेचे अपहरण


 जत,(प्रतिनिधी)-
मुलीशी जबरदस्तीने विवाह करण्यासाठी विवाहित महिलेचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना जत शहरात घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने प्रशांत प्रकाश पाटील याच्यासह एका अनोळखी युवकाविरोधात जत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भरतीच्या दिरंगाईमुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी


जत,(प्रतिनिधी)-
 राज्य सरकारने प्राध्यापक भरतीचा निर्णय नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाहीर केला आहे,मात्र हा निर्णय जाहीर करून महिना उलटत आला तरीही भरती सुरू झाली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 3 नोव्हेंबरला प्राध्यापक भरतीचा निर्णय जाहीर केलायात विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी 40 टक्के जागांवरील भरतीला मान्यता दिली आहे

जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीवर निर्बंध


ग्रामविकास खात्याचा आदेशराज्यात 9500 उमेदवार प्रतीक्षेत
जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण होईल,त्यावेळी अनुकंपाची पदे जिल्हा परिषदेत भरण्यात यावीतअसा निर्णय घेण्यात आला आहेत्यामुळे साहजिकच अनुकंपा भरतीच्या प्रतीक्षेत असणार्या हजारो उमेदवारांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वास्तविक राज्यातल्या 34 जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या अनुकंपा भरतीसाठी 9 हजार 500 उमेदवार प्रतीक्षा यादीत आहेत.

जतचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात


जत,(प्रतिनिधी)-
जत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन वसंत कांबळे हे 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहेजत तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने तक्रार दिल्यानुसार सापळा रचून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले. या तक्रारदार सदस्याची एका सोलर कंपनीच्या मध्यस्थामार्फत फसवणूक झाली होती.

Monday, November 26, 2018

जतमध्ये वृक्षलागवडीचा फज्जा


जत,(प्रतिनिधी)-
तासगाव तालुक्यात 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुमारे 50 हजार झाडे लावली, मात्र अजूनही तालुक्यात हजारो खड्डॅ वृक्षारोपनाविना रिकामेच पडले असल्याचे चित्र दिसत आहे. झाडे लावायची नव्हती तर हे खड्डे का काढले, कोणी काढले, याचे उत्तर कोणाकडेच नाही.हजारो खड्डे काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला याला जबाबदार कोण? हा निधी नक्की कोणाचा आणि किती हेही समजू शकत नाही.

ग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टीत वाढणार


जत,(प्रतिनिधी)-
ग्रामपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. या आधी मालमत्ता कराची आकारणी क्षेत्रफळाच्या आधारे केली जात होती. 2015-16 नंतर ती भांडवल गुंतवणुकीच्या आधारे केली जाऊ लागली आहे. चार वर्षांच्या पहिल्या टप्प्यानंतर आता नव्याने मूल्यांकन होणार असून त्यामुळे बहुतांश मालमत्तांची करवाढ होणार आहे. काही जुन्या घरांना कर घसरणीचा लाभ होऊ शकतो. एप्रिल 2019 पासून नवे कर लागू होतील.

उमदीला एसटी आगाराची स्थापना करण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
जतपासून तब्बल साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि राष्ट्रीय महामार्ग जात असलेल्या उमदी (ता.जतया गावात एसटी आगाराची स्थापना करून अद्ययावत बसस्थानक उभारण्याची मागणी प्रवाशी वर्गांतून होत आहे.

राजे रामराव महाविद्यालयात संविधान दिन साजरा


(संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात घटनेच्या सरनाम्याचे वाचन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एस.ढेकळे व प्राध्यापक.)
 जत,(प्रतिनिधी)-
संविधान हे भारतीय जनतेचे दीपस्तंभ असून भारतीय जनतेचा जगण्याचा आधार आहे. आपण 21 व्या शतकात वावरत असताना माणसांच्या मनातील जात आणि धर्म नष्ठ होत नाही. हे आपल्या भारतीयांचे दुर्दैव आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही.एस. ढेकळे यांनी केले.

श्री धानम्मा देवीची कार्तिकी यात्रा पाच डिसेंबरपासून


जत,(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातल्या गुड्डापूर येथील श्री धानम्मा देवीची कार्तिकी यात्रा 5 ते 8 डिसेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात भरणार असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त चंद्रशेखर गोब्बी, विठ्ठल पुजारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आसंगीत विकासनिधीत अपहार केल्याची तक्रार


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील आसंगी येथील दलितवस्ती सुधार योजनेचा निधी बोगस खर्च दाखवून हडप केला असल्याची तक्रार माजी सरपंच बिरुदेव बाबर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सन 2016-17 मध्ये दलित व मातंग समाजासाठी दहा लाख रुपये आले होते.यातून या वस्तींवरील  रस्ते,विजेचे खांब आणि गटारीची कामे करणे अपेक्षित होते,मात्र ग्रामपंचायतीने हा निधी दलित वस्तीच्या विकासकामांसाठी न वापरता रोजगार हमीच्या कामासाठी वापरले असल्याचे दाखवले आहे.

जत शहरात चोरी


जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ राहत असलेल्या पार्वती भाऊसाहेब जाधव (वय 52) यांच्या घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून सोन्याचे दागिने, टीव्ही यासह सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. पार्वती या गावी गेल्या होत्या.त्यामुळे त्यांना चोरी झाल्याचे उशीराने कळले.

कोणबगीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील कोणबगी येथील भाग्यश्री शिवानंद बिराजदार (वय-24) या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबतचा गुन्हा उमदी पोलिसांत दाखल झाला आहेभाग्यश्री या नेहमीप्रमाणे विहिरीजवळ काम करत होत्या. त्यांचा तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या.

Sunday, November 25, 2018

सोमवारी पत्रकारांचे सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर धरणे आंदोलन


मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
सांगली,( प्रतिनिधी)-
पत्रकारांच्या विविध संघटनेच्यावतीने सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्यास केली जाणारी दिरंगाई संपवून कायदा अंमलात आणावा, ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनचा अधांतरी ठेवलेला निर्णय तातडीने घ्यावा, वृत्तपत्रांची गळचेपी करणारे जाहिरात धोरण रद्द करावे, ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती सुलभतेने मिळावी, अधिस्वीकृती बाबतच्या जाचक आणि चुकीच्या अटी रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषदेने राज्यव्यापी आंदोलन घेतले असून सांगली जिल्ह्यातही धरणे आंदोलन जोरदारपणे केले जाणार आहे. 

जत तालुक्यात मातृभाषा मराठी; शिक्षण मात्र कानडीत

सीमावर्ती गावांमध्ये मातृभाषेतून शिक्षण नाही;माध्यमिक शाळाच नाहीत
जत,(प्रतिनिधी)-
राज्य सरकारच्या मंत्रालयातील इंग्रजीचा वापर बंद करून राजभाषा मराठीचा वापर करण्यात यावा, सर्व पत्रव्यवहार आणि कामकाज मराठीतून करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे,मात्र याच राज्यात दुसर्‍या बाजूला जत तालुक्यात कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी माध्यमाच्या शाळाच नसल्याने मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी मराठी भाषा कोठून शिकायची, असा सवाल उपस्थित झाला आहे. इथल्या विद्यार्थ्यांना चक्क कन्नडमधून शिक्षण घ्यावे लागत आहे.

शिवसेनेच्यावतीने राम मंदिरात महाआरती


जत,(प्रतिनिधी)-
 शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे व हजारो शिवसैनिक आयोध्या येथील रामजन्मभूमी जागेवर महाआरती करण्यासाठी गेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जत येथील राम मंदिरात आज महाआरती करण्यात आली. यावेळी जत तालुका संपर्क प्रमुख तानाजी गुरव, तालुका प्रमुख अंकुश हुवाळे, उपजिल्हा प्रमुख तम्मा कुलाळ व ज्ञानेश्वर माने, राजेद्र पवार, हरिचंद्र कांबळे, जेटलिंग कोरे, आर.एस.पाटील, तीप्पाणा पुजारी, आप्पा थोरात, मलकारी पवार, शांताबाई राठोड, तम्मा पाथरुट,  निलेश चव्हाण, लता मासाळ, सर्जेराव रुपनर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

पाण्याचे टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन


मनसेचा इशारा

 जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात भयानक पाणी टंचाई जाणवत असताना शासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. प्रशासकीय अधिकारी  उपाययोजना केल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत . मागणी करुनही एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला नाही. तालुका प्रशासनाने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक असणार्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले नाही तर मनसेच्या वतीने शासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा जत तालुका मनसेच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आला आहे.

Saturday, November 24, 2018

धार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी दुष्काळी जत तालुका दत्तक घ्यावा


जत,(प्रतिनिधी)-
दुष्काळी जत तालुक्यावर अभूतपूर्व परिस्थिती ओढवली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा परिस्थिती लाखो रुपयांची देणगी गोळा करणार्या पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांच्या धार्मिक न्यासांनी जत तालुका दत्तक घेऊन चारा,पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

जाडरबोबलाद सोसायटी अध्यक्ष विरोधातला अविश्वास ठराव मंजूर


जत,(प्रतिनिधी)-
जाडरबोबलाद सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रदिप धुमगोंड यांच्या विरोधात  दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत मंजूर झाला. विरोधकांचा कट उधळून लावला गेला , असे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

जत तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असणार


तम्माजी कुलाळ यांची माहिती
जत,(प्रतिनिधी)-
एकेकाळी जत तालुक्यातल्या गावागावांमध्ये शिवसेनेची शाखा होती. आज ती परिस्थिती नाही,पण येथून पुढच्या काळात तालुक्यातल्या पुन्हा एकदा प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा सुरू करणार असल्याची माहिती शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख तम्माजी कुलाळ यांनी दिली.

दुष्काळी जनतेला आधार देण्याचे काम विक्रम फाऊंडेशनने केले-दिलीप पाटील


जत,(प्रतिनिधी)-
 विक्रम फाऊंडेशनच्यावतीने विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील दिव्यांगांसाठी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याचबरोबर दुष्काळी जनतेला आधार देण्याचेही काम केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले. येथील विक्रम फाउंडेशन व फेलोशिप ऑफ द हॅन्ङीकॅप्ड आयोजित केलेल्या दिव्यांगांसाठी मोफत शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जत तालुक्यातील जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करावा:तम्मनगौडा रवीपाटील


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून पावसाचा पत्ता नाही. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीतून शेतकर्याला उत्पन्न नाही. जनावरांना चारा नाही, शेतकर्याला पशुधन सांभाळणे अवघड झाले असून चार्याची कमतरता भासू लागली आहे. त्याचा मोठा परिणाम दूध उत्पादनावर झाला असून जनावरांना पिण्याच्या पाणी व चारा नसल्याने अनेकांना गावे सोडण्याची पाळी आली आहे. प्रशासनाने तातडीने जत तालुक्यात टँकर चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तम्मनगौङा रविपाटील यांनी जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांच्याकडे केली आहे.

जत येथे पुरूष, महिलांच्या जंगी कुस्त्या

जत,(प्रतिनिधी)-
 जत येथे डॉ. डी. वाय. पाटील याच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्यतारा विधाप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्टृ केसरी स्पधेॅचे उदघाटन पै. नामदेवराव मोहीते यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बालगाव आश्रमचे अमृतानंद महास्वामी, जि. . सदस्य सौ. स्नेहलता जाधव, ॅङ. प्रभाकर जाधव, शिवाजीराव ताङ, नगराध्यक्ष सौ. शुभांगी बन्नेनावर, सभापती सौ. सुशिला तांवशी, संजय सावंत, अशोक बन्नेनावर, पै.कृृष्णा शेंङगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पै. नामदेवराव मोहीते म्हणाले, जत तालुक्यात पहील्यांदाच पुरूष व महिला यांच्या कुस्त्या घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. या कुस्तीच्या माध्यमातून जत तालुक्याने कुस्ती परंपरा जीवंत ठेवावी, असे आवाहन केले. अमृतानंद स्वॉमीजी म्हणाले, जत तालुक्यातील कुस्तीवीरांनी जत तालुक्याचे नाव, कुस्ती परंपरा जीवंत ठेवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अॅङ. प्रभाकर जाधव यांनी मानले.

Friday, November 23, 2018

जत तालुक्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट

जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यात पाऊस न झाल्याने मोठी दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे तूर उत्पादनात तब्बल नव्वद टक्के घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साहजिकच तुरीला यंदा चांगला भाव शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीने मिळावी ,अशी मागणी होत आहे.

दुष्काळी भागातील शेतत़ळ्यांना जादा निधी देण्याची मागणी

जत,(प्रतिनिधी)-
राज्यातील शेतकर्यांसाठी मागेल त्याला शेतत़ळे ही योजना राबवण्यात येत आहेसध्या देण्यात येत असलेले अनुदान अपुरे पडत असून शासनाने दुष्काळी भागातील परिस्थिती लक्षात घेऊन अधिक निधी द्यावाअशी मागणी होत आहे.
राज्यात आतापर्यंत एक लाखांहून अधिक शेततळी तयार झाली आहेतसांगली जिल्ह्यात हाच आकडा दोन हजारांवर आहेशेततळ्यांसाठी 50 हजारांपर्यंत अनुदान शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा होतेवास्तविक हा निधी एका शेततळ्यासाठी पुरेसा नाहीदुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना शेततळ्याची चांगली मदत व्हावीत्या माध्यमातून रोजगार मिळावा,यासाठी शेततळ्याचे अनुदान वाढवण्यात यावेअशी मागणी होत आहे.
राज्यात मुळात 82 टक्के क्षेत्र हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.त्यातच आता जवळ्पास 52 टक्के क्षेत्र हे अवर्षणप्रवणग्रस्त बनले आहेत्यामुळे शेततळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहेदुष्काळी भागातील लोकांना रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहेया शेततळ्यांमुळे संरक्षित पाणीतसेच पुनर्भरण असे दुहेरी हेतू साध्य होतात,त्यामुळे जास्तीत जास्त शेततळी व्हावीतयासाठी शेततळ्यांना अनुदान अधिक द्यावेतसेच शेततळ्यांची संख्या (उदिष्टवाढवण्यात यावेअशी मागणी होत आहे.

पाण्याच्या टँकर मागणीला प्रशासनाचा खोडा

नागरिकांमध्ये संताप;आंदोलनाच्या तयारीत
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील सर्वाधिक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी असताना प्रशासन त्याची पूर्तता न करता उलट तालुक्यात उपलब्ध असलेले पाण्याचे टँकर आटपाडीला पाठवीत असल्याने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार प्रशासन करीत आहेअसा आरोप केला जात आहेतातडीने पाण्याचे टँकर सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा पवित्रा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी घेतला आहे.
दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती पाहण्यासाठी अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहेत्यांच्या पाहणी अहवालानुसार टँकर द्यायचे कीनाहीअसा पवित्रा प्रशासनाने घेतला आहेमात्र पाहणी अहवलाच्या नावाखाली आणखी किती दिवस घालवला जाणार आहेअसा सवाल उपस्थित होत आहेटँकरची मागणी सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत,पण प्रशासनाकडून फक्त चालढकल केली जात आहेया अक्षम्य दिरंगाईमुळे संताप व्यक्त होत आहे.
जत तालुक्यात यंदाच्या मोसमात दीडशे मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहेखरे तर हा गेल्या पाच वर्षांतला नीचांक असयाचे सांगितले जात आहेतलाव,कुपनलिकाविहिरी कोरड्या पडण्याबरोबरच ओढे-नालेदेखील कोरडे ठणठणीत पडले आहेतउन्हाची तीव्रता अधिक असल्याने पाण्याची पातळीदेखील खूप खाली गेली आहे. 28 तलावांपैकी तब्बल 16 तलाव कोरडे पडले आहेतज्या काही तलावांत पाणी आहेते पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात यावेअशी मागणी होत आहेअजून हिवाळ्यासह उन्हाळ्याचे चार महिने बाकी आहेतपुढचे दिवस कसे काढायचेअसा आतापासूनच शेतकर्यांना प्रश्न पडला आहेसध्या तालुक्यात 50 पेक्षा अधिक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेतसध्या हिवाळा आहेहिवाळ्याचे चार आणि उन्हाळ्याचे चार असे आठ महिने लोकांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागणार आहेतसध्या लोक कामधंदा सोडून पाण्याच्या मागे धावत आहेत.पण प्रशासन हा विषय अजून गंभीरपणे घ्यायला तयार नाहीउलट जतला उपलब्ध असलेले टँकर आटपाडीला पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिल्याने संताप व्यक्त होत असून तातडीने टँकर सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा पवित्रा विविध संस्थाराजकीय पक्ष यांनी घेतला आहे.

‘सात‘ वार


एका आठवड्याचेसातवार असतात. ‘आठवावार आहेपरिवार‘; तो ठीक असेल तर सातही वारसुखाचेजातीलजन्म हा एका थेंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रिकोणासारखे असतं, पण मैत्री असते ती वर्तुळासारखी, ज्याला कधीच शेवट नसतो वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो; परंतु चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात.
 *****
ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता मोबाईलवरील रग्गड गेमपेक्षा मैदानी खेळाचा थाटच बरा होता आलो शहरात सुख मिळविण्यासाठी पण गड्या आपला गावच बरा होता
 *****
माणूसकसा दिसतोह्यापेक्षा, ‘कसा आहेह्याला महत्त्व असतं... कारण शेवटी, सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, तर, गुणांचं आयुष्य, मरणापर्यंत असतं...
 *****
 कोणाजवळही काही बोलताना फार विचारपूर्वक बोला... कारण... काही माणसं अशीही आहेत की जी रडून ऐकतात आणि हसून सांगतात.
*****
नवरदेव ः महाराज, वधूला डाव्या बाजूला बसवू की उजव्या बाजूला? महाराज ः कुठेही बसवा. नंतर ती तुमच्या डोक्यावरच बसणार आहे.
*****
आज-काल पहिलीची पोरं केसांना जेल लावून शाळेत जातात. आणि आमची आई खोबर्याचं तेल लावून असा भांग पाडून द्यायची की वादळ जरी आलं तरी इकडचा केस तिकडं होणार नाही!
----------------
 बायको : अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे!
-----------------
 दीपिका अन रणवीरचं लग्न अवघ्या 30 लोकांच्या उपस्थित झाले. तेवढे तर आमच्या लग्नात रुसलेले असतात.

दुष्काळाचे अधिकार्‍यांना गांभीर्य नाही : सोमनिंग बोरामणी


जत,(प्रतिनिधी)-
 तालुक्यात चालू वर्षी पाऊस नसल्याने शंभर टक्के पेरण्या वाया गेल्या आहेत. निम्म्याहून अधिक तालुका पाण्यासाठी टाहो फोडतोय, जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही, अशा स्थितीत उपाययोजना करण्याऐवजी कागदी घोडे रंगविण्यात प्रशासन व्यस्त आहे.
तालुक्यातील प्रांत, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून दुष्काळी समस्यांमध्ये लोकांमध्ये मिसळून प्रश्न सोङवतील, अशी अपेक्षा असताना अनेक प्रश्जैसे थेराहिल्याने तालुक्यातील शेतकरी संतप्त आहेत. याची दखल वरिष्टांनी घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा बेळोंडगी (ता. जत) येथील सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी आहे. गेले वर्षभर तालुक्यात पावसाचा पत्ता नाही, याचे कोणतेही गंभीर अधिकार्यांना नाही. म्हैसाळ योजनेच्या पाण्याने तालुक्यातील पश्चिम भागातील सात ते आठ गावांना दिलासा मिळाला असला तरी पूर्व भागातील सर्व गावे दुष्काळाने हैराण झाली आहेत. तीव्र दुष्काळात तालुक्यातील अधिकारी काम करण्यास असम र्थ ठरत आहेत. तालुक्यातील अनेक गावांनी टँकरचे प्रस्ताव दिले आहेत. मात्र एकाही गावात अद्यापि टँकर सुरू नाही. तालुक्यातील सर्व अधिकार्यांनी तातडीने सर्वे करून तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे टँकर,चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात; अन्यथा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकर्यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा बोरामणी यांनी दिला

सांगलीत 26 रोजी संविधान दिन सन्मान रॅली


जत,(प्रतिनिधी)-
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्रच्या सांगली शाखेच्यावतीने विविध सामाजिक संघटनांच्या सहभागाने 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान दिन सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे दिली. सकाळी 10 वाजता पुष्पराज चौकातून ही रॅली विश्रामबाग चौकापर्यंत जाऊन परत सिव्हिल रोड मार्गे, डॉ. आंबेडकर मार्गावरून एस. टी. स्टँडवर डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप होणार आहे. जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात जिल्हा प्रशासन व कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने संविधान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष, सभापती, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, महापालिका आयुक्तांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.