पुणे: फेसबूकवर मैत्री
करणार्या ज्येष्ठ महिलेस महागडे घड्याळ पाठवल्याची बतावणी करून
6 लाख 81 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर
आला आहे. याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने दिलेल्या
तक्रारीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला या निवृत्त सैनिकाच्या पत्नी आहेत. तक्रारदार महिलेची फेसबुकवर आकाश अहिरवार याच्यासोबत मैत्री झाली आणि त्यानंतर
त्यांनी चॅटिंगही सुरू केले. आरोपीने त्याचा व्हॉट्सअॅप नंबर तक्रारदार महिलेस पाठवला. त्यामुळे त्यांचे व्हॉट्सअॅपवरही चॅटिंग आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलणे सुरू होते. व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू झाल्यानंतर त्यांच्यात चांगली
मैत्री निर्माण झाली. त्यावेळी आकाशने आपण इटलीत सिव्हील इंजिनियर
असल्याचे सांगितले. आकाशने चॅटिंगदरम्यान तक्रारदार महिलेस
8 ऑक्टोबरला महागडे घड्याळ पाठवल्याचे सांगितले आणि त्याचे फोटोदेखील
पाठवले.
दोन दिवसांनी त्यांना दिल्ली येथून फोन आला. त्यांची इटली येथून भेट आली असून, त्यासाठी कस्टम ड्युटी
म्हणून 35 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नमूद खात्यावर रक्कम भरली. त्यानंतर
तक्रारदांना पुन्हा फोन आला व तुम्हाला आलेल्या पार्सलमध्ये 40 हजार युरो निघाले असून, त्याचा दंड म्हणून 1 लाख 13 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी पुन्हा
रक्कम भरली. अशाप्रकारे वेळोवेळी 6 लाख
81 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तक्रारदार यांच्याकडून
वेळोवेळी रुपये घेऊनही अद्याप त्यांना भेटवस्तू ताब्यात मिळाली नसल्यामुळे फसवणूक झाल्याचे
त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार करीत आहेत
No comments:
Post a Comment