Monday, October 29, 2018

थंडी जाणवायला लागली


जत,(प्रतिनिधी)-
राज्यात अनेक ठिकाणी सकाळी आल्हाददायक थंडी आणि दुपारी कडाक्याचे ऊन असे हवामान अनुभवायला मिळत आहे. दिवस आणि रात्रीच्या तपमानात तब्बल 10 ते 23 अंशांची तफावत आहे. सध्या किमान तपमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.
दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात कोरडे हवामान राहणार आहे, तर 1 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात मागील महिनाभरार उन्हाचा चटका वाढला आहे. सोमवारी राज्यात सर्वांत जास्त कमाल तपमान सांताक्रुझ येथे 38.0 अंश सेल्सिअस, तर सर्वांत कमी किमान तपमान अहमदनगर येथे 13.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. अनेक भागात दिवसाचे तपमान 35 अंशांच्या वर असताना रात्रीच्या वेळी पारा 20 अंशांपेक्षा खाली घसरत आहे. सांगली परिसरात थंडी जाणवू लागली आहे. जत तालुक्यातही सकाळ-संध्याकाळी थंडी आणि दुपारी ऊन असे हवामान जाणवू लागले आहे.


No comments:

Post a Comment