Friday, October 26, 2018

(उद्योजक व्हा भाग 1) वन औषधी प्रक्रिया उद्योग


     अलिकडच्या काही वर्षात आयुर्वेदाला फार मोठे महत्त्व आले आहे. आपल्या देशात याच्यापासूनचा उपचार पूर्वापार म्हणजे अगदी प्राचीन काळापासून चालत आला आहे. मात्र आधुनिक उपचार पद्धतीचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहे. त्यामुळे साहजिकच अलिकडच्या काही वर्षात आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वनौषधी प्रक्रिया उद्योग तुम्हाला चांगलाच फायदा करून देऊ शकतो. कमी पावसाच्या क्षेत्रात तर या वनौषधी वनस्पतींना चांगलेच महत्त्व आहे. अशा जंगली वनौषधी झाडांची लागवड करून आणि त्यावर प्रक्रिया उद्योग उभारून चांगला नफा कमावता येऊ शकतो.
काही शेतकरी या वनौषधी वनस्पतींची लागवड करून शेतीतंत्राचे यश मिळवले आहे. औषधी वनस्पतींची लागवड करून या वनस्पतींच्या पावडर व इतर फायदेशीर बाबी बनवण्याचा उद्योग उभा केला जाऊ शकतो. आपल्याकडे आवळा, हिरडा, बेहडा यांपासून त्रिफळा चूर्ण बनवले जाते. याचा वापर विविध आजारात हमखास केला जातो, त्यामुळे या चुर्णाला खरेच मोठी आणि चांगली मागणी आहे.दंतमंजन, केशतेल, संधीतेल आणि विविध प्रकारची चूर्ण या प्रकारचे उद्योग उभारले जाऊ शकतात. आजचे वनौषधी वनस्पतींचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक युवक आपल्या या पारंपारिक शेतीकडे लक्ष देत आहेत. वन आणि कृषी विभाग या वनस्पतींच्या लागवडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान देते.याचा लाभ शेतकरी घेऊ शकतात.
राष्ट्रीयकृत बँकामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत या उद्योगांसाठी पंचवीस लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळू शकते. यामध्ये शेड बांधकाम, मशिनरी, खेळते भाम्डवल उपलब्ध करून घेता येते. मागास प्रवर्ग, महिला व स्वातंत्र्यसैनिक आणि अपंग अशांना पस्तीस टक्के तर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला पंचवीस टक्के अनुदान मिळते. स्वगुंतवणूक अनुक्रमे पाच व दहा टक्के करावी लागते. शेतकर्यांची मुले यात आपले नशीब अजमावू शकतात. योग्य नियोजन केल्यास अल्पावधीतच यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपाला येऊ शकतात-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



No comments:

Post a Comment