Sunday, October 28, 2018

सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे


भारतीय संस्कृती ही मानवाच्या ऐहिक जीवनाबरोबरच पारलौकिक जीवनाचाही विचार करणारी संस्कृती आहे. भारतीय संस्कृती जगातील एकमेव संस्कृती आहे की, जी प्राचीन काळापासून अखंडपणे चालत आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सोलापूरचेही स्थान तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग आणि अनेक संतांच्या पदस्पर्शाने सोलापूर जिल्हा जसा पावन झाला आहे तसाच येथील इतिहास देखील अविस्मरणीय आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रागैतिहासिक व आद्यऐतिहासिक पुरावशेषाबरोबर येथील मंदिर स्थापत्यशैली, मूर्तिकला, किल्ले, गढी, वाडे, बारव, विरगळ, सतीशिळा आणि इतर पुरातत्त्वीय अवशेष मोठ्या प्रमाणावर मिळतात. जिल्ह्यात वेगवेगळ्या कालखंडात बांधलेली बरीच मंदिरे असून या मंदिराची स्थापत्यशैली व येथील शिल्पकला ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धार्मिक पर्यटनास येणार्या भाविकास आत्मिक आनंद मिळू शकतो व संशोधकांना, अभ्यासकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभ्यासासाठी व संशोधनासाठी चालना मिळेल.
     सोलापूर हे गिरणगाव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून याठिकाणी मानवनिर्मित तलाव आहे. आध्यात्मिक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या ठिकाणी अष्टविनायक, अष्टशक्तिदेवता, अष्टकालभैरवाची स्थापना केल्याचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्थापन केलेली 68 लिंग ही पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रे आहेत. याव्यतिरिक्त भुईकोट किल्ल्यातील कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिर, रेवणसिद्धेश्वर मंदिर, रूपाभवानी मंदिर, तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातील जैन मंदिरे ही देखील पर्यटकास आकर्षित करणारी धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. तसेच शहरातील संभाजी तलाव, हिप्परगा तलाव, सिद्धेश्वर वनविहार, स्मृतिवन इ. स्थळे, तसेच शहरातील प्राचीन वास्तू या देखील पर्यटकास आकर्षित करणार्या आहेत. सोलापूरच्या जवळच असणार्या श्री क्षेत्र खंडोबा बाळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची ये-जा चालू असते. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे क्षेत्र तुळजापूर तसेच स्वामी समर्थांचे क्षेत्र अक्कलकोट, श्री दत्तात्रय यांचे क्षेत्र गाणगापूर, अखंड भारतातील वैष्णवांचे माहेरघर श्री क्षेत्र पंढरपूर, श्री द्वादशीचे क्षेत्र भगवंतनगरी श्री क्षेत्र बार्शी, श्रीकृष्णाचे श्री क्षेत्र गोपाळपूर, संतांची तपोभूमी मंगळवेढा, ब्रह्मपुरीचे ग्रामदैवत श्री क्षेत्र माचणूर, सोलापुरातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल, श्री कमलाई देवीचे श्री क्षेत्र करमाळा, मूर्तीचे गाव वरकुटे (मूर्तीचे), माढ्याचे ग्रामदैवत माढेश्वरी, संत सावता महाराजांचे आरण, नागनाथांचे वडवळ व मार्डी क्षेत्र, प्रतिकाशी यमाई नगरी मार्डी, मंदिर संपन्न वेळापूर, आधुनिक तीर्थ पर्यटन अकलाई देवी व आनंदी गणेश अकलूज इ. सर्वच स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या पर्यटनस्थळांव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मंदिरे आहेत त्यामध्ये दक्षिण सोलापूरमधील हत्तूर, मंद्रूप, कंदलगाव, कासेगाव, कारकल, उत्तर सोलापूरमधील बिबीदारफळ, कळमण, हिरज, अक्कलकोट तालुक्यातील जेऊर, चपळगाव, नागणसूर, पानमंगरूळ, बुर्हाणपूर तसेच दहिटणे, पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, करकंब, कोर्टी, पखालपूर, करमाळा तालुक्यातील पोथरे, हिवरे, संगोबा, माळशिरस तालुक्यातील जैन क्षेत्र दहिगाव, म्हाळुंग, माळशिरस, पिलीव, सांगोला तालुक्यातील सांगोला, कोळे मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर, बार्शी तालुक्यातील धामणगाव, सासुरे, वैराग, माढा तालुक्यातील मानेगाव, मालवंडी, सुरडी, मोहोळ तालुक्यातील मोहोळ, अंकोली, तांबोळे, कुरूल, कोरवली इ. तीर्थ पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास तसेच या दुर्लक्षित गावांची प्रसिद्धी झाल्यास साहजिकच याकडे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ शकतात. सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व शास्त्राचे वस्तुसंग्रहालय व दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील महर्षी दयानंद वस्तुसंग्रहालय हे देखील पुरातत्त्व अभ्यासकांसाठी व संशोधकांसाठी फार उपयोगी ठरते.
     सोलापूर जिल्हा दख्खनच्या पठारावर अशा मोक्याच्या ठिकाणी आहे की, कर्नाटक, आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. तसेच वैष्णवांचे माहेरघर पंढरपूर व वीरशैव पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर, श्री स्वामी समर्थ व इतर संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु ती दुर्लक्षित असल्यामुळे याची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झालेली नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व अभ्यासक यांच्याकडून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने पर्यटन स्थळांच्या माहितीचा प्रसार केल्यास येथे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराची उपलब्धता होऊ शकते. रोजगार निर्मितीबरोबरच स्थानिक विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थानिक लोकांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राचा विकास घडवून आणल्यास तेथील स्थानिक क्षेत्रांचा विकास होऊ शकतो.
     सोलापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना द्यावयाची असेल तर येथील पायाभूत सुविधांपासून विविध योजनांसंबंधी आणि भविष्यातील सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासकांकडून सुनियोजित आराखडा करणे महत्त्वाचे आहे. सोलापूर जिल्ह्यात मंदिर स्थापत्य शैलीबरोबरच येथील गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू त्यांना एक नेटके रूप देऊन पर्यटन व्यवसायाची नवी मेढ रोवू शकतो. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना इलेक्ट्रॉनिक प्रसिद्धी माध्यमामार्फत उदा. दूरदर्शन वाहिन्या, रेडिओ वाहिन्या, विद्युत माहिती फलक तसेच जनसंपर्क संस्था, आंतरराष्ट्रीय पर्यटनासंबंधित असलेल्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून प्रसिद्धी देऊन तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती देणारी छोटी छोटी माहितीपुस्तके तसेच पर्यटन स्थळावरील माहितीपट तयार करून तसेच स्थानिक अभ्यासू तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून त्यास प्रसिद्धी दिल्यास साहजिकच जिल्ह्यातील पर्यटनाकडे पर्यटक आकर्षित होऊ शकतात.

No comments:

Post a Comment