Sunday, October 28, 2018

सांगली-जत एसटीतून महिलेची पर्स लांबवली


जत,(प्रतिनिधी)-
सांगली-जत या एसटीतून प्रवास करणार्या हेमलता गजानन डुबल (कोंतेबोबलाद ता. जत) यांची पर्स चोरट्यांनी लंपास केली. या पर्समधील 65 हजारांच्या मुद्देमालासह बँकेची किल्लीदेखील चोरीला गेली आहे.
जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हेमलता डुबल या जिल्ह्या मध्यवर्ती बँकेच्या तिकोंडी शाखेत शिपाई म्हणून काम करतात. शनिवारी त्या जतच्या मुख्य शाखेत बैठकीसाठी आल्या होत्या. बैठकीनंतर त्या मुलीकडे कोल्हापूरला गेल्या होत्या. रविवारी सकाळी त्या नातवंडांसह गावाकडे येत होत्या. सांगलीत आल्यावर त्या सांगली-जत या एसटीबसमधून प्रवास करत होत्या. त्यांनी त्यांची पर्स वरच्या बाजूला सामान ठेवण्याची जागी ठेवली होती. जतमधील शिवाजी पेठपर्यंत पर्स त्या जागेवर होती. बसस्थानकावर गाडी आल्यावर गडबडीत पर्स उतरून त्या खाली उतरल्या. नंतर पर्स विसरल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बसमध्ये जाऊन पाहिले. तर पर्स गायब झाली होती. या पर्समधील एक तोळे सोन्याची बोरमाळ, अर्ध्या तोळ्याची अंगठी, 15 हजार रोख आणि मोबाईल असा 65 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याच पर्समध्ये बँकेच्या मुख्य दरवाज्याची चावी होती. हेमलता डुबल यांनी जत पोलिसांत पर्स चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार वीर करीत आहेत.

No comments:

Post a Comment