Thursday, October 25, 2018

गारपीट, मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने द्राक्ष,पपई बागांचे दहा लाखांचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
 वारा,गारा आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे  कंठी, रामपूर, वाषाण, घाटगेवाडी,येळदरी, बागलवाडी या परिसरात द्राक्ष,पपई बागांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले.गारपीट झाल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर  बागांना फटका बसला सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
काल सायंकाळी साडे चार वाजता वारा आणि मेघगर्जना आणि गारपीटसह जत परिसरात मध्यम पाऊस झाला. पाऊस मोठा नसला तरी सुमारे तासभर पाऊस होता.यावेळेस गाराही पडल्या. यामुळे जत परिसरातील घाटगेवाडी, कंठी, वाषाण आणि रामपूर परिसरातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. गारपीट झाल्याने बागायतदारांना आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले आहे. घाटगेवाडी,बागलवाडी गावांमध्ये प्रत्येकी तीन अशा सहा घरांवरील पत्रे उडून गेल्याने या कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत. जोराचा वारा असल्याने आणि गारपीट पडल्याने मोठा पाऊस झाला नाही, परंतु लोकांचे नुकसान मात्र झाले.
गारपिटीच्या पावसाने पपई बागेचे साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व गारासह पाऊस सुरू झाला.घाटगेवाडी येथे महेश कुलकर्णी यांची तीन एकर पपईची बाग आहे .या बागेच्या लागवडीचा खर्च दीड लाख रुपये आला आहे.वादळी  पाऊस व गारा पडल्याने पपाईच्या बागेला आलेली फुलकळी पूर्ण गळली आहे.त्यामुळे पुढील उत्पन्न व लागवडीचा खर्च असे एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. तर कुलकर्णी यांच्या शेताशेजारी  असणारी शशीकांत भोसले यांच्या मालकीची एक एकर पपई फळबाग आहे. या बागेला सुध्दा गारा, वादळी वार्याच्या पावसाचा  फटका बसून दोन लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीचे  तातडीने  पंचनामे उद्या होणार असल्याचे मंडळधिकारी संदीप मोरे यांनी सांगितले.
मान्सून पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.खरीप जसा वाया गेला, तसा रब्बीसुद्धा त्याच वाटेवर आहे. त्यामुळे पावसाची नितांत गरज आहे.सध्या जत परीसरासह तालुक्यात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. अशात गारपीट होऊन नुकसान झाल्याने शेतकर्यांची आणखीणच काळजी वाढली आहे.

No comments:

Post a Comment