Friday, October 26, 2018

जत तालुक्यात गारपीटीने पाच कोटींचे नुकसान


जत,(प्रतिनिधी)-
 जत तालुक्यातील रामपूर, वाषाण, घाटगेवाडी, येळदरी या परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे, पाऊस व गारपिटीने पाच कोटींच्या आसपास नुकसान झाले असून यामध्ये तीन शेतकर्यांची घरे पडून सहा ते सात लाख रुपये नुकसान झाले आहे. दरम्यान, महसूल विभाग व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी काल दिवसभर या गावी जाऊन पंचनामे तयार केले असून पाच कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आज तहसीलदार सचिन पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर जसे मंडल अधिकारी संदीप मोरे, तलाठी रवींद्र घाडगे ग्रामसेवक व कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून पंचनामे सुरू केले दिवसभर त्यांनी पंचनामे पूर्ण केले. नुकसान झालेल्यांमध्ये आप्पासो माळी, संगाप्पा माळी, अनिल माळी, रामू माळी, मालूबाई नाईक, वैजयंती कोळेकर, लक्ष्मण माळी, राजू माळी, संजय माळी, शिवाजी माळी, बाळू माळी, श्रीकांत आरळी, सिद्धाराम माळी, बसवेश्वर माळी, आनंदा कोर, भारती माळी, प्रकाश माळी, चंद्राबाई जानकर, बाळासाहेब सव्वाश, खुदाभाई मुल्ला, पिंटू सव्वाशे, राजाराम कोळेकर, शशिकांत भोसले, भैया कुलकर्णी आदी शेतकर्यांचे नुकसान झाले. दोन दिवसांत अजूनही 50 टक्के शेतकर्यांचे पंचनामे पूर्ण होणार असून या परिसरातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या गारपिटीमुळे कृष्णा नाईक, मालूबाई नाईक व वायुचंद हुल्याळ याची घरे पङून तीन लाखांचे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामे केले आहेत.
रामपूर व परिसरातील गावांमध्ये वादळी पाऊस व गारपिटीने द्राक्ष, ऊस, केळी, पपई, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले असून निसर्गाने अचानक घाला घालून शेतकर्यांचे पूर्णपणे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांचे नुकसान देण्यात यावे, अशी मागणी रांमपूर येथील माजी सरपंच मारुती पवार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment